मुक्तपीठ टीम
कधी डिझेल, कधी पेट्रोल, कधी खाद्य तेल तर कधी रोजच्या वापरातील वस्तू. महागाईचा भडका रोजच चटका देत असतो. आता महागाई भडक्याचा हा डेली सोप टीव्ही चॅनल्सच्या क्षेत्रातही सुरु होत आहे. एक डिसेंबरपासून टीव्ही पाहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण काही लोकप्रिय निवडक चॅनल्सचे दर १ डिसेंबरपासून वाढणार आहेत.
ट्राईच्या यादीतून वगळल्याने दरवाढीची संधी
- देशाच्या प्रमुख प्रसारण नेटवर्क ZEE, STAR, SONY, VIACOM 18 ने दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) प्रस्तावित सूचीमधून त्यांच्या काही वाहिन्यांना वगळले आहे.
- स्टार प्लस, कलर्स, सोनी, झी सारख्या चॅनेलसाठी दर्शकांना ३५ ते ५० टक्के अधिक दर मोजावे लागणार आहेत.
- सध्या या वाहिन्यांचे सरासरी दर ४९ रुपये प्रति महिना आहे, जे दरमहा ६९ रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकतात.
कोणत्या चॅनलसाठी किती जास्त खर्च?
- सोनीसाठी ३९ रुपयांऐवजी ७१ रुपये दरमहा खर्च करावे लागतील.
- झीचा दर ३९ रुपयांऐवजी ४९ रुपये होणार आहे.
- वायाकॉम 18 चॅनेलसाठी दरमहा २५ रुपयांऐवजी ३९ रुपये दरमहा असेल.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे टीव्ही पाहणे महाग होणार आहे. ट्राय ने मार्च २०१७ मध्ये टीव्ही चॅनल्सच्या किंमतींबाबत नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) जारी केली होती. ट्रायनुसार एनटीओ २.०नुसार प्रेक्षक फक्त तेच चॅनेल निवडून पैसे देऊ शकतील जे त्यांना पाहायचे आहे. तथापि, समस्या अशी आहे की ज्या चॅनलचे मासिक मूल्य ब्रॉडकास्टिंग नेटवर्कद्वारे १५-२५ रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आले होते, त्यांना ट्रायच्या नवीन दर आदेशामुळे फक्त १२ रुपये निश्चित करण्यात आले होते. यामुळे ब्रॉडकास्टर चॅनलचे नुकसान झाले. यामुळे आता त्या यादीतून नावे काढत चॅनल्सनी दरवाढीचा मार्ग निवडला आहे.