मुक्तपीठ टीम
सिडको महामंडळातर्फपालिका क्षेत्र आणि सिडको अधिकार क्षेत्रातील १२.५% भूखंडांवरील भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या गृहनिर्माण संस्था/इमारतींसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेस राज्य शासनाचीही मंजुरी मिळाली आहे. अभय योजनेनुसार नळ जोडणीधारकांचे विलंब शुल्क माफ करण्यासह त्यांना भविष्यात वाणिज्यिक ऐवजी निवासी दरांनुसार पाणी देयके आकारण्यात येणार आहेत. सदर योजना ही १ मार्च २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या एक वर्षाच्या कालावधीकरिता ग्राह्य असणार आहे.
अभय योजनेकरीता अर्ज करणाऱ्या गृहनिर्माण संस्था/इमारती यांनी आठ (८) महिन्यांच्या कालावधीत अधिकतम चार (४) हफ्त्यांत पूर्ण पायाभूत सुविधा शुल्क (आयडीसी) आणि विलंब शुल्क (डीपीसी) वगळता पाणी देयकापोटी भरावयाचे शुल्क सिडकोकडे भरावे. थकीत शुल्क भरल्यांतर त्यांना संबंधित प्राधिकरणाकडून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त करण्याकरिता सिडकोकडून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल. अर्जदार गृहनिर्माण संस्था/इमारत यांनी (कमाल) चार महिन्यांच्या कालावधीत भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता संबंधित प्राधिकरणाशी संपर्क साधावा. अर्जदारांनी पाणी पुरवठ्यासाठी आकारण्यात येणाऱ्या वाणिज्यिक दरांचे निवासी दरांमध्ये रूपांतर करण्याच्या विनंतीसह पायाभूत सुविधा शुल्क, पाणी देयक शुल्क (विलंब शुल्काव्यतिरिक्त) आणि संबंधित प्राधिकरणाकडून प्राप्त केलेल्या भोगवटा प्रमाणपत्र यांच्या प्रती सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाला सादर कराव्यात. तद्नंतर सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाकडून विलंब शुल्क माफीसह नवीन पाणी देयक पाठविण्यात येईल. तसेच भविष्यातील पाणी देयके ही सुधारित निवासी दरांनुसार पाठविण्यात येतील.
अभय योजना जाहीर झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत गृहनिर्माण संस्था/ विकासक/ बांधकामधारक भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्यास असमर्थ ठरल्यास त्यांना अभय योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच विलंब शुल्कामध्ये माफी न देता त्यांच्याकडून वाणिज्यिक दरांनुसारच पाणी देयके आकारण्यात येतील.
तरी सिडकोच्या नळजोडणी धारक असणाऱ्या जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्था/इमारती यांनी सदर अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. अभय योजनेविषयीच्या अधिक माहितीकरिता कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा), सिडको लि., चौथा मजला, रायगड भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे किंवा ee.ws1@cidcoindia.com या संकेतस्थळावर किंवा ०२२-६७१२१०१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.