मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभेच्या निवडणुका वेळेवरच होणार आहेत. कोरोना संकट पुन्हा वाढू लागल्याने निवडणुका पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या सहमतीने या निवडणुका ठरलेल्या वेळेवरच घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राजधानी लखनौमध्ये आलेले मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) सुशील चंद्र यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये योग्य वेळी निवडणुका होतील. सर्व राजकीय पक्षांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून वेळेवर निवडणुका घ्यायच्या आहेत. गुरुवारी लखनौमध्ये पत्रकार परिषदेत सुशील चंद्रा म्हणाले की, अंतिम मतदार यादी ५ जानेवारीला येईल. ५ जानेवारीनंतर मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दीबाबत कोणतीही तक्रार आल्यास तीही तत्काळ निकाली काढण्यात येईल.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी मांडलेले मुद्दे
राजकीय पक्षांच्या सहमतीने वेळेवर निवडणुकीचा निर्णय
- मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र म्हणाले की, आम्ही राजकीय पक्षांसोबत बैठक घेतली.
- निवडणुका वेळेवर व्हाव्यात, अशी राजकीय पक्षांची मागणी आहे.
- २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते.
- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये ५९ टक्के मतदान झाले होते.
- ज्या राज्यात राजकीय जागरुकता जास्त आहे, त्या राज्यात मतदानाची टक्केवारी कमी का, हा चिंतेचा विषय आहे.
- आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
निवडणुकीसाठी खास सोयी-सुविधा!
- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काळजी घेणार!
- राज्यभरातील मतदान केंद्रांवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण केले जाईल.
- ८० वर्षांवरील लोक, दिव्यांग व्यक्ती आणि कोरोना बाधित लोक जे मतदान केंद्रावर येऊ शकत नाहीत, निवडणूक आयोग मतदानासाठी त्यांच्या दारात पोहोचेल.
- सर्व मतदान केंद्रांवर VVPAT बसवण्यात येणार आहेत.
- निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी सुमारे एक लाख मतदान केंद्रांवर थेट वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.
- विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.
उत्तर प्रदेशात किती मतदार?
- आतापर्यंत उत्तर प्रदेशात एकूण १५ कोटी मतदार आहेत.
- अंतिम प्रसिद्धीनंतर मतदारांची खरी आकडेवारी समोर येईल.
- शेवटच्या प्रसिद्धीनंतरही जर कोणाचे नाव आले नाही तर ते दावा करू शकतात.
- आतापर्यंत ५२.८ लाख नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
- यामध्ये २३.९२ लाख पुरुष तर २८.८६ लाख महिला मतदार आहेत.
- १८-१९ वयोगटातील १९.८९ लाख मतदार आहेत.