Sunday, May 25, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पत्रकारांना हिणवल्याने कमजोर होत चाललंय लोकशाहीचं अस्तित्व!

HMV, DOD , प्रेस्टिट्यूट, गोदी मीडिया, ल्युटियन्स मीडिया, चहा-बिस्कीट...'पत्रकार' सोडून बरंच काही! असं का?

November 8, 2022
in featured, सरळस्पष्ट
0
Tulsidas Bhoite saralspastha Video

तुळशीदास भोईटे

“महाराष्ट्रातील उद्योग चाललेत…या फेक नॅरेटिव्हमध्ये काही राजकीय पक्ष, त्यांची एकोसिस्टीम आणि दुर्दैवाने बोटावर मोजता इतके चार-पाच HMV पत्रकार हे एकत्रितपणे…HMVचा अर्थ विचारता तुम्ही…His Master’s Voice! त्यांचे मास्टर्स कोण ते तुम्हाला माहिती आहे. हे HMV पत्रकार असे मिळून या सर्वांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातला!” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरळस्पष्ट शब्दात पत्रकारांसाठी HMV हा नवा शब्द वापरला. त्यानंतर सोशल मीडियामध्ये चर्चेला उत आला.

एकाही मुख्य माध्यमावर त्यावर अवाक्षरही उच्चारलं गेलं नाही. अपवाद वगळता कुणीही त्यावर मुख्य माध्यमांवर बोललेलं नाही. माझ्यासारख्या काही पत्रकारांनी त्यावरील मत एखाद्या न्यूज चॅनलच्या लाइव्ह चर्चेत स्पष्ट शब्दात मांडलं. तसे अपवाद वगळता फार काही झालेलं नाही. जे व्यक्त झाले ते समाजमाध्यमांवरच. दोन्ही बाजूने. त्यातही भाजपा समर्थकांनी खूपच तीव्रतेने यावर हर्षोल्हास व्यक्त केला. काही पत्रकारांची छायाचित्रंही पोस्ट करण्यात आली. मुंबई मराठी पत्रकार संघाने निषेध नोंदवला. तसे अपवाद वगळता अनेक पत्रकार संघटनाही शांत राहिल्या. प्रत्येकाला बहुधा वाटलं असावं, हे शब्द आपल्यासाठी नाहीत. उगाच आपण त्यावर बोलून आपल्याकडे बोट का ओढवून घ्यावं! गेली काही वर्षे पत्रकारितेत रोजगार संकट हे प्रचंड वाढलं आहे. त्यात पुन्हा मराठीत संधींची कमतरता. असुरक्षा जरा जास्तच.त्यात राजकीय हस्तक्षेपाने पद मिळणे आणि जाणे वाढल्याने स्वाभाविकच ही असुरक्षा जास्तच फोफावली आहे. आणि त्यातून मन मारुन गप्प बसणंही! त्यासाठी कुणाला दोष देता येत नाही. आपल्यासारख्याच असणाऱ्या पत्रकार मित्रांना तर नाहीच नाही!

HMV म्हणजे काय?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसाठी HMV म्हणजे His Master’s Voice शब्द वापरल्याने चर्चा सुरु झाली. त्यांनी अर्थही स्पष्ट केला. तसे ४-५ आहेत, असे बोलून सर्वच बिथरू नयेत, याचीही काळजी घेतली. पण त्यामुळे ते जे बोलले त्याची गंभीरता कमी होत नाही.

HMV ही गेल्या शतकातील ग्रामोफोन कंपनी. तिच्या लोगोमध्ये एक कुत्रा ग्रामोफोन समोर बसलेला दिसतो. आपल्या मालकाचा आवाज त्याला आवडतो. फडणवीसांनी स्पष्ट शब्दात या एचएमव्ही पत्रकारांचे मालक कोण, ते तुम्हाला माहित आहे, असे सांगत तिथं मात्र हातचं काही राखून ठेवलं नाही.

HMVच नाही आणखीही आहेत पत्रकारांसाठी विशेषणं!

