रोहिणी ठोंबरे
लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी वेळ नाही. लसीकरण केंद्र घराजवळ नाही. एक ना अनेक कारणं. त्यामुळे एकीकडे विक्रमी लसीकरण झालं असतानाच दुसरीकडे लसीकरणाची गती मंदावतेय पण मुंबई महानगरपालिकेने यावर चांगला तोडगा शोधला आहे. आता सर्वांच्या सोयीसाठी बेस्ट बसमध्येही लसीकरण केंद्र सुरु झालीयत.
मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ पश्चिम भागात उभी असलेली मिनी एसी बेस्टबाहेर उभे असलेले हे नागरिक बेस्टने कुठे तरी जायचे म्हणून उभे नाहीत. त्यांना पाहिजे आहे ते तिकिट प्रवासाचे नाही तर लसीकरणाचे आहे. मुंबई मनपानं बेस्ट बसमध्ये सुरु केलेले हे मोबाइल लसीकरण केंद्र आहे. गर्दीच्या ठिकाणी अशा लसीकरण बसेस उभ्या केल्या जातात. बसवर असलेल्या फलकामुळे लोकांचे लक्ष वेधलं जातं. लोक जमतात. नेहमीच्या लसीकरण केंद्रापेक्षा खूपच कमी रांग असल्याने झटपट नाव नोंदणी पार पडते. काही वेळातच लसीकरणही होते.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी मुक्तपीठशी बोलताना या उपक्रमाचे श्रेय शिवसेना नेते पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना दिले. पालकमंत्री म्हणून वावरताना ते सातत्यानं कोरोनाविरोधी युद्धातील लसीकरणाचं महत्व ठसवत राहतात. शक्य त्या प्रत्येक मार्गाने लसीकरण कराच असा आग्रह धरतात. त्यातूनच ही बेस्टच्या मिनी एसी बसला मोबाइल लसीकरण केंद्र म्हणून उपयोगात आणायची कल्पना पुढे आली. आता ती प्रत्यक्षात आणली गेली आहे. त्यामुळे रोजच घड्याळाच्या काट्यांवर चालणाऱ्या घाईतील मुंबईकरांची सोय झाली आहे. तुम्ही लसीकरण केंद्राकडे येत नसाल तर लसीकरण केंद्र तुमच्याकडे येईल. पण मुंबईकरांचे १०० टक्के लसीकरण आम्ही करुच, असा विश्वास राजुल पटेल यांनी व्यक्त केला.
पाहा व्हिडिओ: