डॉ. वृषाली रामदास राऊत
“श्री नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केलेली रविवारची सुट्टी ही कामगारांच्या मानसिक, शारीरिक व सामाजिक आरोग्यासाठी उचलेलले पहिले पाऊल म्हणता येईल. स्वातंत्र्यानंतर भारताच्या प्रगतीमध्ये कामगारांचे योगदान अतुलनीय आहे. भारतात occupational health म्हणजे कामाच्या संबधित आरोग्य याकडे पाहिजे तितक लक्ष्य दिल्या गेल नाही व व्यावसायिक आरोग्याचे कायदे अपुरे आहेत. भारतात कामाच्या ठिकाणच्या शारीरिक आरोग्यासाठी मोजके कायदे असून कामामुळे होणार्या मानसिक आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
भारतात मानसिक आरोग्यावर बोलणे हे अजूनही निषिद्ध मानले जाते कारण मानसिक आरोग्य म्हणजे वेडेपणा ही भारतीयांची समजूत आहे. परंतु कामामुळे येणारा ताण हा चिंता, औदासिन्य व विविध प्रकारची व्यसन यांना कारणीभूत ठरतो. त्यामुळे कामगारांच्या शारीरिक आरोग्यावर, उत्पादन क्षमतेवर व त्याच्या नातेसंबधावर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते मानसिक आरोग्य हे मानसिक भांडवल आहे व त्याचा संबध त्या देशाच्या जीडीपी व सार्वजनिक आरोग्याशी आहे.
औद्योगिक/संघटनात्मक मानसशास्त्र ( Industrial/Organizational Psychology) या विषयात मानसशास्त्राचा वापर करून कामाच्या ठिकाणच्या वेगवेगळ्या घटकांवर काम केल जात ज्यात कामाच्या पद्धतीत आवश्यक बदल करून कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य कसे राखता येईल याचा समावेश आहे. युरोप, अमेरिका, न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशात औद्योगिक/संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणावर काम करतात मात्र भारतात मात्र चित्र फार वेगळे आहे. गेल्या काही वर्षात औद्योगिक/संघटनात्मक मानसशास्त्र हा विषय भारतात नावापुरता आहे.
एक औद्योगिक मानसशास्त्रज्ञ म्हणून मी माझ्या पहिल्या मराठी पुस्तकात कामाच्या संबंधित मानसिक आरोग्याचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ऊहापोह केला आहे. भारताची आरोग्यासंबंधी सद्यस्थिती, मानसिक आरोग्य व त्यावर परिणाम करणारे घटक, कामाच्या ठिकाणच्या मानसिक आरोग्यावर प्रामुख्याने परिणाम करणारे घटक ज्यात भावना, झोप, ताण, व्यसन व ergonomics या गोष्टी येतात याचा संशोधनात्मक पद्धतीने सविस्तर आढावा घेतला आहे. कुठल्याही कामामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो ज्याचा job safety analysis चा वापर करून अभ्यास केला जातो व त्यावरून शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपाय सुचविले जातात. याबद्दल मी सविस्तर लिहिलं आहे जेणेकरून या पद्धतीच महत्व कळेल.
मानव संसाधन विभाग व त्याची भारतातील परिस्थिति, लॉकडाउन मुळे भारतीय कामगार विश्वावर झालेले परिणाम, मानसिक आरोग्याचा कार्यक्षमतेवर होणारा परिणाम व कामाच्या ठिकाणच वेल-बीइंग अश्या महत्वाच्या पण दुर्लक्षित विषयावर मी पुस्तकात भाष्य केले आहे.
एकंदरीत शिक्षण,आरोग्य व मानव संसाधन या तिन्ही क्षेत्राचा एकमेकांशी असलेला संबध व त्यांचा भारताच्या सार्वजनिक आरोग्यावर होणारा दूरगामी परिणाम व त्यातून निर्माण होणारे प्रश्न याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे.
हे पुस्तक मैत्री प्रकाशन, पुणे यांच्यातर्फे १० ऑक्टोबर म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य दिनी प्रकाशित होत आहे. यासंबंधी अधिक माहिती मी माझ्या डॉ. वृषाली रामदास राऊत या नावाने असलेल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन माहिती देईन.