फडणवीसांच्या आधीही पत्रकारांसाठी खूप वेगवेगळी विशेषणे वापरली गेलीत. त्यांच्यापैकी काहींबद्दलही मांडतो. HMV, DOD , प्रेस्टिट्यूट, गोदी मीडिया, ल्युटियन्स मीडिया, चहा-बिस्कीट अशी अनेक विशेषणं पत्रकारांसाठी राजकारण्यांकडून त्यांच्या ट्रोलर ब्रिगेडकडून वापरली जातात. त्यात भाजपाच नाही तर सर्वच पक्ष पुढे असतात. सर्व विशेषणं दिली जातात,’पत्रकार’ सोडून बरंच काही वापरलं जातं!

१ ) ल्युटियन्स मीडिया

भारतीय राजकारणात मोदी पर्व सुरु होताच २०१४मध्ये महाराष्ट्रातील नाही पण राष्ट्रीय पातळीवर भाजपाने
ल्युटियन्स मीडिया हा शब्द प्रचलित केला. ल्युटियन हे दिल्लीची रचना करणाऱ्या वास्तुरचनाकाराचे नाव. त्यांनी वसवलेल्या बंगल्यांमध्ये दिल्लीतील नाही तर देशीतील सत्ताधारी वास्तव्य करतात. त्यात काँग्रेस काळात जे राहत त्यांच्या इशाऱ्यावर चालणारा मीडिया तो ल्युटियन्स मीडिया असा भाजपाचा आरोप होता.

तसा मीडिया नव्हता का? होता. तेव्हा आपल्या पत्रकारितेत सर्वच सदगृहस्थ होते, असं म्हणणंच खोटेपणाचे ठरेल. तसं कधीच नव्हतं. नाही आणि नसणार! अनेकदा माझ्यासारख्या स्थानिक पातळीवरील पत्रकारांच्याही काही बातम्या राष्ट्रीय पातळीवर अचानक रद्द केल्या जायच्या तेव्हा कार्यालयातून अधिकृत नाही तर ऑफ द रेकॉर्ड तीच कुजबुज ऐकायला मिळायची. काहीवेळा सरकारविरोधात केलेलं एखादं खूप गाजावाजा झालेलं स्टिंग ऑपरेशन ऐनवेळी रद्द केलं जायचं, नंतर सावकाश वाफ निघून गेल्यावर चालवायचा निर्णय व्हायचा, तेव्हा तर पत्रकार त्वेषानं वरिष्ठांचा उद्धारही करत असत. भाजपाला पत्रकारितील काही ज्येष्ठ-श्रेष्ठांविषयी संशय निर्माण करण्याची संधी मिळाली, ती त्यातूनच! पत्रकारितेतीलच काही त्यावेळी जबाबदार होते, हे नाकारता येत नाही.

सत्तेशी सक्तीची भक्ती अपवाद होती, आता नियम!

असं असलं तरीही त्याचवेळी एक बाब नजरेआड करता येत नाही. सत्तेच्या इशाऱ्यावर चालणं आणि सत्ताहित पाहणं, सत्यापेक्षा सत्तेला महत्व देणं हे त्यावेळी चालायचं ते अपवादासारखं होतं. आता पत्रकारिता म्हणजे तीच असा नियम झाल्यासारखे काही वागतात, तसं तेव्हा नव्हतं. काही प्रमाणात डावललं जाणं होतं, पण नोकरी गमावणं क्वचितच होतं. आता ते सर्रास झालं आहे. हेही नाकारता येत नाही. अपवाद जेव्हा नियम बनतो, तेव्हा ते जास्त धोकादायक असतं. तिथं एक रेड अलर्ट मिळत असतो.

