मुक्तपीठ टीम
विस्तारा एअरलाइनने या वर्षाच्या अखेरीस आपली कर्मचारी संख्या वाढवण्याची योजना आखली आहे. विस्तारा एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ विनोद कन्नन म्हणाले की, “कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजारापर्यंत वाढवण्याची तयारी करत आहे. ते पुढे म्हणाले की, विमान कंपनीचा ताफा वाढवण्यावर आणि एकूण सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्यावर भर आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, कंपनीत सध्या सुमारे चार हजार कर्मचारी कार्यरत आहेत.”
कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्याने विस्ताराचा प्रवासी वाढवण्याकडे कल
- कोरोना महामारीच्या पहिल्या ते तिसऱ्या लाटेचा हवाई वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे.
- दुसऱ्या लाटेत गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात हवाई वाहतुकीत काही प्रमाणात सुधारणा दिसली, परंतु तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा फटका बसला.
- तसेच, एअरलाइन उद्योगात पुन्हा रहदारीच्या संख्येत सुधारणा होत आहे. सीईओ विनोद कन्नन यांनी सांगितले की, फेब्रुवारीमध्ये मागणी परत आली आहे आणि लोकांनी पुन्हा प्रवास सुरू केला आहे.
- ते म्हणाले की, मला वाटते की संसर्गाची प्रकरणे कमी होत राहिलीत तर, विमान प्रवाशांची संख्या आणखी वाढेल.
कन्नन म्हणाले की, “एअरलाइन एकाच वेळी अनेक स्तरांवर कार्यरत आहे आणि सध्या प्री-कोरोना कालावधीपेक्षा जास्त उड्डाणे चालवत आहे. आम्ही एका दिवसात सुमारे २२० ते २५० उड्डाणे चालवत आहोत. आता आपल्याला कसे पुढे जाता येईल हे पाहूया. त्यामुळे आम्हाला आमचा ताफा वाढवण्याची गरज आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, टाटा ग्रुप आणि सिंगापूर एअरलाइन्सचा संयुक्त उपक्रम म्हणून स्थापन केलेल्या विस्ताराच्या ताफ्यात सध्या ५० विमाने आहेत, जी २०२३ च्या अखेरीस ७० पर्यंत नेण्याचे कंपनीचे ध्येय आहे. या वर्षाअखेरीस कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजारा पर्यंत वाढवण्याची योजना आहे.”