मुक्तपीठ टीम
खारेगाव उड्डाण पुलाच्या श्रेयवादावरून ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशात ठाण्यात आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला आव्हाड-परांजपे तर दुसऱ्या बाजूला महापौर म्हस्के-खासदार श्रीकांत शिंदे असा सामना रंगला आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी आघाडीची भाषा आणि प्रत्यक्षात टोमणेबाजी असे खपवून घेऊ शकत नाही, असे बजावत जिल्हाप्रमुख म्हणून ‘एकला चलो रे चा’ नारा दिला आहे. तर आव्हाडांनी सारवासारव करत एकनाथ शिंदेंनी आपल्याला आघाडी करायचीच, असे ठामपणे सांगितल्याचे म्हटले आहे. पण प्रत्यक्षात, आनंद परांजपे यांनी केलेला तोंडाळपणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनाही खुपलेला दिसत आहे. त्यांनी केलेली विधाने खासदार श्रीकांत शिंदेबद्दलच्या राष्ट्रवादीच्या विधानांना झणझणीत उत्तर मानलं जात आहे.
या वादाची सुरुवात बॅनरबाजीवरून
- या सगळ्या वादाला सुरूवात बॅनरबाजीवरून झाली.
- कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून श्रेयवाद उफाळून आला.
- कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिवसेनेचे बॅनर दिसून आले, त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले, काही वेळातच नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले.
- ठाण्यात खारेगावमध्ये उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रमावेळी शिवसेना आणि राष्टवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.
- जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थित हा कार्यक्रम सुरू होण्याआधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
- शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली.
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
- ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले.
- खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपूल हा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमधून झाला असून, ठाण्यावर अपार प्रेम असलेले दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव या उड्डाणपुलाला देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली.
- दरम्यान भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांनी या फाटकाच्या ठिकाणी रेल्वे अपघातात आजवर मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
- मध्य रेल्वे आणि ठाणे महानगरपालिका यांनी एकत्रितपणे तयार केलेल्या या रेल्वे उड्डाणपुलासाठी ३८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप
- आव्हाड यांनी या पुलासाठी माजी खासदार आनंद परांजपे यांनीच पाठपुरावा केल्याचा उल्लेख केला असून मंजुरी देखील त्यांनीच मिळवून दिली आहे.
- मात्र पुलाचे काम का लांबले याचे उत्तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील असल्याचे त्यांनी सांगितले.
- सुरवातीपासून मी आघाडीचा धर्म पाळत आहे, राष्ट्रवादीच्या बाजूने आघाडी पक्की असून आता उर्वरीत निर्णय त्यांना घ्यायचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
- शिवाय नरेश म्हस्के हे महापौर होत असतांना त्यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाल्यावर क्षणाचाही विलंब न करता आम्ही ही निवड बिनविरोध केल्याची आठवण त्यांनी म्हस्के यांना करुन दिली.
- दुसरीकडे आव्हाडांनी केलेल्या या हल्याला खासदार शिंदे यांनी पलटवार केला.
- मला परिपक्व व्हायचे नसून मुलाच्या यशाने जर बापाला त्रास होत असेल तर त्या नात्याला काय म्हणावे असा टोला खासदार शिंदे यांनी आव्हाड यांना लगावला.
- विकासाचे राजकारण आम्हाला करायचे नाही, आणि आघाडीचा निर्णय हा केवळ शिवसेनेत आदेशानुसार घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बापाची चप्पल मुलाच्या पायात आल्याने अक्कल येत नाही- आनंद परांजपे
- शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी त्यावर पलटवार केला आहे.
- २०१४ नंतर खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन बदलले असले तरी खासदार शिंदे यांचे श्रेय राष्ट्रवादी घेऊ इच्छित नाही.
- पण, त्यांनी बोलताना भान ठेवले पाहिजे.
- मराठीत एक म्हण आहे, बापाची चप्पल मुलाच्या पायात आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही.
- आव्हाड हे मुलासमान प्रेम करतात; पण, मुलाच्या यशाने पोटदुखी होईल, अशी राष्ट्रवादीची भावना नाही, अशा शब्दात आनंद परांजपे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
आघाडीची भाषा आणि टोमणे…जमणार नाही!
- महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन एकला चलो रेचा नारा दिला आहे.
- ठाणे मनपात शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळावे आणि आमची एकहाती सत्ता यावी यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत.
- युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेणार असले तरी महापौर आणि ठाण्याचा जिल्हा प्रमुख म्हणून माझे मत युतीच्या बाजूने नाही, असं म्हस्के यांनी स्पष्ट केलं.
- शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा आघाडी व्हावी या मताचे नाहीत.
- आघाडीची भाषा आणि टोमणे…जमणार नाही.
- एकंदरीत जे काही चित्रं निर्माण झालं आहे.
- त्यावरून मला वाटतं अशा प्रकारे चित्रं निर्माण होणार असेल आणि आरोप प्रत्यारोप होणार असेल तर वैयक्तिक रित्या मी आघाडी करावी या मताचा नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलं.
- एकीककडे आघाडीची भाषा करायची आणि दुसरीकडे टोमणे मारायचे हे आमच्या सारख्या शिवसैनिकाला कधीच पटणारं नाही.
आघाडीच्या बाजूने मत टाकूया आणि आघाडी करून लढूया- जितेंद्र आव्हाड
- राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व प्रकारावर भाष्य केलं.
- राष्ट्रवादी पहिल्या दिवसांपासून आघाडीच्या विरोधात बोलली नाही.
- आघाडी होणार नाही असंही कधी राष्ट्रवादी बोलली नाही.
- त्यामुळे सत्तेचा गुरुर चांगला नसतो.
- आपल्याला एकत्रितपणे महाराष्ट्रात वातावरण तयार करायचं आहे.
- संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावी असं संख्याबळ करायचं असेल तर त्याच्या तयारीला लागावे लागेल.
- असं तोंडाला येईल ते बोलणं योग्य नाही
- माझं आणि पालकमंत्र्यांचं अनेकवेळा बोलणं झालंय. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवूया म्हणून सांगितलं.
- आघाडी करूया आणि पुढे जाऊया.
- आपण दोघांनी आघाडी करूया.
- छोटेमोठे कार्यकर्ते भांडत राहतील.
- त्याकडे लक्ष देऊ नका.
- आपण आघाडीच्या बाजूने मत टाकूया आणि आघाडी करून लढूया त्यात आपला फायदा आहे असं मला एकनाथ शिंदे यांनी अनेकदा सांगितलं आहे.
बापाची चप्पल घालून बाप होता येत नाही, शिंदेंचा परांजपेंना टोला!
- जितेंद्र आव्हाड शिंदेंच्या विधानाचा दाखला देत आघाडीचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात आनंद परांजपेंचा तोंडाळपणा एकनाथ शिंदेंनाही खटकलेला दिसत आहे. त्यांनी मनमाडमध्ये केलेले विधान चर्चेचा विषय ठरले आहे.
- नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे मनमाडमध्ये जे बोलले ते खासदार श्रीकांत शिंदेबद्दलच्या राष्ट्रवादीच्या विधानांना झणझणीत उत्तर मानलं जात आहे.
- ‘आनंद परांजपे यांचे वडिल प्रकाश परांजपे यांना शिवसेनेने जो मानसन्मान दिला त्यामुळे त्यांची चप्पल घालून त्याने काम करायला पाहिजे होते, मात्र त्यांना ते जमले नाही,बापाची चप्पल मुलाने घातली तर तो बाप होत नाही, त्यांनी निदान तसं वागायला पाहिजे!