तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
शालेय जीवनात अनेकदा वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असे. त्यावेळी जर तर असे अनेक विषय असत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज काही जुन्या जाणत्या शिवसैनिकांशी बोलताना त्यांच्या तोंडी सारखं येत होतं, आज बाळासाहेब असते तर असं असतं, आज बाळासाहेब असते तर तसं असतं…!
त्यात पुन्हा सध्या विळ्या-भोपळ्याचं नातं असणाऱ्या भाजपा नेत्यांच्यातोंडीही सारखं येताना दिसतं, आज बाळासाहेब असते तर असं नसतं…
त्यामुळेच थोडासा कल्पनाविलास करत भुतकाळाच्या संदर्भात वर्तमानाचा विचार करायचा हा एक प्रयत्न…
शिवसेना – भाजपा युती कायम असती?
सर्वात महत्वाचा विषय अर्थातच सध्या महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीचा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या वेगळ्या विचारांच्या पक्षांशी आघाडी करून सत्तेवर आलेल्या शिवसेनेची बाळासाहेब असते तर काय भूमिका असती?
मुळात ज्येष्ठ शिवसैनिकांच्यामते देशात २०१४पासून मोदी पर्व सुरु झाले असले तरी जर बाळासाहेब ठाकरे असते तर युती तोडण्याची भाजपाची हिंमत झाली नसती. आजही युती कायमच असती आणि मुख्यमंत्री हा शिवसेना आणि शिवसेनेचाच असता. कदाचित शिवसेनेतून फुटून भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीत असलेले अनेक मोठे नेते साहेबांची माफी मागत शिवसेनेत आले असते. ते आणि शिवसेना दोन्ही मोठे झाले असते. ईडी-आयटी अशा सर्वांना बाळासाहेबांनी फाट्यावर मारलं असतं आणि धमकी देवू पाहणाऱ्यांनाच धंद्याला लावलं असतं.
राम मंदिराचं भूमीपूजन बाळासाहेबांविना नसतं!
हिंदूह्रदयसम्राट म्हणून देशभर आदरानं ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेबांना अयोध्येच्या राममंदिराच्या भूमिपूजनाला बोलवावंच लागलं असतं. जर बोलावलं नसतं तर जनतेनं ते खपवून घेतलं नसतं. नव्हे भाजपा तसं करण्यासाठी धजावलीच नसती. एकूणच अशांना वाटते भाजपा शिवसेना एकत्रच असते.
भाजपाने युती तोडलीच असती तर?
पण चर्चा जर तरचीच आहे तर भाजपाने युती तोडलीच असती तर? शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेली असती?
ज्येष्ठ शिवसैनिक आठवण करून देतात ती बाळासाहेबांच्या पक्षातीत महाराष्ट्रहिताच्या भूमिकेची. देशात आणीबाणी लागली. बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा दिला. त्याची किंमतही चुकवली. लोकभावना वेगळीच दिसत होती. कधी नाही ते घडलेलं. जनता पार्टीच्या शिवाजी पार्कवरून परतणाऱ्या गर्दीतून शिवसेनाभवनकडे दगडही फेकण्यात आले. अर्थात शिवसैनिकही सरसावले. पण अवघ्या काही वर्षातच बाळासाहेब खरे ठरले. जनता पार्टीची शकलं झाली. पुन्हा प्रचंड बहुमतानं काँग्रेस सत्तेत आली. पण प्रतिकुलतेतही काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या बाळासाहेबांच्या भूमिकेची शिवसैनिक आठवण करून देतात. तसंच पुढे तडफदार कारभार करणारे बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना सारे सारे विरोधात असतानाही त्यांच्या पाठिशी खमकेपणाने उभे राहणारे बाळासाहेबच होते. विधानसभा निवडणुका न लढवण्यासारखा मोठा निर्णयही त्यांनी घेतला. तसंच त्यांनी काय मिळवलं, तर शिवसैनिकांसाठी दोन आमदारक्या, असंही ते सांगतात.
बाळासाहेबांनी महाराष्ट्रहितासाठी मविआ होऊ दिली असती…
हे सारं सांगताना स्वाभाविकच त्यांचा सूर लक्षात येतो, ते म्हणतात, आज बाळासाहेब असते तरी त्यांच्याच शब्दात कमळाबाईची साथ सोडून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत महाराष्ट्र हितासाठी त्यांनी महाविकास आघाडी उभारू दिली असतीच असती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कडाडून टीका करणारे बाळासाहेब हे ऐंशीच्या दशकात काँग्रेसशी दोस्ती राखून होते. ते महाराष्ट्र हितासाठी. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना रिडल्स प्रकरण उद्भवलं तेव्हा बाळासाहेबांनी महाराष्ट्रहिताचा विचार करूनच हाती धगधगता मुद्दा असूनही सरकारी तळटीप मान्य करत वातावरण शांत करण्याची भूमिका घेतली, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कन्येला बिनविरोध राज्यसभेत जावू देणारे बाळासाहेब राजकीयदृष्ट्या कुणालाही अस्पृश्य मानत नसत, हे त्यांनी प्रजासमाजवाद्यांपासून पुढे अनेकांशी केलेल्या युती-आघाड्यांवरून दिसून येते हेही विसरता येत नाही. त्यामुळे शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादीला घेण्यात त्यांची हरकत नसती.
