मुक्तपीठ टीम
९ डिसेंबर २०२२ रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये आपल्या सीमेवर घडलेल्या घटनेबद्दल मला या सन्माननीय सदनाला माहिती द्यायची आहे.
९ डिसेंबर २०२२ रोजी, पीएलएच्या सैनिकांनी तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत तेथील स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला.चीनच्या या प्रयत्नांचा आपल्या लष्कराने खंबीरपणे आणि दृढतेने सामना केला. त्यानंतर दोन्ही सैन्यांमध्ये समोरासमोर शारीरिक झटापट झाली मात्र भारतीय लष्कराने शौर्य दाखवत पीएलए ला आपल्या हद्दीत घुसखोरी करण्यापासून रोखले आणि त्यांना त्यांच्या चौक्यांवर परत जाण्यास भाग पाडले. या झटापटीत दोन्ही बाजूचे काही जवान जखमी झाले. मी या सदनाला सांगू इच्छितो की, आपल्या बाजूला जीवितहानी किंवा कोणताही जवान गंभीर जखमी झालेला नाही.
भारतीय लष्करी कमांडर्सनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पीएलएचे सैनिक आपल्या ठिकाणी परत गेले. या घटनेचा पाठपुरावा करत, ११ डिसेंबर २०२२ रोजी या भागातील स्थानिक कमांडरने प्रस्थापित व्यवस्थेनुसार , त्यांच्या चिनी समकक्षांसोबत ध्वज बैठक घेतली आणि या घटनेसंदर्भात चर्चा केली. चीनला अशा कृती टाळण्यास तसेच सीमेवर शांतता आणि स्थैर्य राखण्यास सांगण्यात आले. मुत्त्सदेगिरीच्या माध्यमातूनही हा मुद्दा चीनकडे उपस्थित करण्यात आला आहे.
मी या सदनाला आश्वस्त करू इच्छितो कि, आपले लष्कर आपल्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि या विरोधातील कोणतेही प्रयत्न निष्फळ ठरवण्यासाठी सदैव तत्पर आहे. मला विश्वास आहे की, हे संपूर्ण सदन आपल्या जवानांच्या शौर्यपूर्ण प्रयत्नांमध्ये त्यांना एकमुखाने पाठबळ देण्यासाठी उभे राहील. जय हिंद !”