मुक्तपीठ टीम
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार-२०२२’ प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीराकरिता सीतारामन आल्या होत्या. त्यावेळी ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.
भारताचा नकाशा असलेले सन्मानचिन्ह, मानपत्र, ‘सूर्यदत्त’चे वैशिष्ट्यपूर्ण उपरणे व माहिती पुस्तिका असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्रसंगी आमदार भीमराव तापकीर, आमदार प्रा. राम शिंदे, राहुल कुल, ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, माजी नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे पाटील, सरपंच पियुषा दगडे पाटील, यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली निर्मला सितारामन यांच्या कुशल अधिपत्याखाली भारतीय अर्थव्यवस्था सात टक्के इतक्या जीडीपी दराने प्रभावित आहे. विश्वास आणि पारदर्शकता या तत्वावर अर्थव्यवस्था काम करत आहे. एकंदरीत आर्थिक प्रगती आणि योग्य वाटचाल यामुळे भारतीय लोकशाही गतीने पण संयमित आणि दमदार वाटचाल करत आहे. सीतारामन यांच्या प्रभावी नेतृत्वात भारत शाश्वत आर्थिक प्रगती करेल हा विश्वास वाटतो आणि त्यामुळे त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा आदर करण्यासाठी त्यांना सूर्यभूषण राष्ट्रीय पूरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले.”
‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी ‘सूर्यदत्त’ संस्थेप्रती आभार व्यक्त केले. ‘सूर्यदत्त’च्या वतीने ज्ञानदानाचे कार्य अतिशय चांगल्या रीतीने होत असल्याचे सांगत त्यांनी ‘सूर्यदत्त’ परिवाराला शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्काराने प्रा. आनंद संकेश्वर, शास्त्रज्ञ डॉ. के. सिवन, खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक कार्यकर्ते वजुभाई वाला, लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर, मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, मनिंदर सिंग बिट्टा, श्याम जाजू यांना, तर सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. श्रीरंग लिमये, डॉ. शकुंतला काळे, माजी राज्यमंत्री आदिती तटकरे पोलीस अधिकारी संजय जाधव, चंद्रशेखर सावंत यांना गौरविण्यात आले आहे.