तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
भ्रष्टाचाराच्याविरोधात आंदोलनामुळे गाजलेले नावारुपाला आलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सध्या अनेकांच्या त्यातही भाजपाविरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झाले आहेत. ज्यांच्याकडून अपेक्षा असतात त्यांची लोक स्वत:च्या मनात लार्जर दॅन लाइफ प्रतिमा तयार करतात. पण कितीही मोठी झाली तरी शेवटी माणसंच असतात. पाय मातीचेच असतात. ती उभी केलेली प्रतिमा ढासळू लागतेच. आपल्या हिंदू परंपरेत तर देवही दोषरहित दाखवलेले नाहीत. इथं तर मर्त्य माणसं आहेत. दोष असणारच. त्यामुळे जेव्हा अण्णा हजारे हे किरीट सोमय्यांसारखेच सिलेक्टिव्ह भ्रष्टाचारविरोध करू लागले तर टीका तर होणारच. किरीट सोमय्या हे भाजपाचे नेते आहेत. राजकारणीच आहेत. त्यामुळे त्यांचा आव आणि भाव वेगळा वाटला तरी राजकारणी असल्याने ते तसं करणारच हे समजून घेता येतं. मात्र, अण्णा हजारे तर कधीही कोणत्याही राजकीय पक्षांशी त्यांची बांधिलकी थेट उघड करत नाहीत. तरीही त्यांच्या आंदोलनांमधून किंवा सध्या आंदोलनांच्या इशाऱ्यांमधून ती उघड होत असते. कारण शेवटी उक्तीपेक्षा कृतीवरून माणूस कसा ते कळतं.
आजचा विषय ‘त्या’ अण्णांचा नाही!
तरीही आजचा विषय अण्णा हजारे नाही. त्यापेक्षा त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा आहे. अण्णा हजारे असेच सिलेक्टिव्ह हे आताच नाही पूर्वीपासूनच त्यांचं धोरण तसं राहिल्याचं अनुभवूनही पुन्हा पुन्हा त्यांच्याकडूनच अपेक्षा बाळगणं म्हणजे या टीकाकारांनी स्वत:चीच फसवणूक करण्यासारखं आहे. त्यामुळे अण्णा चर्चेत राहतील.
तुमच्यात कोणी नवा अण्णा का नाही?
अण्णा हजारे म्हटलं भ्रष्टाचारविरोधी लढवय्ये असं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहतं. आता अनेकांच्या तसं नसलं तरी राहतं हे अमान्य करता येणार नाही. जर हे अण्णा सिलेक्टिव्हपणामुळे नकोसे असतील तर तसेच कुणी नवे अण्णा का पुढे आणले जात नाहीत? हा प्रश्न मला नक्कीच सतावतो.
भाजपा करते ते तुम्ही का नाही करत?
भाजपा परिवार सर्व सामर्थ्य वापरून अण्णांसारखी प्रतिकं उभी करतो. ते त्यांचा गवगवा करून त्यांची प्रतिमा तयार करतात. आपल्या हेतूसिद्धीसाठी अशांना वापरून घेतात. शिकताना मीही कोणाच्याही सभांना ऐकायला जात असे. अण्णा आणि खैरनारांच्या सभांना जात असे. या सभांचा हेतू दाऊदविरोध वगैरे असला तरी त्यांचा हेतू शरद पवारांच्याविरोधातीलच होत असत. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये त्याचे आयोजक माझे विश्व हिंदू परिषदेचे दीपक खानविलकरांसारखे मित्र असत, हे अनुभवलं आहे. त्यामुळे तसं केलं जातं हे वास्तव आहे. पण तसा प्रयत्न भाजपाविरोधी विचारांमधून का होत नाही?
समाजवादी विचारसरणी सोयीची, तरीही का फिकी पडली?
आपल्यामधील कुणाला मोठं होवू द्यायचं नाही या वैयक्तिक अंहकार दोषातून समाजवादी विचारसरणी सर्वांनाच सोयीस्कर असूनही ती निष्प्रभ ठरली. तरुण वर्ग दुरावला. एकेकाळी अनेक शाखा असणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या महालक्ष्मी धोबीघाटमधील एकमेव शाखा असल्याचं माझे सुरेश ठमके सारखे पत्रकार मित्र अभिमानानं सांगतात. राष्ट्रसेवादलाच्या बातम्या देताना त्या खूप चांगल्या सेवाकार्याच्या येतात. पण त्या सतत अविरत कुणालातरी मोठं घडवावं अशा प्रयत्नांच्या नसतात. मला मान्य आहे, व्यक्तीपेक्षा संस्था मोठी. संघही तेच सांगतो. तिथंही माणसं कुजवली जातात, अशा तक्रारी येतात. पण तिथं हेतूसिद्धीसाठी प्रतिमा निर्मिती करून माणसं मोठीही केली जातात. मग ते २०१४चा विचार करून २००९पासूनच नरेंद्र मोदींची प्रतिमा निर्मिती राष्ट्रीय पातळीवर करतात. त्याधीच त्याची पेरणी गुजरात विकास मॉडलची प्रसिद्धी करून करतात. अर्थात हे राजकीय पण इतर क्षेत्रातही लक्षपूर्वक पाहा. ते नेतृत्व तसं पुढे आणतात. काहीवेळा तर चाणाक्षपणे त्यांना दूर ठेवूनही स्लिपर सेलसारखं वापरूनही घेतलं जात असेल. पण मला त्यात गैर वाटत नाही. राजकारण म्हटलं की त्यात हे सर्व चालणारच. आजचा मुद्दा हाच आहे की भाजपाविरोधी विचारांमधून तसं का केलं जात नाही.
