सुश्रुषा जाधव / मुक्तपीठ टीम
अंधेरीत भाजपाने माघार का घेतली? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहींनी समोरून, काहींनी मागून विनंती केली असं म्हटलं. वांद्र्याहून विनंती होती, हा प्रश्न त्यांनी हसून टाळला. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून तशी विनंती झाली की काय, अशी चर्चा रंगली…मात्र, आज ठाकरेंनी सरळस्पष्ट शब्दात भाजपाचे वाभाडे काढत विनंतीचा दावाच फेटाळून लावला.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मुंबईतील वांद्र्याच्या मातोश्रीवर शिवसैनिकांची रिघ लागलेली असते. घोषणांना ओसंडत असतात. आजचा दिवसही वेगळा नव्हता. शिवसैनिकांच्या घोषणांचा दणदणाट…आणि त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला हल्लाबोल. शिवसेनेचे चिन्ह, पक्ष हिरावून घेण्याचा भाजपावर आरोप करतानाच अंधेरी मतदारसंघात माघार घेण्यासाठी विनंती केली नसल्याचं ते स्पष्टपणे बोलले.
उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातील विनंती वगैरे केलेली नाही, हा उल्लेख महत्वाचा आहे. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात विनंतीचा दावा फेटाळला. त्याचं कारण सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान. मुक्तपीठच्या यूट्युब चॅनलवर तुम्ही त्यांचं ते विधान लाइव्ह ऐकलंही असेल.
त्यांनी म्हटलेलं की अंधेरीत माघारीसाठी काहींनी समोरून तर काहींनी मागून विनंती केली. पत्रकारांनी वांद्र्याहून विनंती झाली का, असे विचारले असता फडणवीसांनी हसून “तुम्हाला काही सांगायला नको” असं सांगत स्पष्टपणे टाळलं.
फडणवीसांना राजकारणातील बाजीगर म्हणून ओळखलं जातं. ते अगदी अंगावर उलटलेला डावही लिलया विरोधकांवर उलटवतात. भाजपाला शिवसेनेशी लढण्याऐवजी माघार घ्यावी लागल्यानंतरही सोमवारी त्यांनी जणू शिवसेनेलाच मदत केल्यासारखं दाखवलं. राज ठाकरे, शरद पवार यांनी विनंती केल्याचा दावा करताना त्यांनी केलेले काहींनी समोरून तर काहींनी मागून विनंती केल्याचंही म्हटलं. त्यामुळे चर्चेला ऊत आला. आता मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या रोखठोक शैलीत फडणवीसांचा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे अंधेरीत भाजपाने पवार – ठाकरेंच्या विनंतीवरून माघार घेतल्याचं नैतिक कारण पुढे केलं असलं तरी त्यातील ठाकरे हे उद्धव नसल्याचं स्पष्ट झालंय.