मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर सोपवलेल्या नव्या जबाबदारीचा उपयोग ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यावर माझा भर असेल. या मंत्रिपदाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा वनवास संपला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी केले.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेस ठाणे शहरातून प्रारंभ झाला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी या यात्रेचे संयोजक आमदार संजय केळकर, ठाणे शहर अध्यक्ष आ. निरंजन डावखरे, माजी खासदार किरीट सोमय्या, संजीव नाईक, कृपाशंकर सिंग, नगरसेवक भरत चव्हाण आदी उपस्थित होते.
कपिल पाटील म्हणाले की, ठाणे जिल्ह्याला केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळणे हे प्रत्येक ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. ही जबाबदारी सांभाळताना जनतेचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी या यात्रेचे आयोजन केले आहे.
यावेळी ठाणे जिल्ह्यातील विविध समाज घटकांनी मोठ्या उत्साहाने या यात्रेचे स्वागत करून पाटील यांना आशीर्वाद दिले. यात्रेच्या आजच्या पहिल्या दिवशी ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व या भागांना भेटी दिल्या. उद्या मंगळवार १७ ऑगस्ट रोजी अलिबाग, रेवदंडा, पेण, पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातून यात्रा फिरणार आहे.