विजय गिते / पाटील
मात्र आजकालच्या चित्रपटात देवांच्या आणि महापुरुषांच्या भूमिकेसाठी जे पात्र निवडले जातात, त्यांचे चेहरे-हावभाव आणि सुमार अभिनय गुण पाहून ते अभिनेते, या थोर भुमीकांच्या अतीशय विरोधात वाटतात.
अरुण गोविल यांनी साकारलेला राम पाहून जनतेला प्रभु राम म्हटलं की हेच राम डोळ्यासमोर प्रकट होतात. हे सर्व त्या भूमिकेसाठी केलेले प्रयत्न नाही तर भगिरथी तपश्चर्याच म्हणावी लागेल, त्या कलेची साधना -आणि आराधना करण्यात अरुणजीना पूर्णपणे यश आले अन त्यानेच ते आज अजरामर अभिनेते आहेत.
महापुरुषाची भूमिका साकारताना, त्या दिग्दर्शकाने, कला दिग्दर्शकाने व त्याची रंगरंगोटी करणाऱ्याने त्या भूमिकेशी प्रामाणिक राहूनच काम केलं पाहिजे. तरच तुमचा अभिनेता आणि चित्रपट रसिकांच्या पसंतीस आणि कौतुकास उत्तीर्ण होतो. अन्यथा प्रेक्षक जनतेच्या शिव्या शापाचे बळी व्हावं लागतं.
भारतासारख्या कलाप्रिय- कलेच्या राष्ट्रात अनेक अष्टपैलू आणि विलोभनीय- दर्जेदार अभिनय करणारे अभिनेते चिक्कार पडून आहे. उत आला म्हटलं तरी वावंग नाही. पण आमच्या चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांच्या डोळ्यावर कसली झापडं येऊन पडली आहे की त्याना हे सर्व मुळीच दिसत नाही याच नवल वाटतं. या भूमीवर अनेक थोर विभुती अवतरल्या. त्यांचा जीवनपट इथल्या लोकांना चित्रपटाच्या माध्यमातून सांगणे हा उद्देश आम्हाला अजिबात दिसेनासा झालाय. त्याउलट कुठल्याही भिकार दर्जाचे चित्रपट रसिकांवर थोपवून पोटभरू धंदे निर्लज्जपणे- निसुरपणे पार पाडले जातात.
कलाक्षेत्रात आज तंत्रज्ञानाचे फार साहाय्य होत आहे. त्याची मदद घेऊन, पाश्चिमात्य देशातील लोकं, भव्यदिव्य सिनेमा काढतात. पण आमचा इतिहास खरोखरच भव्यदिव्य आहेच. या महान इतिहासाला पुरेसा न्याय देताना आमचे कलाकार मंडळी वारंवार सपशेल थोबाडावर आपटण्यास तयारच असतात. हे हास्यपद वाटत.
अतीशय सुमार दर्जाचे चित्रपट बनवणे, त्या पात्राला अजिबात शोभणार नाही असे टुकारछाप कलाकार घेतले जातात.
बर…! एवढं करूनही यां बिलंदरांचे पोट भरत नाही. म्हणून, इतिहासाच्या विपरीत दृश्य आणि संवाद दाखवून, इतिहासाचा पार शेणसडा करण्यास ही मंडळी मागेपुढे बघत नाहीत.
ऐतिहासिक चित्रपट बनवताना जी काळजी घ्यायची असते. त्याचा लवलेशही यांच्यात मिळत नाही. केवळ आणि केवळ स्वार्थी पोटभरु मानसिकतेतुन चित्रपट बनवणे आणि त्या रूपाने महान पात्रांचे विद्रुपीकरण विकृतीकरणं करणे याला आवर घालणे प्रेक्षकांना गरजेच वाटत आहे. आणि याचा विचार कलाकार मंडळींनी करावा…