मुक्तपीठ टीम
कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कडक पावित्रा घेत, “ज्या मुद्दयावर आपण प्रतिक्रिया देत आहोत त्याबद्दल सखोल माहिती घ्या” असा सल्ला दिला होता. तर आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही शेतकरी आंदोलनाची दखल घेतली आहे. भारतातील शेतकरी आंदोलनासंबंधित त्यांनी एक निवेदन जारी केले आहे. “भारताच्या बाजारपेठेतील कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्राना गुंतवणुकीस आकर्षित करण्याच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो.” असे अमेरिकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, “अमेरिका भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांना गुंतवणूकीस आकर्षित करणाऱ्या प्रयत्नांचे स्वागत करत आहे.” तसेच प्रवक्त्यांनी, “बिडेन सरकार कृषी क्षेत्रात सुधारणा करणाऱ्या भारत सरकारच्या कायद्यांचे समर्थन करते आहे. ज्यामुळे खासगी क्षेत्रातील कंपन्या कृषी क्षेत्रात गुंतवणूक करण्यास आकर्षित होतील आणि शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठांमध्ये स्थान मिळेल,” असे म्हटले आहे.
भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरील एका प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, “आम्हाला विश्वास आहे की, शांततेने आंदोलन करणे हे यशस्वी लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे.”