२) गोदी मीडिया

त्यानंतर भाजपाविरोधक शांत बसले असं नाही. मोदी सत्ताकाळाच्या काही वर्षातच त्यांनी एक विशेषण प्रचलित केलं. गोदी मीडिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जणू अवतार झाला आहे, ते जे सांगतात ते प्रमाण, त्यांचं फक्त चांगलंच दाखवायचं, काही चुकलं तरी सरकारवर टीका करायची नाही, अशा पत्रकारांना, माध्यम संस्थांना गोदी मीडिया म्हणून संबोधलं जावू लागलं.
अर्थात हे विशेषण ज्यांच्यासाठी वापरलं गेलं ते पत्रकार सत्तेच्या गोदीत म्हणजे कुशीत बसून वावरणारे नव्हते, नाहीत, असंही नाही. तसे पत्रकार आहेतच. तशा माध्यम संस्था आहेतच. त्यामुळेच थेट मोदी मीडिया असं न म्हणता गोदी मीडिया असं विशेषण वापरलं जाऊ लागलं. नव्हे आताही जोरात वापरात आहे.

मेरी मर्जी…

एक उदाहरण म्हणून सांगतो. ज्यांना गोदी मीडिया म्हटलं जातं, त्यांच्यापैकी एका पत्रकार महोदयांवर गंभीर आरोप आहेत. पण तरीही ते मोठ्या ब्रँड्सचे मोठे शो करत असतात. साध्या स्ट्रिंजरवर जर बाहेरच्या कुणीही, काहीही आरोप केला तरी, त्याची पडताळणी न करता संस्थांतर्गत राजकारणातून अनेकदा त्याचा किंवा तिचा बळी घेतला जातो. या महोदयांना मात्र मोठ-मोठ्या ब्रँडमध्ये मोठी-मोठी पदं मिळाली. त्यांनी नुकताच केलेला एक शो त्यांच्यावर होणाऱ्या टीकेचं कारण सांगण्यास पुरेसा आहे.
गुजरातमधील मोरबीचा पूल कोसळून शेकडो बळी गेले. या महोदयांनी तो पूल लोकांमुळेच कोसळला, असे दाखवत शो केला. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपाला क्लीनचीट दिली. त्याचवेळी लोकांनी त्यांच्या जुन्या शोचा व्हिडीओ काढला. त्यात त्यांनी भाजपाविरोधातील सरकारवर पूल कोसळल्याचं खापर फोडलं होतं.

अपवाद आता नियम झाला…

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. टीव्हीच्या भाषेत सांगायचं तर विझ्युअली रिच स्टोरी आहे. पण म्हणावं तसं कुणीच दाखवत नाही. असं उगीच घडत नसतं. काही कारण असतात. काँग्रेसच्या काळात अपवादानं जे घडायचं ते आता नियमानं घडत आहे. त्यातून अशा पत्रकार आणि माध्यमांना गोदी मीडिया या विशेषणाने हिणवलं जात आहे. आता स्थिती तर अशी की याविरोधात आता कुणी बोलत नाही. किंवा कुणाला ते खुपतही नाही.

३) प्रेस्टिट्यूट

भाजपा समर्थकांनी ल्युटियन्स मीडियानंतर जे विशेषण किंवा अतिशय गलिच्छ दूषण पत्रकारांसाठी प्रचलित केलं ते म्हणजे प्रेस्टिट्यूट! प्रॉस्टिट्यूट म्हणजे वारांगना. जो पैसे देईल त्याच्या लैंगिक इच्छांची पूर्तता करणारी. पत्रकारांसाठी प्रेस्टिट्युट शब्द वापरून भाजपा ट्रोलर आर्मीने जे पैसे देतात त्यांच्या इच्छापूर्तीसाठी पत्रकार वाट्टेल ते करतात, थोडक्यात त्या प्रॉस्टिट्यूट तसे पत्रकार प्रेस्टिट्यूट!

हा शब्द कुणी ट्रोलरने वापरला नव्हता तर देशाचे माजी लष्करप्रमुख आणि भाजपा सत्तेत संरक्षण राज्यमंत्री झालेल्या व्ही. के. सिंह यांनी वापरला होता.

खरंतर स्वत:च्या इच्छेविरुद्ध शरीर विकणाऱ्या वारांगनांची प्रॉस्टिट्यूटची वेगळी मजबुरी असते. तो आणखीच वेगळा विषय. पण तेवढ्या संवेदनशीलतेची अपेक्षा ट्रोलर मनोवृत्तीच्या राजकारण्यांकडून ठेवता येत नाही. त्यामुळे वाद झाला. पण त्याबद्दल कधी दिलगिरीही व्यक्त करावी, असं त्यांना वाटलं नाही.

