मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलाचे सहनौसेनाध्यक्ष आणि उपप्रमुख व्हाईस अॅडमिरल मुरलीधर सदाशिवराव पवार यांना नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते परमविशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे. अॅडमिरल पवार हे साताऱ्यातील चितळी गावाचे सुपूत्र आहेत. सैन्यात रुजू होऊन अधिकारी होण्यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षण कोरुकोंडा सैनिक शाळेत प्रवेश घेतला होता. अॅडमिरल पवार यांनी मुंबई व मद्रास विद्यापीठातून संरक्षण व सामरिक क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण करून एम फिलच्या दोन पदव्या मिळविल्या आहेत. त्यांना १९९८ मध्ये भारतीय नौसेनाध्यक्षांचे प्रशस्तीपत्र, २००३मध्ये मॉरिशसच्या पोलीस आयुक्तांचे प्रशस्तीपत्र, २०१०मध्ये विशिष्ट सेवा पदक, २०१६मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि २०२१मध्ये परमविशिष्ट सेवा पदक हे बहुमान मिळाले आहेत.
फेब्रुवारी२०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय नौदलाच्या वेगवान हालचालींसह इतर अनेक महत्वपूर्ण मोहिमांची देखरेख समर्थपणे पार पाडणारे सहनौसेनाध्यक्ष पवार सुमारे चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि गौरवपूर्ण कारकीर्दीनंतर अलिकडेच निवृत्त झाले.
संरक्षण प्रबोधिनीपासून दाखवली चमक
- पवार हे पुण्याजवळील खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे स्नातक होते.
- तेथील प्रशिक्षण पूर्ण करून ते ०१ जुलै १९८२ रोजी भारतीय नौदलात अधिकारी म्हणून रुजू झाले.
- नौदलाच्या प्राथमिक प्रशिक्षणात “सर्वोत्कृष्ट स्नातक (कॅडेट)” हा बहुमान त्यांना मिळालाच, पण नंतर सुमारे वर्षभराच्या सब-लेफ्टनंट ट्रेनिंग कोर्समध्येसुद्धा ते अव्वल क्रमांकावर राहिले.
- त्यानंतर नौचालन व दिग्दर्शन या विषयात विशिष्ट प्राविण्य मिळवितानाच अत्यंत स्पर्धात्मक व प्रतिष्ठित अशा या अभ्यासक्रमात ते पुन्हा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
- पवार यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सेवाकाळात स्टाफ आणि कमांड असे दोन्ही प्रकारचे अनेक आव्हानात्मक पदभार यशस्वीपणे पूर्ण केले.
President Kovind presents Param Vishisht Seva Medal to Vice Admiral MS Pawar, AVSM, VSM (Retired) pic.twitter.com/XxTG6FgZcx
— President of India (@rashtrapatibhvn) November 23, 2021
देशाच्या सेवेत सतत दिमाखदार कामगिरी!
- त्यांना सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक काळ नौदलातील विविध नौकांवर – विमानवाहू नौकेसहित – काम करण्याचा अनुभव आहे.
- ऑपरेशन पवन या श्रीलंकेतील भारतीय शांतिसेनेच्या मोहिमेदरम्यान ते भारतीय नौदलाचे लँडिंग शिप टँक (लार्ज) या प्रकारच्या महाकाय अशा मगर नावाच्या जहाजाचे नौचालन अधिकारी होते.
- तर कारगील युद्धादरम्यान ते पश्चिम आरमारी तांड्याचे फ्लीट नौचालन अधिकारी होते.
- आपल्या कार्यकाळात त्यांनी भारत-चीन दरम्यान गलवान खोऱ्यात उद्भवलेल्या संघर्षपूर्ण परिस्थितीसह इतरही अनेक महत्वपूर्ण प्रसंग हाताळले.
- त्यांनी १ फेब्रुवारी २०१९रोजी सहनौसेनाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता.