मुक्तपीठ टीम
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात जगाच्या अर्थव्यवस्थेचे अनेक प्रकारे नुकसान होत आहे. एकीकडे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर दुसरीकडे गव्हासारख्या अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईचे संकट समोर आले आहे. मात्र, या युद्धाने भारताला फायदा होत आहे. दोन्ही देशांमधील युद्धामुळे जगभरात गव्हाचे भाव सातत्याने वाढत असून आता त्याचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून गव्हासाठी किमान आधारभूत किंमत २ हजार १५ रुपये प्रति क्विंटल आहे, परंतु बाजारात त्याची किंमत २ हजार २५० ते २ हजार ३०० रुपये आहे. सुरुवातीच्या हंगामातच गव्हाचे भाव सरकारी दरापेक्षा जास्त असताना ही परिस्थिती बऱ्याच काळानंतर पाहायला मिळत आहे.
यावेळी पंजाब सरकार १० लाख टनापेक्षा कमी गव्हाची खरेदी करत आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे शेतकरी गव्हाच्या पिकाचा काही भाग वाचवतील जेणेकरून भविष्यात ते खासगी व्यापार्यांना विकू शकतील असा यामागील सरकारचा विचार आहे. खरे तर युक्रेन युद्धामुळे जगभरात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिकागोमधील फ्युचर्स ट्रेडिंगमध्येही गव्हाच्या किमती ४० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेन हे गव्हाचे प्रमुख निर्यातदार आहेत आणि युद्धामुळे निर्यात ठप्प झाली आहे. अशा स्थितीत मागणी वाढली आहे आणि भारतातही त्याचा परिणाम झाल्याने किमतींनी एमएसपी ओलांडली आहे.