बाळासाहेबांनी केले असते उद्धवनाच मुख्यमंत्री…९९मध्येच मिळाले होते संकेत!
सरकार स्थापन झालं असतं ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच, असेही काहीजण सांगतात. त्यासाठी ते १९९९ची आठवण करून देतात. शिवसेनेच्या पहिल्या सत्ताकाळात किणी प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या राज ठाकरेंमुळे शिवसेना मुंबईतील मराठी माणसांमध्ये चांगलीच अडचणीत आली. बाळासाहेबांनी केंद्रातील आपलं वजन वापरून राज ठाकरेंना त्रास होऊ दिला नाही. पण तेव्हाच उद्धव ठाकरेंना राजकारणात सक्रिय केले. १९९९मध्येही वृत्तमानससारख्या काही दैनिकांमध्ये त्यावेळी शिवसेनेत चांगली सुत्रं राखून असलेल्या राजेंद्र कांबळेंसारख्या राजकीय पत्रकारांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील अशा बातम्या दिल्या होत्या. त्यामुळे आपल्या घराण्यातील कोणी थेट सत्तेच्या राजकारणात जावूच नये, अशी बाळासाहेबांची इच्छा नसावीच, असेही शिवसैनिक बजावतात.
मविआच्या नावात शिव असतंच…सत्तेत प्रभाव सेनेचा आणि रिमोटही बाळासाहेबांचाच!
मात्र, जर बाळासाहेब असते तर सत्तेची समीकरणं काहीशी वेगळी असती, आता सारखा मुख्यमंत्री शिवसेनेचा पण सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे असे नसते, असेही शिवसैनिक सांगतात. सत्तेचं वाटप योग्य प्रकारे झाले असते. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नावातही शिवसेनेचं मोठंपण दाखवणारा शिव नक्कीच असता. तसेच मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आणि सत्तेवर बाळासाहेबांचा रिमोट कंट्रोल १००टक्के असता. सततच्या राजकीय हार-प्रहारांमुळे उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीवरही परिणाम झाला नसता आणि ते अधिक सक्षमतेने सरकारची धुरा सांभाळत असते, असेही शिवसैनिक सांगतात.
बाळासाहेब ठाकरे जर हयात असते तर उद्धव ठाकरे संयमीपणे अनेक गोष्टी चालवून घेतात तसं नसतं. मग मुंबई ते अमरावती ठाकरेंच्या नावाने शिमगा करणाऱ्यांना जुन्या शिवसेना स्टायलीतच तडाखे मिळाले असते, असेही शिवसैनिकांना वाटते. अर्थात त्याही वेळी कदाचित उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची समजूत काढून त्याची तीव्रता थोडी सौम्य करायला लावली असती.
आरेची जंगलतोड युती तोडणारी ठरली असती…
जोगेश्वरीतील एका ज्येष्ठ शिवसैनिकानं वेगळंही मत मांडलं. तो म्हणाला. साहेब असते तर २०१९च्या निवडणुकीपूर्वीच शिवसेना वेगळी झाली असती. बाळासाहेबांचं उद्धव, आदित्य, तेजसपेक्षाही निसर्गावर भन्नाट प्रेम होतं. तो वारसाही त्यांचाच. त्या निसर्गप्रेमातूनच ते काही राजकीय निर्णयही घ्यायचे. बाळासाहेबांच्या प्रत्येक वाढदिवसाला वयाच्या वर्षांएवढ्या रुग्णवाहिका भेट देणाऱ्या गणेश नाईकांसारख्या नेत्याला बाळासाहेबांनी अनियंत्रित होऊ लागताच घरी बसवलेले. त्यासाठी नवी मुंबई परिसरातील दगड खाणींचा, डोंगरतोडीचा, पर्यावरण ऱ्हासाचा मुद्दा होता. फडणवीस मुख्यमंत्री असतानाची आरेची जंगलतोड बाळासाहेबांनी खपवून घेतलीच नसती. कदाचित निवडणुकीचा विचारही न करता शिवसेना सत्तेतून बाहेर आली असती, असेही काहींना वाटते.
अर्थात हे सारं जर तर. त्यातही पुन्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी दिवंगत हा शब्दही ज्यांच्यातोंडी आजही येत नाही, अशा शिवसैनिकांच्या मनातील भावनांवर आधारित असं हे सारं. पण मुळातच व्यवहारापेक्षा भावनेवरच चालणाऱ्या, जगणाऱ्या शिवसेनेच्या एकंदरीत राजकारणाची वाटचाल पाहता शिवसैनिकांनी व्यक्त केलेली मतं फारशी चुकली असती असं वाटत नाही. आणि चुका तर आम्ही पत्रकारही करतोच करतो. दर निवडणुकांचे अंदाज पाहा!
तुळशीदास भोईटे हे ‘मुक्तपीठ’ या मुक्तमाध्यमाचे संपादक आहेत.
संपर्क – ट्वीटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961 ई-मेल tulsidasv@gmail.com