विनोद देशमुख
राजकीय पक्ष एका कुटुंबाच्या ताब्यात असणे हे लोकशाहीला घातकच. कारण, वर्षानुवर्षे त्याच घरातील लोक सत्तेची पदे उपभोगतात. त्यातून मगरुरी, भ्रष्टाचार, मनमानी, घमंड फोफावतो, याची उदाहरणे आपण पाहतोच आहोत. नेहरू-गांधी, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, करुणानिधी, अब्दुल्ला, बादल, पवार ही अशी काही राजकीय घराणी आहेत आणि ती लोकशाहीचे खच्चीकरण करीत आहेत, हे कोणीही नाकारू शकणार नाही. ७५ वर्षांपूर्वी, १९४७ साली राजेशाही गेली आणि ही नवी राजेशाही लोकशाहीचे सोंग पांघरून उदयास आली! यातही प्रादेशिक पक्षांची सुभेदारी ठिकठिकाणी निर्माण झाली. याला ठळक अपवाद तीनच- जुना समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही गट आणि जुना जनसंघ, सध्याचा भाजपा. आता चौथा ‘आप’ आलेला आहे. पण, तो सध्या चाचणीच्या अवस्थेत आहे.
महाराष्ट्रात शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची होती, पण घराणेशाहीवादी नव्हती. उद्धव कार्याध्यक्ष झाले अन् २००३ पासून त्यांची वाटचाल घराणेशाहीकडे सुरू झाली. यात योग्य वाटा मिळाला नाही म्हणून राज ठाकरे बाहेर पडले. नंतर स्वत: बाळासाहेबांनीच “उद्धव आणि आदित्यला तुमच्या पदरात घालतो” असे भावनिक आवाहन जनतेला करून ठाकरे घराणेशाहीवर शिक्कामोर्तब केले. आणि, उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये स्वत: मुख्यमंत्री अन् मुलगा आदित्यला मंत्री करून घराणेशाहीचे टोकच गाठले. (१९९५मध्ये बाळासाहेबांनी हे टाळले होते.) आता शिवसेनेत फाटाफूट झाली तेव्हापासून मात्र ‘ठाकरे म्हणजेच शिवसेना’ यावरच भर दिला जात आहे. ठाकरेंचे मुंबईतील निवासस्थान ‘मातोश्री’ हे घटनाबाह्य सत्ताकेन्द्र बनले, इथपर्यंत गोष्टी पुढे गेल्या
अशा घराणेशाह्यांना भाजपा विरोध करीत असेल आणि त्यांना संपविण्याचे प्रयत्न करीत असेल तर त्यात चूक काय ? उलट, लोकशाहीसाठी ते चांगलेच आहे. पक्षावर आणि सरकारवर काही कुटुंबांनी सतत ताबा ठेवायचा अन् त्या पक्षांसाठी झटणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांनी मात्र नेहमी दुय्यम पदांवरच काम करायचे किंवा शेवटपर्यंत फक्त सतरंज्याच उचलायच्या, हे कुठवर चालणार ? त्या असंतोषाचे स्फोट सध्या ठिकठिकाणी होताना दिसतात. आम जनतेने याचे स्वागतच केले पाहिजे. भावनेच्या भरात भुलणे परवडणारे नाही, हे पक्के लक्षात ठेवा.
मात्र, घराणेशाहीला विरोध करताना एखाद्या पक्षाची एकाधिकारशाही निर्माण होणार नाही, याचेही भान ठेवले गेले पाहिजे. भाजपाध्यक्ष जगत् प्रकाश नड्डा यांच्या ताज्या विधानामुळे अशी शंका लोकांच्या मनात येऊ शकते अन् तेही लोकशाहीसाठी तेवढेच घातक ठरेल ! इतर सर्व राष्ट्रीय पक्ष संपणार, तसेच प्रादेशिक पक्षही संपणार, असा दावा नड्डा यांनी केला आहे. यातील कुटुंबवादी पक्ष संपले तर लोकशाहीप्रेमी जनतेला वाईट वाटण्याचे काही कारण नाही. परंतु, राष्ट्रीय स्तरावर एकटा एक भाजपाच राहणार असेल तर मग लोकशाहीचेही भवितव्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.
२०१४ मध्ये काॅंग्रेसला धक्का देऊन भाजपा केन्द्रात सत्तेवर आली, त्या प्रारंभीच्या काळात काही नेत्यांनी ‘काॅंग्रेसमुक्त भारत’ असा नारा दिल्याने देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भाजपाची मातृसंस्था रा. स्व. संघातही या घोषणेबद्दल नाराजी व्यक्त झाली होती. हिंदुत्वाचे भाष्यकार समजले जाणारे (स्व.) मा. गो. वैद्य यांनी यावर स्पष्ट सांगितले होते की, “काॅंग्रेसमुक्त भारत ही कल्पनाच आम्हाला मान्य नाही. सक्षम विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर काॅंग्रेस किंवा अन्य पक्ष असला पाहिजे.” याचा अर्थ, काॅंग्रेसला संपवण्यापेक्षा घराणेशाहीच्या फासाबाहेर काढण्यासाठी ‘घराणेशाहीमुक्त काॅंग्रेस’ उभी करण्यास मदत केली पाहिजे !
आमचा पक्ष विचारधारेवर चालत असल्याने मजबूत होत आहे, असाही दावा नड्डा यांनी केला. पक्षाचा इतिहास पाहता हा दावा चुकीचा नाही. परंतु, सध्या पक्षांतर करून भाजपात येणाऱ्या नेत्यांची संख्या विलक्षण वाढली असल्यामुळे भाजपाप्रेमींमध्ये शंकेचे काहूर माजले आहे. विचारधारेचे काय, असा प्रश्न अनेकांना सतावतो. ईडी कारवायांवरून विरोधकही या मुद्याचा लाभ घेत भाजपावर टीकास्त्र सोडत असतात. पक्षमजबुती म्हणजे इतर पक्षांमधून नेत्यांची आयात की आमजनतेचा वाढता पाठिंबा, याचाही विचार झाला पाहिजे, असे अनेकांना वाटते. पाऊणशे वर्षांची आपली लोकशाही शतकाकडे वाटचाल करताना सत्ताधाऱ्यांनी या लोकभावनांचा आदर करून तशी कृती आणि वक्तव्ये करणे आवश्यक आहे, हा एकूण मथितार्थ !
विनोद दिनकर देशमुख,
सेवानिवृत्त पत्रकार, नागपूर ३१ वर्षे तरुण भारतात सेवेनंतर शेवटी संपादक (विकास) लोकशाही वार्ता संस्थापक संपादक, विदर्भवादी साप्ताहिक ‘विदर्भ मिरर’