मुक्तपीठ टीम
मुंबई, दि. 18 : समाज एकसंघ ठेवण्यासाठीचा संदेश असलेले ‘हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम’ हे पुस्तक
नवीन पिढीसाठी निश्चित प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित गृहविभागाचे प्रधान सचिव विनित अग्रवाल यांनी लिहिलेले पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी श्री.पवार बोलत होते. यावेळी गृहविभागचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच लेखक तथा प्रधान सचिव विनित अग्रवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, या पुस्तकाद्वारे वाचकांना नवी दिशा मिळेल. पुस्तकाचे लेखक श्री.अग्रवाल हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांनी अतिशय विचारपूर्वक व मेहनतीने हे पुस्तक लिहिले आहे. सर्वांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात आपण काम करीत असलो तरी मनात लपलेला लेखक वेळात वेळ काढून लिहितोच त्यातूनच श्री.अग्रवाल यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी श्री.अग्रवाल यांचे कौतुक केले.
प्रास्तविकात विनित अग्रवाल म्हणाले, समाजात वावरत असताना पडलेले विविध प्रश्न, त्याचे उत्तर शोधण्यामागची धावपळ, ही यामागील प्रेरणा आहे. 251 पाने असलेल्या पुस्तकात 30 वेगवेगळे पाठ (चॅप्टर) असून विविध उपनिषदे यात ईशउपनिषद, सांख्ययोग यावरील भाष्यही आहे. तसेच प्रश्नोत्तरेदेखील आहेत.
कार्यक्रमास प्रधान सचिव, सचिव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
लेखकाविषयी माहिती
राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव असलेले विनित अग्रवाल हे आय आय टी (दिल्ली) मधून अभियांत्रिकी पदवीधर आहेत. तसेच त्यांनी मॅनेजमेंटमध्ये उच्च पदवी मिळविली आहे. काही काळ कार्पोरेट क्षेत्रात काम केले. त्यानंतर ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. सी.बी.आय. तसेच राज्य शासनाच्या विविध महत्त्वपूर्ण पदावर त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. पोलीस दलातील मानाचे व प्रतिष्ठेचे राष्ट्रपती पोलीस पदक त्यांना मिळाले आहे.
विनित अग्रवाल हे मान्यवर लेखक आहेत. विश्लेशणात्मक शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे. गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना तेथील अनुभवावर त्यांनी “रोमांस ऑफ अ नक्शलाईट” हे पहिले पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाचे स्वागत माध्यम तसेच जनेतेने केले. तद्नंतर त्यांनी महाभारतावर आधारीतर “ऑन दि ईव्ह ऑफ कलयुग” हे काव्यनाटय असलेले पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकासही उत्तम प्रतिसाद लाभला आणि आता हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
000