मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू, पाण्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने करावा लागेल, हाच जलसाक्षरतेचा अर्थ आहे. शरीरात जसे रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला अतिरिक्त ठरणारे, वाहून जाणारे पाणी थांबवावे लागेल. ते वळवावे लागेल. त्यातून जलक्रांती होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त जलसंपदा, जलसंधारण व पाणी पुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ.शंकररावजी चव्हाण जलभूषण पुरस्कार वितरण प्रसंगी सह्याद्री अतिथीगृह येथे ते बोलत होते.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, किनारपट्टी भागात समुद्राच्या पाण्यातून गोडे पाणी उपलब्ध करणे, तसेच मराठवाडा व विदर्भातील परिसरासाठी पाणी वळवण्याचा पर्याय उपयोगात आणावा लागेल. भावी पिढ्यांसाठी आपल्याला पाण्याचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. राज्यातील वाया जाणारे पाणी, समुद्राच्या पाण्याचा उपयोग अशा अनेक गोष्टींवर विचार करावा लागेल. इस्त्रायल सारख्या देशात खारे पाणी गोडे करून वापरण्याचे तंत्रज्ञान वापरले जाते. आपल्याकडेही हे तंत्रज्ञान विकसित करत आहोत. नवीन धरणापेक्षा आहे त्या संसाधनाचे बळकटीकरण करावे लागेल. त्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उत्कृष्ट नियोजनाची दूरदृष्टी असलेले दिवंगत डॉ.शंकरराव चव्हाण हे आधुनिक भगीरथ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त आपण जलसंपदा विभागामार्फत हे पुरस्कार देत आहोत. जलसाक्षरता आणि पाण्याचे नियोजन यासाठी जलभूषण पुरस्कार विजेत्यांनी केलेले काम पुढे अनेकांपर्यंत पोहोचावे, त्यातून जलसाक्षरता निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.