तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आलं आङे किंवा आणलं गेलं आहे. नाना पटोलेंनी काँग्रेससाठी स्वबळाचा नारा दिल्यापासून त्यांनी जणू काही महापापच केलं. यापद्धतीनं वादळ उठवलं गेलं. मुळात युती असो किंवा आघाडी, आजची असो वा आधीची. प्रत्येक पक्षाचा प्रयत्न हा स्वत:चं बळ वाढवण्याचा असतो. त्यात कुणाला वाईट वाटावं असं काही नसतं. पत्रकारांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुखांना कामाला लागायला सांगतात, राष्ट्रवादीचे नेते पक्षवाढीसाठी सातत्यानं प्रयत्न करताना दिसतात. पक्षाला उभारी देणारी वक्तव्य करताना दिसतात. मात्र नाना पटोले यांच्या बोलण्यामुळेच जरा जास्त वाद होताना दिसतो. किंवा वाद निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न दिसतो.
आता आज गाजवला गेलेला मुद्दा हा नाना पटोलेंनी केलेल्या कथित सरकारकडून पाळत ठेवली जात असल्याच्या वक्तव्याचा आहे. आता नाना पटोले स्वत: पुढे आलेत. त्यांनी स्पष्ट केले की त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली जाते, असं म्हटलेले नाही. तरीही तशा बातम्या दुपारपासून संध्याकाळपर्यंत चालल्या. मुळात आरोप झाले, विधानं पुढे आले की राजकीय नेत्यांनी इंकार करणे नवे नाही. पण नाना पटोलेंच्या बोलण्यातील ज्या भागावरून राजकीय खळबळ माजवली गेली तो नेमका काय आहे?
काय म्हणाले नाना पटोले?
- “सोनिया गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं सांगितलं आहे.
- आपल्याला सत्ता आणायची आहे.
- मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे.
- महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे.
- कोणीही घाबरण्याचं कारण नाही.
- फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला.
- मला काही सुखाने जगू देणार नाहीत.
- सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे.
- महाराष्ट्रात काँग्रेस उभी होत असल्याचं त्यांना माहिती आहे.
- गुप्तचर रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो.
- कुठे बैठका, आंदोलन सुरु आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते.
- मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल.
- रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे.
- कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे.
- “पायाखालची वाळू सरकू लागली आहे, हे त्यांना कळत नाही.
- कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार
नाना पटोलेंच्या वक्तव्यातील गुप्तचर विभागाचा रिपोर्ट रोज सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो, या भागावर संपूर्ण पाळत प्रकरणाच्या बातम्यांचा इमला उभा आहे असे दिसते. आता पत्रकारितेत, राजकारणात किंवा प्रशासकीय क्षेत्रातील प्रत्येकाला रोज सकाळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाकडून राज्यातील सर्व परिस्थिती, घडामोडींबद्दल ब्रिफ केले जाते, याची माहिती असतेच. माहिती नसेल तरच आश्चर्य! त्यात पुन्हा आता आघाडीच्या समीकरणात उपमुख्यमंत्र्यांनाही ब्रिफ केले जात असेल. आता हे ब्रिफ प्रकरण म्हणजे पाळत ठेवणं असतं तर ते प्रत्येकाच्या सत्ताकाळात होत आले आहे, हे लक्षात घेतले जाते. ते तसे नसते. पाळत ठेवली जातच नाही का, तीही ठेवली जाते. पण नाना पटोलेंच्या वक्तव्याचा रोख तसा नसल्याचं त्यांनीच स्पष्ट केलं आहे. तरीही काहींनी असं का मांडलं असावं हा नाना पटोले म्हणतात, तसा आघाडीत बिघाडी घडविण्याचा काही पत्रकारांचा प्रयत्न असेलच असं नाही, पण चुकीचे इंटरप्रिटेशन नक्कीच असू शकतं. किंवा सोमवारी थंड चाललेल्या दिवसात हाती आलेल्या बातमीनं दिवस साजरा करण्याचा प्रयत्नही असू शकेल. ते असो. तो ज्याचा त्याचा प्रश्न.
नाना पटोलेंचंही चुकतं!
नाना पटोले हे बेधडक नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दरारा ऐन भरात असताना त्यांच्या कार्यशैलीला विरोध करत खासदारकीचा राजीनामा भिरकावण्याची हिंमत नाना पटोले यांनी दाखवली होती. पुढे त्यांनी विधानसभाही चांगली चालवली. पण त्यांच्या चळवळ्या स्वभावाला विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीची मर्यादा मानवणारी नसणार. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांनी काँग्रेसला गतिमान कऱण्यासाठी राज्यभर फिरणं सुरु केलं. त्यातून काही वेळा कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी त्यांनी टाळीबाज वक्तव्य करणं सुरु केलं. नेत्यासाठी तेही आवश्यक असतंच. त्यात पुन्हा टीव्ही प्रसिद्धी ठेऊन कॅमेऱ्यासाठीही बाइट मिळेल, तसं बोलण्याचा प्रयत्न असतो. नाना पटोलेही तसे करताना दिसतात. काही वेळा जास्तच. सध्याच्या बहुसंख्य नेत्यांचा प्रयत्न कॅमेऱ्यासाठी बोलण्याचा असतो. खरंतर त्यांनी कॅमेऱ्यासाठी बोलतानाच कॅमेरा आहे हे लक्षात घेऊनच बोललं पाहिजे. पण तसं होत नाही. मग कधी नाना पटोले नाणारसारख्या कोकणासाठी संवेदनशील विषयावर थेट नाणार होणारचं, वक्तव्य करुन मोकळे होतात. खरंतर राहुल गांधींनी दिल्लीत बैठक घेऊन नाणारच्या आंदोलकांना प्रकल्पविरोधाचा शब्द दिलेला असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षाने तसे बोलूच नये, पण नाना बोलून गेले होते. त्यामुळे कोकणातील उरले सुरले काँग्रेस समर्थकांचं नुकसान व्हायचं ते झालेच असेल. असं घडू नये. नितीन राऊतांच्या खात्याबद्दलच्या पत्राच्या वादाबद्दलही नाना पटोले यांनी माध्यमांना दोष दिला. असेलही तसं. पण शेवटी थोडी काळजी घेतली तर गैर काय?
आघाडीच्या राजकारणात नानाच नाही तर प्रत्येक पक्षाच्या नेत्याने किमान बोलताना आणि वागताना ते स्वबळावर नाही तर इतरांच्याही बळावर सत्तेत असल्याचे भान राखलेच पाहिजे. जीभ स्वत:ची असली तरी सत्ता स्वबळाची नाही, हे जर जीभ चालवताना प्रत्येकानं लक्षात ठेवलं तर आघाडीतील बिघाडीची संधी नेते म्हणतात तशी पत्रकारच काय भाजपालाही मिळणार नाही!