मुक्तपीठ टीम
ज्या राहिवाशांना दहा वर्षांपूर्वी आधार कार्डे मिळाली आहेत आणि ज्यांनी या दहा वर्षात कधीही ही आधार कार्डे अद्ययावत केली नाहीत, अशा आधार क्रमांक धारकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत करावीत, असे आवाहन युआयडीएआयने केले आहे.
सर्व रहिवासी आपली ओळख पटवणारी पूरक कागदपत्रे (ओळखपत्र पुरावा आणि निवासाचा पुरावा) एकतर, माय आधार पोर्टलवर ऑनलाइन स्वरूपात अद्ययावत करू शकतात किंवा आपल्या जवळच्या आधार नोंदणी कार्यालयात जाऊनही अद्ययावत करू शकतात.
गेल्या दशकभरात, भारतातील नागरिकांचे आधार कार्ड, हे सर्वत्र ओळखपत्राचा पुरावा म्हणून स्वीकारार्ह झाले आहे. ११०० पेक्षा अधिक सरकारी योजना आणि कार्यक्रम, ज्यात, ३१९ केंद्र सरकारचे कार्यक्रम/योजनाही समाविष्ट आहेत, त्यात लाभ किंवा सेवा संबंधित व्यक्तीपर्यन्त पोहोचवण्यासाठीचा पुरावा म्हणून, आधार कार्ड ग्राह्य धरले जाते.
त्याशिवाय, अनेक बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था देखील ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी, आधारचा ओळखपत्र म्हणून वापर करतात. त्यामुळे, आपला सध्याचा रहिवासी पुरावा आणि ओळखपत्र पुरावा देऊन, आधार कार्ड अद्ययावत करुन घेणे केव्हाही नागरिकांच्या हिताचे ठरू शकते.
आधारमधील कागदपत्रे अद्ययावत ठेवल्याने आपले जीवनमान सुलभ होण्यास, उत्तम सेवा प्रदान करण्यात मदत होते आणि अचूक प्रमाणीकरण देखील शक्य होते. युआयडीएआयने कायम रहिवाशांना त्यांची कागदपत्रे अद्ययावत ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी आधार (नोंदणी आणि अद्यतन) (दहावी सुधारणा) अधिनियम २०२२ची अधिसूचना हे त्याच दिशेने आणखी एक पाऊल होते.
भारतीय एकल ओळखपत्र प्राधिकरण- युआयडीएआय पुन्हा एकदा रहिवाशांना आधार डेटाबेसमधील माहितीच्या अचूकतेसाठी त्यांची कागदपत्रे अद्यायवत करण्याचे आवाहन करते आणि त्यासाठी प्रोत्साहित करते.