मुक्तपीठ टीम
कोयना धरणाचे दरवाजे पाच फुटांवर उघडण्यात आलेत. यातून तब्बल ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाण्याची पातळी दहा ते बारा फुटांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पायथा वीजप्रकल्पातून ११ हजार ६६७ क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्यात आलं आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. आज दुपारपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवून ५० हजार क्युसेक इतका करण्यात येणार असल्याचे सांगितलं जात आहे. कोयना धरणातून विसर्ग चालू झाल्याने पटणा, कराड, सांगली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीच्या पाणी पातळीत वाढ होईल.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची उच्चांकी नोंद झाली आहे. दरम्यान, कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४६ फूट एक इंच इतकी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.