मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशात विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच मतदारांनी उपयोगी मानलं आहे. तसंच ते भाजपाला देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्ता टिकवण्यासाठी उपयोगी ठरले आहेत. “योगींचं शासन, मोदींचं भाषण आणि कोरोना संकटातील राशन” या त्रिसुत्रीच्या बळावर भाजपाने उत्तरप्रदेशात अटीतटीच्या वाटणाऱ्या लढतीत चांगला विजय मिळवला आहे. पण आता पर्यंत राज्यातील ४०३ जागांवरील आघाडी स्पष्ट झाली आहे. भाजपासमोर तगडं आव्हान उभं केलेल्या समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांची सायकल सत्तालक्ष्याआधीच पंक्चर झाली असली तरी त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने ११८ जागा मिळवल्या आहेत. त्यांनी सत्ता जरी मिळवली नसलं तरी २०१७च्या भाजपाच्या ३२५ जागांमध्ये वजाबाकी करत किमान ५०ने भाजपाच्या जागा कमी केल्या आहेत. तरीही प्रतिकुलता मानली जात असताना २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्ता टिकवण्याची कामगिरी भाजपात योगींचं महत्व वाढवणारी ठरणार आहे.
भाजपा-सपा यांच्यात झाली मुख्य लढत
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला नेहमीप्रमाणे पोस्टल बॅलेटने सुरुवात झाली. पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीपासून आतापर्यंत यूपीच्या राजकीय लढाईची मुख्य लढत भाजपा आणि सपा यांच्यातच पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, बसपा आणि काँग्रेससह इतर पक्ष आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये खूपच मागे आहेत.
योगी आदित्यनाथांची गोरखपूरमध्ये प्रचंड आघाडी
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून तीस हजारपेक्षाही जास्त मतांनी आघाडीवर आहेत
- सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव मैनपुरीच्या करहल विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत
- रायबरेलीत भाजपच्या उमेदवार अदिती सिंह पुढे आहेत
- मतमोजणीच्या चार टप्प्यांनंतर रायबरेलीत भाजपच्या अदिती सिंह सपाच्या आरपी यादव यांच्यावर आघाडीवर आहेत.
- कौशांबी येथील सिरथू विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य दोन फेऱ्यांनंतर पिछाडीवर होते, ते नंतर पुढे आले.
उत्तर प्रदेशचा कौल
एकूण जागा ४०३
आघाडी जाहीर ४०३ जागा
- भाजपा २७४
- समाजवादी पार्टी ११८
- बसपा ४
- काँग्रेस ४
- इतर ३
उत्तर प्रदेशच्या मतदारांचा कौल कसा?