अण्णा हजारे घडवणं खरंच कठिण?
एखादा अण्णा हजारे उभं करणं खरंच कठिण आहे? मला वाटत नाही. प्रत्येक विचारसरणीत चांगली माणसं असतातच असतात. मग ते काँग्रेसप्रेमी असतीस, समाजवादी असतील किंवा आणखी कुणी. अशा चांगल्या माणसांना बळ दिलं पाहिजे. अशांना समाजमाध्यमं, माध्यमं यांच्या माध्यमातून प्रोजेक्ट केलं पाहिजे. भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार एवढा त्रिसुत्री अजेंडा ठरवत त्याविरोधातील त्यांचे विचार, त्यांची आंदोलनं लोकांमध्ये नेली पाहिजेत. महाराष्ट्रात तसे सध्या तरी कुणी दिसत नाही. असतील तर ते माहितीत नाही. हा माझ्यासारख्यांचा अज्ञान दूर करता येईल. तर अगदीच सामान्यांनाही अशा लढवय्यांची माहिती मिळेल. पण तसं होताना दिसत नाही.
अनेकदा समाजवादी चळवळीविषयी सांगितलं जातं. तिथं प्रत्येक व्यक्ती हा एक नेताच असतो. त्यातून नेतृत्व जे एस.एम.जोशी, मधु दंडवते, मृणाल गोरे, बापूसाहेब काळदाते यांच्यासारख्यांचं होतं ते तेथेच संपलं. पुढे नव्यानं समाजवादी चळवळीत तसं महाराष्ट्रात तरी कुणी झालं नाही. काही चतुरतेनं सत्तेच्या वर्तुळात उचापती करत लाभार्थी झाले असतील पण नेते नाही झाले. कमी अधिक फरकानं हे भाजपाविरोधातील प्रत्येक विचारांमध्ये दिसतं. आता मात्र हे थांबवण्याचा विचार या विचारांना मानणाऱ्यांनी केला पाहिजे.
ज्यांना राजकीय पदाची महत्वाकांक्षा नाही अशांची अण्णांसारखी प्रतिमा घडवली पाहिजे. तसं होत नाही. होताना दिसत नाही.
जनतेला नायक – नायिका लागतातच लागतात!
रामायण, महाभारत असो की आजच्या कथा-कांदबऱ्या-वेबसीरीज प्रत्येक कथेत नायक – खलनायक असतातच असतात. तुम्हाला तुमच्या विचारांमधून अराजकीय नायक घडवावेच लागतील. लक्षात घ्या. इंदिरा गांधी देशाच्या महानायिका होत्या. तरीही त्यांच्या चुकांचा फायदा घेत त्यांची सत्ता घालवण्यासाठी जयप्रकाश नारायण यांचं नायकत्वच कामी आलं. तसा एखादा चेहरा नसता तर दुसरी क्रांती ही सत्ता मिळवल्यावर विखुरण्यापुरतीही होवू शकली नसती. त्यामुळे अराजकीय नायक लागणारच लागणार. त्याच्याकडून प्रसंगी तुम्हालाही दोन फटकारे मिळालेही पाहिजेत. समाजात शहरी-ग्रामीण भागात असे अनेक असतील. आपल्याला ठाऊक नसतील. अशांना शोधून त्यांना नायक म्हणून घडवा. नाही तर मग सध्याच्या अण्णा हजारेंकडूनच अपेक्षा बाळगणं आणि टीका करणं बंद करा. त्यातून उद्या त्यांच्याविषयीच सहानुभुती तयार होऊ शकेल. सर्व काही अण्णांनीच करायचं का? या प्रश्नामागे असंच काही असतं. हे विसरू नका.
नवा अण्णा घडवणार?
जनतेच्या मुलभूत मुद्द्यांपेक्षा केवळ भावनात्मक मुद्द्यांवर राजकारण करतात म्हणून पूर्वी हिंदुत्ववाद्यांवर टीका होत असे, आता पुरोगामी म्हणवणारेही तशाच मुद्द्यांमध्ये रमलेले दिसतात. टीव्हीच्या पडद्यावर अशा मुद्द्यांमध्ये गरमी असते असे सांगत तेच मुद्दे येतात आणि मग त्याच मुद्द्यांवर राजकारण, समाजकारण फिरतं. जर मुलभूत प्रश्नांवर एखादा अराजकीय माणूस पुढे आला. त्याची तशी प्रतिमानिर्मिती झाली तर दरवेळी अण्णांची आठवण करावी लागणार नाही. दरवेळी अण्णांनीच का करायचं अशा सोयीच्या प्रश्नांना विचारण्याची संधी समर्थकांना मिळणार नाही. मुद्दा एवढाच आहे की एवढी रणनीती तरी भाजपामुक्त भारत करण्याचं स्वप्न पाहणारे ठरवून प्रत्यक्षात आणणार का?
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
संपर्क – 9833794961
ट्विटर @TulsidasBhoite @Muktpeeth
अगदी योग्य असं स्पष्टीकरण दिलंत सर.एखाद्या कडून अपेक्षा करण्याऐवजी पर्याय जो खरंच तळमळीने लढतोय त्याला पुढे करा.मी आपल्या मताशी शंभर टक्के सहमत आहे.