४) चहा बिस्कीट

पत्रकारांसाठी तयार झालेला चहा बिस्कीट पत्रकार किंवा चाय बिस्कीट पत्रकार हा HMVच्या आधीचा भाजपा गोटातून पसरवला गेलेला शब्द. जो आजही वापरात आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरण सुरु होतं. नॅशनल मीडिया एका बाजूला आणि स्थानिक मुंबईकर पत्रकार एका बाजूला असा सामना त्यात रंगू लागला. कारण सुशांत सिंहला ओळखणारे मुंबईकर पत्रकार त्या प्रकरणाचे सर्व कंगोरे जाणून होते. ते वास्तव मांडत होते. मग अचानक फार वेगळ्या घडामोडी सुरु झाल्या. लव्ह, सेक्स, ड्रग आणि धोका असे बरेच टिपिकल हिंदी फिल्मी अँगल त्या कव्हरेजमध्ये घुसू लागले. त्यातून काही उतावळे पत्रकार त्यांचं खोटंपण उघड होऊ लागल्यानं अस्वस्थ झाले. त्यांनी स्थानिक पत्रकारांना चाय-बिस्कूट पत्रकार, असं हिणवलं. त्यातून चांगलाच वाद पेटला. तिथं मात्र मुंबईकर पत्रकारांनी आपला कणा दाखवला. कुणीतरी फेकलेल्या हाडकांना चघळण्यापेक्षा आम्ही चहा-बिस्कीटवालेच चांगले असं प्रत्युत्तर देण्यात आलं. आजही भाजपा समर्थक ट्रोलर सोशल मीडियावर वेगळं मत मांडणाऱ्या पत्रकारांना हिणवण्यासाठी चाय बिस्कीट पत्रकार हे विशेषण वापरतातच!

५) आता DOD! Dalal Of Delhi!!

HMV पत्रकारांचा वाद उसळल्यानंतर मुंबईतील पत्रकारांशी बोलताना एक नवा शब्द कानावर आला. DOD म्हणजे Dalal Of Delhi! महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एखादी भूमिका मांडली तर काही राजकारण्यांचे चाकर असल्याचे आरोप करत आम्हाला HMV हिणवलं जात असेल तर जे महाराष्ट्राच्या हिताचा विचार न करता दिल्लीतील भाजपा नेत्यांची तरफादारी करतात, सर्व मर्यादा ओलांडतात त्यांना DOD म्हणजे Dalal Of Delhi का म्हणू नये, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे! आता असे पत्रकार नाहीत का? असेही पत्रकार आहेतच.

जसे काही पत्रकार भाजपाची विचारांधतेतून पाठराखण करतात, तसेच काही पत्रकार भाजपाविरोधातील काही पक्षांची विचारांधतेने पाठराखण करतात! त्यामुळे भाजपाविरोधी तशा पत्रकारांना जर HMV म्हणजे His Master’s Voice म्हटलं जात असेल, तर महाराष्ट्रहितापेक्षा केवळ भाजपाहित लक्षात घेऊन दिल्लीतील नेत्यांचा कारभाराचं आंधळं समर्थन करणाऱ्यांना DOD म्हणजे Dalal Of Delhi म्हणण्यात गैर काय? असा प्रश्नही विचारण्यात येतो.

‘पत्रकार’ सोडून बरंच काही! असं का?

