अपेक्षा सकपाळ
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने म्हणजेच एनसीबीच्या कोठडीतील मुक्काम ७ दिवसांनी वाढल्यापासून नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबटेंसेस (एनडीपीएस) कायदा चर्चेत आला आहे. हा कायदा गुन्हेगारी कायद्यांमधील गंभीर कारवाईची तरतुद असलेल्या काही विशेष कायद्यांपैकी एक मानला जातो.
एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर सात जणांना अटक केली आहे. या सर्वांवर नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबटेंसेस (एनडीपीएस) कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कायदा खूपच कडक आहे. भलेभले वकीलही एनडीपीएसचा गुन्हा म्हटले की हात वर करतात. त्यातील कठोर तरतुदींमुळे आरोपींची सुटका दुरापास्तच असते.
एनसीबीने आर्यन खानविरोधात कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे?
- एनसीबीने आतापर्यंत एनडीपीएस कायद्याच्या चार कलमांचा वापर केला आहे.
- एनडीपीएस कायद्याचे कलम ८ (सी) आहे.
- या कायद्यामध्ये औषधे आणि इतर मादक पदार्थांचे उत्पादन, ताबा, विक्री, खरेदी, वापर, आयात, निर्यात यासाठी व्यापक तरतुदी आहेत.
- एनडीपीएस कलम २० (बी) गांजाच्या वापराशी संबंधित आहे.
- कलम २७ कोणत्याही अंमली पदार्थाच्या वापराशी संबंधित आहे
- कलम ३५ जे गुन्हेगारी मानसिक स्थितीचे अनुमान आहे.
एनडीपीएस कायदा कशासाठी?
- देशातील कोणत्याही मादक पदार्थाच्या प्रतिबंधासाठी नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबटेंसेस (एनडीपीएस) म्हणजेच एनडीपीएस हा कायदा अस्तित्वात आणला गेला.
- हा कायदा ३६ वर्षांपूर्वी १९८५मध्ये अस्तित्वात आला.
- या कायद्यात मादक पदार्थांचे उत्पादन, साठवण, विक्री आणि वाहतूक यांच्यावरील कारवाईच्या तरतुदींचा समावेश आहे.
- या कायद्यांर्गत अंतर्गत, शिक्षेचे निर्धारण मादक पदार्थाच्या प्रकारावर आणि त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते.
- कायदा अंमलात आल्यानंतर १९८६ मध्ये नार्कोटिक कंट्रोल ब्युरोची स्थापना करण्यात आली.
एनडीपीएस कायद्यात किती शिक्षेची तरतुद?
- एनडीपीएस कायद्यांतर्गत शिक्षेबाबत विविध तरतुदी आहेत.
- या गुन्ह्यात ज्यांनी फक्त मादक पदार्थांचे सेवन केले आहे आणि कोणत्याही प्रकारच्या व्यापारात गुंतलेले नाहीत त्यांना जामीन दिला जातो.
- अंमली पदार्थ कमी प्रमाणात घेतल्यास एक वर्ष कारावास आणि दंडाची तरतूद आहे.
- ड्रग्जच्या व्यापारात सामील असलेल्या कोणालाही १० ते २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. सोबत एक ते दोन लाख रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो.
- ड्रग्ज खरेदी आणि विक्रीच्या बाबतीत, ड्रग्जच्या प्रमाणावर बरेच काही अवलंबून असते.
- एनडीपीएस कायद्याच्या कलम ३१ अ अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा दिली जाते.
- एनडीपीएस कायद्याखालील प्रकरणांमध्ये, जामीनाची तरतुद फक्त त्यांच्यासाठी आहे जे धंद्यात गुंतलेले नाहीत, फक्त परंतु सेवन करतात.