मुक्तपीठ टीम
गेल्या २५ वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या दोन वयोवृद्ध बंधूंना मंगळवारी चेंबूर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. सतीश विष्णू साळुंखे (६०) आणि किशोर विष्णू साळुंखे (६५) अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही चेंबूर येथील उमरशी बाप्पा चौक, छगन मिठा पेट्रोलपंपाजवळ राहतात. २५ वर्षांपूर्वी किशेर आणि सतीश या दोघांविरुद्ध चेंबूर पोलिसांनी ३२६, ११४, ३४ भादवी कलमांतर्गत एका गुन्ह्यांची नोंद केली होती, गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती, पोलीस कोठडीनंतर ते दोघेही न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना कुर्ला येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जामिन मंजूर केला होता, जामिनावर बाहेर आल्यानंतर ते दोघेही मुंबईतून पळून गेले होते, त्यानंतर ते दोघेही उत्तर प्रदेशात गेले, लखनऊ शहरात गेल्या २५ वर्षांपासून ते काम करीत होते.
दुसरीकडे त्यांच्या खटल्यात ते नेहमीच गैरहजर राहत होते, सुनावणीसाठी गैरहजर राहत असल्याने या दोघांविरुद्ध पोलिसांनी अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते, तसेच या खटल्यात त्यांना फरारी आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते, त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेशच न्यायालयाने दिले होते, त्यामुळे त्यांच्याविषयी पोलिसांकडून माहिती काढत होते, याच दरम्यान ते दोघेही बंधू त्यांच्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी चेंबूर येथील उमरशी बाप्पा चौक, शिवाजीनगर सहकारी सोसायटीमध्ये येणार असल्याची माहिती चेंबूर पोलिसांना मिळाली होती, या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून मंगळवारी एक वाजता या दोघांनाही अटक केली. या दोघांनाही बुधवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.