मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या फाईलवर कुणीतरी बनावट शेरा मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुख्यमंत्र्यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. या फाईलमधील मजकूर मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदलण्यात आला आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर वरच्या भागात एक अतिरिक्त मजकूराचा शेरा लिहिल्याचं समोर आलंय. यात नाना पवार या अभियंत्याची चौकशी बंद करावी, असा मजकूर लिहिण्यात आला होता. महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणांनी ही फाईल मुख्यमंत्र्यांक़डे पाठवली होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या या फाईलमध्ये इतर अभियंत्यांच्या चौकशीला परवानगी दिल्यानंतर केवळ एका अभियंत्याला वगळण्यात आल्याने चव्हाणांना संशय आला. नाना पवार असं त्या अभियंत्याचं नाव आहे. त्यांनी ही फाईल पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवल्यानंतर, सर्व कागदपत्रांच्या प्रतींची तपासणी झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
भाजप – शिवसेना युतीची सत्ता असताना जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधील बांधकामात अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनेक अभियंत्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यात अधीक्षक अभियंता नाना पवार यांचाही समावेश होता. नाना पवार त्यावेळी कार्यकारी अभियंता होते. मुख्यमंत्र्यांनी नाना पवार यांच्याही चौकशीला परवानगी दिली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांची चौकशीला परवानगी देणारी सही झाल्यावर त्या सहीवर लाल शाईने वेगळा शेरा लिहिण्यात आला.