मुक्तपीठ टीम
सध्या सगळ्या जगाला चिंतेत टाकणारं रशिया-युक्रेन युद्ध सलग १२ व्या दिवशीही सुरु आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. तर दुसरीकडे युक्रेनकडूनही त्याला सर्व शक्तीनिशी तोंड देण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्कींच्या जीवाला सर्वाधिक धोका आहे. स्वत: झेलेन्स्कीही तसं सांगतात. देशासाठी मरण पत्करण्याची तयारीही दाखवतात. पण त्यांचं काही झालं तर पुढे काय, असा प्रश्न युक्रेमवासीयांप्रमाणेच जगालाही सतावतो आहे. झेलेन्स्की यांची हत्या झाली तर पुढे काय, याबद्दल अमेरिकेने आता उघड केलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी रशियाने केलेल्या हल्ल्यात जर राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की मारले गेले तर पुढे युक्रेन कोणते पाऊल उचलेल याची योजना युक्रेनकडून तयार ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे.
युक्रेनियन नेतृत्वाचं अमेरिकेकडून कौतुक
- अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हटले की, युक्रेन सरकारचे नेतृत्व उल्लेखनीय आहे.
- मी युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोललो असून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत सरकार स्थिर राहण्यासाठी आमच्या देशाकडे योजना तयार असल्याचे सांगितले.
- म्हणजेच रशिया आपल्या मिशनमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही.
- युक्रेन रशियाच्या दबावापुढे झुकणार नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले.
- युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी वारंवार दावा केला आहे की रशिया त्यांना मारण्याचा कट रचत आहे.
- युक्रेनच्या दाव्यानुसार, झेलेन्स्की यांना ठार मारण्यासाठी रशियामधील अनेकजण कीव्ह शहरात ठाण मांडून सज्ज आहेत.
झेलेन्स्कीच्या हत्येचा वारंवार प्रयत्न
- गेल्या आठवड्यात, युक्रेनियन अधिकार्यांनी सांगितले की झेलेन्स्कींना मारण्याचा कट आखण्यात आला होता.
- मात्र अधिकाऱ्यांना वेळीच माहिती मिळाली आणि हा कट हाणून पाडला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
- युक्रेनच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, कीव्हला रशियाच्या प्रमुख सुरक्षा एजन्सी, एफएसबीने हल्ल्याचा इशारा दिला होता.