मुक्तपीठ टीम
मे महिना सुरू झाला आहे. अतिशय कडाक्याचं उन पडत आहे. बाहेर पडताना जीव अगदी कासावीस होतो. एप्रिलपासून उन्हाचा कडाका इतका वाढला आहे की, घराबाहेर पडण्यापूर्वीच विचार करावा लागतो. अशा स्थितीत रस्त्याच्या कडेला फळे, भाजीपाला विकणारे आणि फेरीवाल्यांसाठी हा महिना अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाही. याशिवाय डिलिव्हरी बॉईजसुद्धा एसी रूममध्ये बसलेल्या लोकांपर्यंत कडक उन्हात सायकल आणि बाईकवरून जेवण पोहोचवत आहेत. मध्य प्रदेशात अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात पोलिसांची माणुसकी दिसली आहे. मध्य प्रदेशमधील पोलिसांनी एका डिलिव्हरी बॉयला बाईक भेट देऊन सर्वांची मने जिंकली आहेत. अशीच एक घटना राजस्थानात घडल्याची चांगली बातमी काही दिवसांपूर्वीच मुक्तपीठनं दिली होती.
डिलिव्हरी बॉयला पोलिसांकडून दुचाकी भेट
- हे मध्य प्रदेशातील इंदूरमधे घडले आहे, जिथे पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला बाईक देण्यासाठी पैसे जमा केले.
- हा २२ वर्षांचा तरुण एका ऑनलाइन फूड अॅपसाठी सायकलवर जेवण पोहोचवतो. पण यंदाच्या उन्हाळ्यात ते इतके सोपे नाही.
- पोलिसांना हा प्रकार समजला आणि त्यांनी त्या व्यक्तीसाठी दुचाकी खरेदी केली.
- पोलिसांनी या मुलाला उन्हाळ्यात सायकलवरून जेवण देताना अनेकदा पाहिले होते, असे सांगण्यात आले.
मध्य प्रदेशच्या विजय नगर पोलिसांचे मोठे मन
- इंदूरमधील विजय नगर पोलिस ठाण्याचे स्टेशन इनचार्ज तहजीब काझी यांनी जय हल्दे या तरूणाला गस्त घालत असताना घामाघूम सायकल चालवताना पाहिले.
- त्याला शक्य तितक्या लवकर ग्राहकांपर्यंत ऑर्डर पोहोचवावी लागते.
- त्याच्याशी बोलल्यावर कळाले की त्याचे कुटुंब आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत त्याच्याकडे दुचाकी घेण्यासाठी पैसे नाहीत.
- यानंतर स्टेशन इनचार्ज यांनी तरुणाला मदत करण्याची योजना आखली आणि पोलीस ठाण्यातील काही साथीदारांच्या मदतीने तरुणाच्या दुचाकीचे डाऊन पेमेंट करण्यासाठी पुरेसे पैसे उभे केले.
- बाईक मिळाल्यानंतर त्या तरुणाने पोलिसांच्या या औदार्याला सलाम केला आणि म्हणाला, ‘पूर्वी मी दिवसाला ६ ते ८ पार्सल पोहोचवू शकत होतो. पण आता मी १५ ते २० डिलिव्हरी पोहोचवू शकतो.
- एवढेच नाही तर दुचाकीचे उर्वरित हप्ते आपण स्वतः देणार असल्याचे या प्रामाणिक माणसाने सांगितले.
काही दिवसांपूर्वी ३१ वर्षीय शिक्षक झालेल्या डिलिव्हरी बॉयची कहाणी इंटरनेटवर व्हायरल झाली होती, त्याची मेहनत आणि आवड पाहून २४ तासांच्या आत इंटरनेटच्या उदार जनतेने त्याला मोटरसायकल मिळवून दिली. या डिलिव्हरी बॉयचा फोटो आणि कथा ट्विटर यूजर आदित्य शर्माने ११ मार्च रोजी ट्विटरवर शेअर केली होती. त्यावर आधारीत बातमी मुक्तपीठनंही चांगली बातमी म्हणून दिली होती. त्यानंतर आता हे प्रकरण इंटरनेटवर चर्चेत आले आहे.
सोशल मीडियाची महाशक्ती! तरुणाच्या प्रयत्नांनी ‘शिक्षक’ डिलिव्हरी बॉयना नवी मोटर सायकल!