मुक्तपीठ टीम
नोटाबंदी होऊन आज ६ वर्षे झालीत, तरी दिल्लीत ६२ लाख रुपयांच्या जुन्या नोटांसह दोन जणांना अटक केली आहे. दिल्लीतील लक्ष्मीनगर परिसरात या दोन आरोपींकडे ५०० आणि एक हजार अशा एकूण ६२ लाख रुपयांच्या जुन्या नोटांचे अनेक बंडल सापडले. पोलिसांच्या चौकशीत या दोघांनी १४ लाख रुपयांच्या नव्या नोटा देऊन या जुन्या नोटा खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी या चलनी नोटा बदलून दिल्या जाणार आहेत का आणि या रॅकेटमध्ये सरकारमधील कोणी सामील आहेत, याची चौकशीची मागणी केली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या लोकांनी अनेक ठिकाणांहून जुन्या नोटा जमा केल्या होत्या आणि सुमारे २० लाख रुपयांना या जुन्या नोटा दुसऱ्या कोणाला तरी विकणार असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही बातमी सोशल मीडियावर पसरताच लोकांनी मीम्सही शेअर केले आहेत. एका यूजरने लिहिले की, काही स्मार्ट लोक मोठा गेम खेळत आहेत.
आतापर्यंत हे स्पष्ट झालेले नाही की, जुन्या नोटांचे हे काय करायचे आणि इतक्या जुन्या नोटा कोण ठेवत होते. नोटाबंदीनंतर लोकांना त्यांच्या जुन्या नोटा बदलून घेण्याची पूर्ण संधी देण्यात आली होती.
ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांचे पैसे बुडतील, कारण ते पकडले जाण्याच्या भीतीने ते पैसे घेऊन बँकेत जाणार नाहीत, असे समजले.
मल्लिकार्जुन खरगेंनी उडवली खिल्ली!!
- दुसरीकडे, काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ९९.९ टक्के जुन्या नोटा बँकांमध्ये परत गेल्या असल्या तरी, उर्वरित ०.१ टक्के अजूनही बाजारात असल्याची बातमी शेअर करताना खिल्ली उडवली.
- या चलनी नोटा बदलून दिल्या जाणार आहेत का आणि या रॅकेटमध्ये सरकारमधील कोण-कोण सामील आहेत, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.