मुक्तपीठ टीम
मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवार १ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध निर्बंध देखील लागू होत आहेत; या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश अंधेरी पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिले आहेत.
येत्या ३ नोव्हेंबर रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार व आदर्श आचारसंहितेचा भाग म्हणून मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तास आधीपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध निर्बंध लागू करण्यात येत आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर पासून प्रचार, प्रसार व जाहिरात याबाबत असणारे निर्बंध आणि घ्यावयाची दक्षता याबाबत सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षणादरम्यान माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संबंधितांनी काटेकोरपणे काळजी घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. तसेच या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांविरोधात संबंधित कायदा व नियमांन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी कळविले आहे.
महत्त्वाची माहिती
- या ४८ तासांच्या कालावधी दरम्यान उमेदवारांना त्यांच्या प्रचार व प्रसार साहित्यासाठी,तसेच जाहिरातीसाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तरी याबाबत संबंधित उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाशी किंवा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा व विहित निर्देशांनुसार कार्यवाही करुन पूर्वपरवानगी प्राप्त करून घ्यावी.
- आदर्श आचारसंहितेबाबतची नियमपुस्तिका (मार्च २०१९) मधील मार्गदर्शक सूचना क्रमांक ८.१ ते ८.६ अन्वये प्रचार साहित्याबाबत देण्यात आलेल्या निर्देशांनुसार;तसेच ‘लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१’ च्या कलम ‘१२७ क’ नुसार असे कोणतेही निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक मुद्रित किंवा प्रसिद्ध करू शकत नाही, ज्यावर दर्शनी बाजूस मुद्रकांची आणि प्रकाशकांची नावे आणि प्रतींची संख्या व पत्ते नसतील. त्याचबरोबर मुद्रकाने मुद्रित साहित्याच्या चार प्रती व मुद्रित प्रतींची संख्या दर्शवणारे वर्णन पत्र आणि प्रकाशकाकडून वसूल केलेला मुद्रणाचा खर्च यासह संबंधित प्रतिज्ञापत्राची एक प्रत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणे आवश्यक आहे.
- वृत्तपत्रातील जाहिरातींचे पूर्वोक्त पूर्व – प्रमाणन हे मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या आदल्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या उद्देश असलेल्या अशा सर्व जाहिरातींच्या संबंधात आवश्यक.
- राजकीय स्वरूपाच्या नभोवाणी,दूरचित्रवाणी आणि केबल टिव्हीवरील जाहिरातींचे पूर्व प्रमाणन आवश्यक.
- निर्बंध कालावधी दरम्यान मद्यविक्री दुकाने व तत्सम बाबीं येथील व्यवहार,खरेदी-विक्री, देवाणघेवाण इत्यादींवर पूर्णतः निर्बंध.
- शासकीय विश्रामगृहांमध्ये आणि सार्वजनिक उपक्रमांच्या विश्रामगृहांमध्ये’झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या राजकीय व्यक्तींना संबंधित नियम व पद्धतींच्या अधीन राहून निवास करता येईल. तथापि, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची राजकीय बाबी वा कार्यवाही करण्यावर निर्बंध.
- धार्मिक स्थळांचा राजकीय वापर करण्यावर निर्बंध.
- आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारच्या कोणत्याही माहितीचे आदान-प्रदान करण्यास किंवा पाठविण्यावर निर्बंध.
- ‘बल्क’पद्धतीने पाठवण्यात येणाऱ्या लघु संदेशांवर (एस.एम.एस.) निर्बंध.
- ध्वनीक्षेपकांच्या वापरावर निर्बंध.
- कोणत्याही प्रकारची सभा,जाहीर सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यावर निर्बंध.
- मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या परिसरात उमेदवारांचे तात्पुरते कार्यालय,संपर्क ठिकाण उभारण्यावर निर्बंध.
- ओपिनियन पोल,सर्वेक्षण इत्यादी बाबी करण्यावर निर्बंध.
अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी ‘अंधेरी पूर्व’ मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी चौधरी यांनी यानिमित्ताने आवर्जून केले आहे.