मुक्तपीठ टीम
“आदरणीय सोनिया गांधी यांचा राजकारणात येण्याचा विचार नव्हता. मात्र, जीवनात आलेले कठीण प्रसंग आणि झालेले आघात या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला, देशाला सावरण्यासाठी मोठ्या धैर्याने त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांचा त्याग, सेवाभाव व कर्तव्यनिष्ठा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल यांनी केले. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित १७ व्या सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताहाचे उद्घाटन सोनल पटेल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी परखड बोल सुनावले, “पंतप्रधान मोदींना आज बऱ्याच गोष्टींचा विसर पडला आहे. सशस्त्र क्रांतिकारकांच्या पाठीशी गांधी अनेकदा उभे राहिले. महात्मा गांधी यांचे कर्तृत्व हिमालयासारखे आहे. त्यामुळे मोदी आणि त्यांच्या भक्तांना गांधींच्या नावाची किंमत कळणार नाही. स्वातंत्र्य लढ्यात कोणतेही योगदान न दिलेल्या संघाच्या, भाजपच्या लोकांना सेवा, कर्तव्य आणि त्यागाची जाणीव कशी असेल?”
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १७ व्या सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताहाचे उद्घाटन सोनल पटेल यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या समारंभावेळी ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, शहराध्यक्ष रमेश बागवे, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दीकी, सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे, प्रदेश काँग्रेस सदस्य संजय बालगुडे, गटनेते आबा बागुल, वीरेंद्र किराड, माजी महापौर रजनी त्रिभुवन, नगरसेवक रवींद्र धंगेकर, दत्ता बहिरट, लता राजगुरू, अविनाश बागवे, सुजाता शेट्टी, सोनाली मारणे, रफिक शेख, विशाल मलके, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रशेखर कपोते, प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे, चेतन अगरवाल यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
सोनल पटेल म्हणाल्या, “पंतप्रधान पदाची संधी असतानाही त्याचा त्याग करीत डॉ. मनमोहन सिंग यांना पद दिले. या काळात त्यांनी समाजाच्या सर्वच घटना समान न्याय देण्यासाठी मनरेगा, अन्नसुरक्षा, माहिती अधिकार, शिक्षणाचा अधिकार असे महत्वपूर्ण कायदे आणण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. विदेशी बाई अशी टीका सहन करून त्यांनी नेटाने, जिद्दीने देशाची सेवा करत आपले कर्तव्य बजावले.”
झिशान सिद्दीकी म्हणाले, “आदरणीय सोनियाजींच्या वाढदिवसानिमित्ताने होत असलेला सप्ताह युवकांना प्रेरणा देणारा आहे. काँग्रेसने देशाला खूप काही दिले आहे. मात्र, आताचे सरकार काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले, अशा वल्गना करत आहे. काँग्रेसने, नेहरू-गांधी घराण्याने उभारलेल्या पायाभूत सुविधांचा लाभ आज ते घेत आहेत. काँग्रेसला सोडून ना सरकार बनू शकते ना विरोधी पक्ष, हे सत्य स्वीकारावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या सात वर्षात एकदाही पत्रकारांना सामोरे गेले नाहीत. हेच त्यांचे अपयश आहे.”
रमेश बागवे म्हणाले, “डोळ्यासमोर सासू इंदिरा गांधी, पती राजीव गांधी यांची हत्या झाली. पण खचून न जाता देशाची सेवा करण्यासाठी पुन्हा त्या धैर्याने उभ्या राहिल्या. पंतप्रधान पदाचा त्याग करत काँग्रेस पक्षाची, देशाची सेवा करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या या त्यागाला, सेवेला आपण आगामी निवडणुकीत काँग्रेसला निर्भेळ यश मिळवून देत त्यांना आपण अभिवादन केले पाहिजे.”
मोहन जोशी म्हणाले, “गांधी-नेहरू घराण्याची त्यागाची परंपरा आहे. गांधी कुटुंबाचा सेवाभाव, त्याग आणि कर्तव्यभाव देशाला प्रेरणादायी आहे. या सप्ताहात विविध व्याख्याने, स्पर्धा, उपक्रम, आरोग्य-रक्तदान शिबिर होईल. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव आणि १९७१ च्या युद्धाचा सुवर्णमहोत्सव या दोन गोष्टीना यंदाचा सप्ताह समर्पित केला आहे.” यशराज पारखी यांनी सूत्रसंचालन केले. आभार दत्ता बहिरट यांनी मानले.
गांधी नावाची किंमत मोदींना कळणार नाही : उल्हास पवार
पंतप्रधान मोदींना आज बऱ्याच गोष्टींचा विसर पडला आहे. सशस्त्र क्रांतिकारकांच्या पाठीशी गांधी अनेकदा उभे राहिले. महात्मा गांधी यांचे कर्तृत्व हिमालयासारखे आहे. त्यामुळे मोदी आणि त्यांच्या भक्तांना गांधींच्या नावाची किंमत कळणार नाही. स्वातंत्र्य लढ्यात कोणतेही योगदान न दिलेल्या संघाच्या, भाजपच्या लोकांना सेवा, कर्तव्य आणि त्यागाची जाणीव कशी असेल? भारतीय संस्कृतीचा डांगोरा पिटणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने सोनियाजींचा आदर्श घ्यावा. घरातून पळून आलेली व्यसनाधीन एक अभिनेत्री बाष्कळ बडबड करते आणि हे सरकार तिला पद्मश्री देते. येथील विक्रम-वेताळाची जोडी तिच्या पाठीशी उभे राहते, हे दुर्दैव आहे. पण हे बोलण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले, याचा त्यांना विसर पडलेला आहे. संविधान दिनादिवशी मोदी घटनेवर बोलण्याऐवजी गांधी परिवारावर टीका करतात. कारण, देशाचा इतिहास, भूगोल बदलून विकासाच्या मार्गावर चालण्याची परंपरा काँग्रेस आणि गांधी घराण्याची आहे. मोदींच्या प्रत्येक कृतीतून अभिनयाचे दर्शन घडते. त्यांचा दिग्दर्शक नेमका कोण आहे, हे शोधले पाहिजे. सत्यापासून पळणारे मोदी आणि त्यांचे भक्त केवळ ५६ इंच छातीचा गाजावाजा करतात, हे अनाकलनीय आहे, अशा परखड शब्दांत उल्हास पवार यांनी आपले विचार मांडले.