मुक्तपीठ टीम
कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असतानाच रुग्णालयात दाखल होण्याऐवजी होम क्वारंटाइन होण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. मात्र, होम क्वारंटाइनचे काटेकोर पालन होत नसल्यामुळे कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्यामुळे होम क्वारंटाइनच्या नियमांचे कठोर पालन रुग्णांकडून होईल, याची दक्षता स्थानिक प्रशासनाने घ्यावी, तसेच टेस्ट आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, असे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपरिषदांना दिले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, तसेच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची बैठक बोलावली असून सोमवारी अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागातील महापालिका आणि नगर परिषदांची बैठक सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाली. तेथील परिस्थितीचा आढावा घेतानाच त्यांच्या अडचणीही शिंदे आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी जाणून घेतल्या. होम क्वारंटाइन रुग्णांचे ट्रॅकिंग करण्यासाठी कॉल सेंटर सुरू करून रुग्णांचे नियमित ट्रॅकिंग करण्याचे आदेश त्यांनी सर्व महापालिका आणि नगरपालिकाना दिले.
रुग्णालये, तसेच कोव्हीड केअर सेंटर येथे कुठल्याही प्रकारची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे वाढीव बेड्सचे नियोजन करण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले. याशिवाय ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर कमी पडणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केली.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रुग्णालये आणि कोव्हीड सेंटर्समधील एसी, पंखे आदी सुविधांबाबत तक्रारी न येण्याची काळजी घ्या, रुग्णांना दोन वेळचे उत्तम जेवण, नाश्ता, गरम पाणी मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्यामुळे सर्व केंद्रांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले. तसेच, महिला रुग्णांच्या सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
निधी कमी पडू देणार नाही
राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कोविडच्या केसेस वाढत असताना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थोपवताना पालिका आणि नगरपालिकांना प्रशासनाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. लोकांचे जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.