मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा अत्यंत उत्साहात पण साधेपणाने पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही दिली, त्यासोबतच जोरदार टोलेबाजी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना त्यांच्या भाषाज्ञानाचा उल्लेख केला होता. अजितदादांना डोळ्यांची भाषा ओळखता येते असंही बेनके म्हणाले होते. तोच धागा पकडून आणि छत्रपतींना येणाऱ्या भाषांचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी चांगलीच फटकेबाजी केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
- शिवयोग हा एक नवीन शब्द आहे. त्याचबरोबर शिवसुमन हे फुल. हे फुल आधी बघितलं नव्हतं अशातला भाग नाही. पण, त्याच वैशिष्ट्ये आज कळालं.
- ते फुल शिवनेरी परिसरातच पहिल्यांदा आढळून आलं, हा शिवयोग आहे.
- ज्यांनी ते शोधलं, त्याचं वेगळेपण ओळखलं त्यांचं मी कौतूक करतो.
- छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक भाषांचे ज्ञान होते. त्यात एक भाषा होती, इंगित विद्याशास्त्र.
- ही भाषा दादांना (अजित पवार) येते. पण, आता मी ती भाषा शिकणार आहे.
- अजितदादांच्या मनात काय चाललंय हे ओळखता आलं पाहिजे.
- त्यासाठी मी ही भाषा शिकणार आहे. मग त्यांनी अगदी गॉगल घातला, मास्क लावला तरी त्यांच्या मनातलं ओळखता येईल.
कोरोनाच्या संकटाची जाणीव करुन देताना म्हणाले…
शिवरायांच्या काळातील युद्ध आता नाही. त्यावेळच्या ढाल, तलवारी नाहीत. मात्र, आता करोनाविरुद्धचं युद्ध सुरू आहे. त्यापासून स्वत:चा बचाव करायचा आहे. वार करायचा तेव्हा करूच, पण वार अडवण्यासाठी ढाल लागते. करोनाविरुद्धच्या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे,’ असं सांगून त्यांनी मास्कचे महत्त्व अधोरेखित केले.