तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या स्टिंग ऑपरेशन्सच्या पेनड्राइव्ह पॉलिटिक्सच नवं पर्व सुरु झालंय. विधिमंडळाच्या नुकत्याच सरलेल्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे नवं पर्व सुरु केले. अधिवेशन संपता संपता त्यांनी पुन्हा एक नवा पेनड्राइव्ह बाहेर काढला आणि नवं स्टिंग मांडलं. त्यांच्यावर या स्टिंग ऑपरेशन्सच्या पेन ड्राइव्ह पॉलिटिक्समुळे शिवसेना नेते संजय राऊतांपासून अनेकांनी टीका केली. पण त्यांनी बेधडकपणे समर्थनच केलं. ते योग्यच! राजकारणपोटी का होईना जर सत्य बाहेर येत असेल तर यावं. भले मग ते राजकीय सोयीनुसार निवडक म्हणजेच सिलेक्टिव्ह का असेना!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेलं दुसरं स्टिंगही तसं धक्कादायकच. त्यात खाकी आणि जमीन आहे. त्यांनी थेट नाव घेवून माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांचं नाव घेतलं. त्यांनी बारामती कनेक्शनचाही उल्लेख केला. पण पुढे अजितदादा त्यात तुमचं काही नाही, असंही सांगितलं. जमीन व्यवहाराची व्याप्ती सांगताना या पोलीस अधिकाऱ्याएवढी एनए जमीन बारामतीत तर दादांचीही नसावी. ते शेतकरी आहेत. शेतजमीन असेल, असा टोलाही मारला!
केवळ खाकी, अवाढव्य मालमत्तेएवढंच आश्चर्य करणारे एलिमेंट नाहीत. तर अंडरवर्ल्डही आहे. पुन्हा दाऊद इब्राहिमशी संबंधित माणूसही आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर ज्याला दहा लाख देतो, असा माणूस. पुन्हा त्याच्याही मृत्यूचं गूढ आहे.
फडणवीसांसारखा राजकीय नेता एखादं स्टिंग सभागृहात मांडतो आणि त्यात राजकीय बिंग फोडणारं काहीच नसेल असे कसे असेल. या स्टिंगमध्येही तसं राजकीय कनेक्शन आहेच. तेही अशा नेत्याचं जो मुंबईतून पवारांच्या बारामतीत जातो आणि अंडरवर्ल्ड, खाकी आणि जमीन यांचं सेटलमेंट करून देतो.
स्टोरी टेलर असणं हे पत्रकारांप्रमाणेच राजकीय नेत्यांसाठी खूप चांगलं कौशल्य मानलं जातं. देवेंद्र फडणवीस हे खूप चांगले स्टोरी टेलर आहेत. त्यांनी चांगलं रंगवत स्टिंगची गोष्ट सांगितली. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी केवळ फॉरेंसिक ऑडिट केलेले नसल्यामुळे हे स्टिंग केवळ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सादर केले आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर आरोप केलेल्या जमीनीच्या व्यवहारात सामील मुंबईतील नेत्याचे नाव घेतलेले नाही.
या नेत्याचे पाप मोठे आहे. दाऊदशी संबंधित माणसाच्या मुलात आणि पोलीस सेवेत असताना मोठी जमीन मिळणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये सेटलमेंट करणे काही सज्जन नेत्याचे काम नसणार. त्यामुळे मुंबईतील तो नेता कोण आहे? हे उघड झालेच पाहिजे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील चौकशीचे आदेश देतील, अशी अपेक्षा आहे. चौकशी होईल. अहवाल येईल. पण ते सारं पुढच्या अधिवेशनापर्यंत सावकाश होऊ शकेल.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फॉरेंसिक ऑडिट केलेले नसेल तरी ते स्टिंग ऑपरेशन विधानसभेच्या रेकॉर्डवर आणलेच आहे. आता फक्त त्या नेत्याचे नावही उघड करावेच. खाकी आणि डी कंपनी यांच्यात सेटलमेंट…तेही बारामतीत जावून घडवणारा मुंबईतील तो राजकीय नेता कोण हे लोकांसमोर आलंच पाहिजे. हा देशाच्या सुरक्षेचाही प्रश्न आहेच आहे. उगाच इतर औपचारिकतेत वेळ न घालवता त्यांनी मुंबईतील त्या नेत्याचं नाव उघड करावंच!! फडणवीस किंवा अन्य राजकीय नेतेही अनेकदा जे बोलतात ती त्यांची प्रामाणिक भावना असते असे मानतो. त्यांचे ते शब्द त्यांनीही लक्षात ठेवावेच…देशापेक्षा मोठं काहीच नसतं…राजकारणही नाहीच नाही!
तुळशीदास भोईटे हे ‘मुक्तपीठ’ या मुक्तमाध्यमाचे संपादक आहेत.
संपर्क – ट्वीटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961 ई-मेल tulsidasv@gmail.com