मुक्तपीठ टीम
भारतातील लसीकरणाने शंभर कोटी डोसचा मोठा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार होतानाच एका मुद्द्यावर चर्चा सुरु झाली ती म्हणजे आता मास्कपासून मुक्ती कधी मिळणार? कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आता चिरपरिचित झालेल्या रात्री आठच्या प्राइम टाइम वेळेत येऊन प्रथमच दिलासा देणारी घोषणा करणार? मित्रों, अब हमारे देश में मास्क से मुक्ती मिल गई है…आज से…अभी से कोई भी व्यक्ती…चाहे वह कोई भी हो…मास्क नहीं पहनेगा…न ही गमछे से चेहरा ढांकेंगा! अर्थातच चर्चा रंगली असली तरी ती प्रत्यक्षात लवकर येईलच असे नाही. पंतप्रधान मोदी तशी घोषणा करण्यासाठी लसीकरणाचा तो टप्पा एप्रिल २०२२मध्ये किंवा नंतरच येऊ शकतो.
जाणकारांच्या मते सध्या गाठलेला शंभर कोटी डोसचा टप्पा हा सिंगल डोसचा आहे. दोन्ही डोस झाल्यानंतर संपूर्ण लसीकरणाला अद्याप वेळ आहे. सध्याच्या गतीनं देशात २१६ कोटी लसींचे डोस मिळण्यासाठी वेळ लागणार आहे.
लसीकरणाच्या लक्ष्यसिद्धीनंतर मास्कमुक्ती!
- आता ८० कोटीवरून १०० कोटींवर जाण्यासाठी ३१ दिवस लागले आहेत.
- म्हणजेच आता लसीकरणाचा वेग कमी झाला आहे.
- जर लसीकरण सध्याच्या गतीने सुरू राहिले, तर देशात मास्कमुक्तीसाठी आवश्यक ८५ टक्के लोकसंख्येच्या लसीकरणासाठी किमान सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.
- त्यानुसार एप्रिल २०२२च्या नंतरच हे लक्ष्य गाठता येऊ शकते.
- त्यानुसारच मास्कमुक्तीबद्दलचा निर्णय अपेक्षित आहे.
- त्याआधी मास्कमुक्ती तेव्हाच शक्य होईल जर केवळ भारतातील काही नाही तर सर्व राज्यांमध्ये तसेच जगातील बहुतांश देशांमधून कोरोना संसर्गाचा दर शुन्याकडे जाईल.
कसा गाठला शंभर कोटींचा टप्पा?
- देशात लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू झाली.
- सुरुवातीचे २० कोटी डोस देण्यासाठी १३१ दिवस लागले.
- त्यानंतरचे २० कोटी डोस ५२ दिवसात देण्यात आले.
- त्यापुढील ६० कोटींचा टप्पा ३९ दिवसात पार केला गेला.
- त्यानंतर २० कोटी डोस देत ८० कोटींचा टप्पा २४ दिवसात पूर्ण केला गेला.
- त्यानंतर ३१ दिवसांमध्ये २० कोटी डोस देत शंभर कोटींचा टप्पा आज गाठला गेला.
- एका अंदाजानुसार, सध्याच्या वेगानुसार लसीकरणाचा २१६ कोटी डोसचा टप्पा गाठण्यासाठी १७५ दिवसांचा कालावधी लागू शकतो.