मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लस घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींसह सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्या टप्प्यातच मोदी आणि ठाकरे लस घेताना दिसतील, अशी शक्यता आहे. कोरोना लसीबाबत सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण करणे हा यामागचा हेतू आहे.
दुसर्या टप्प्यात, ५० वर्षांपेक्षा जास्त व इतर आजार असलेल्या २७ कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व मुख्यमंत्र्यांना दुसर्या टप्प्यात लस दिली जाईल. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही याच टप्प्यात लस घेणार आहेत.
कोरोना विषाणूच्या साथीवर जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून भारतात सुरू झाली आहे. ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ लसींना भारतात तात्काळ वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ही लस एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर दोन कोटी कोरोनायोद्ध्यांना देण्यात येत आहे.
सरकारने केलेल्या नियोजनानुसार, ही लस सर्वात जास्त गरज लक्षात घेऊन दिली जाईल.
१) सर्वात जास्त धोका असलेले डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील सफाई कर्मचारी आणि पॅरा-मेडिकल स्टाफला प्रथम ही लस दिली जाईल. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी, पोलिस, अग्निशमन दल आणि सफाई कामगारांसह आवश्यक सेवा आणि देशाच्या संरक्षण, कायदा व सुव्यवस्थेसाठी जबाबदार असणाऱ्यांना लस दिली जाईल.
२)नंतरच्या टप्प्यात, ५० वर्षांहून अधिक व गंभीर आजाराने ग्रस्त लोकांना ही लस देण्यात येईल