त्यामुळे फडणवीसांनी वापरलं ते HMV हे काही पत्रकारांसाठी वापरलं गेलेलं पहिलंच विशेषण नाही. याआधीही खूप शब्द वापरले गेलेत. वापरले जातात. वापरले जातीलही. हे सारं जरी खरं असलं तरी ही सर्व विशेषणं वापरण्यामागचं कारणही लक्षात घेतलं पाहिजे. काहीतरी आपलं पत्रकारांचंही चुकत आहेच. पण ते एवढं चुकत नाही, जेवढं भासवलं जातं. बदलत्या काळानुसार समाज बदलत आहे आणि त्या समाजाचाच घटक असणारे पत्रकारही. पण तसे तर सर्वच बदलत आहेत. आम्ही पत्रकारांनी नेहमी टीका करणाऱ्या जागल्याच्या भूमिकेत असणं अभिप्रेत असतं. इतर सर्वांवर टीका करणाऱ्या पत्रकारांवर टीका होणेही गैर नाही. पण ही टीका केवळ कामांचं मूल्यमापन करून नाही, तर हेतूपुरस्सरपणे होऊ लागते, तेव्हा वेगळी भीती निर्माण होते. अशी विशेषणं देणं हा काही पत्रकारांचीच नाही तर एकंदरीतच आपल्या पत्रकारितेची विश्वासार्हताही संपण्याचा एक सुनियोजित प्रयत्न तर नाही ना, असाही संशय घ्यायला वाव आहे. त्याचं कारण हा प्रयोग केवळ पत्रकारितेच्या बाबतीत होत नाही, तर लोकशाहीच्या सर्वच स्तंभांच्याबाबतीत होताना दिसतो. मग ते न्यायालय असो इतर.

अर्थात आजचा मुद्दा पत्रकारितेचा असल्यानं त्यावरच येतो. आपल्या पत्रकारांच्याही चुका आहेत. आजचेच चुका करतात असे नाही तर आधीचेही चुका करायचेच. पण सर्वच पत्रकार तसे आहेत का? आजही पत्रकारितेत बहुसंख्या ही कोणतीही बांधिलकी न पत्करता, सत्तेशी नाही तर सत्याशी इमान राखत पत्रकारिता करणाऱ्यांचीच आहे. त्यांना त्याचा त्रासही भोगावा लागतो. उलट गोदी मीडियावाले असो वा ल्युटियन्सवाले त्यांनाच सर्व लाभ मिळत असतात.

सर्वच नेत्यांना HMVच लागतात!

पत्रकारितेतील ती एक प्रवृत्ती आहे. पण वास्तव हेच आहे की राजकीय पक्ष कोणताही असो त्यांच्या नेत्यांना आपल्याभोवती असेच पत्रकार लागतात. नव्हे अशा पत्रकारांनाच सभोताली ठेवलं जातं. तरीही मग अशी टीका केली जाते, त्याचं कारण मुळातच पत्रकारिता ही कणा असलेली कुणालाच नको आहे. प्रत्येकाला आता सरपटणारे आपले वाटतात. पत्रकारांनी प्रश्न विचारलेले आवडत नाही. विचारले तरी ते आपण दिलेलेच किंवा आपल्याला सोयीचे असणारेच असे वाटते. तसे सदासर्वदा शक्य नसतं. टीका होते. उघडं पाडलं जातं.

…तरीही सत्याशी इमान राखणारे जास्त!

एखादा पत्रकार सत्तेशी इमान राखत पूल लोकांमुळेच पडल्याचं मांडत असेल तर इतर अनेक पत्रकार वास्तवही मांडतात. संबंधित कंपनीने दोन कोटींपैकी फक्त १२ लाख खर्च करत दुरुस्तीऐवजी रंगरंगोटीलाच दुरुस्ती भासवल्याचं गंजलेल्या तुटक्या तारा दाखवत उघडंही पाडतात.

रणनीती ओळखा!

सत्य मांडणं हे कोणत्याही सत्तेला आवडत नाही. आजच्या तर नाहीच नाही. त्यातूनच मग सोपा मार्ग काय, तर पत्रकारितेविषयीच संशय निर्माण करा. आधी काहींना विशिष्ट विशेषणं वापरत पिंजऱ्यात उभं करायचं. आणि मग हळूहळू संपूर्ण पत्रकारितेविषयी संशय निर्माण करायचा. असं सातत्यानं करत राहिलं की गोबेल्स तंत्राने लोकांना तेच खरं वाटेल. पत्रकार जे मांडतील ते खरं आहे का, याविषयीच लोकांच्या मनात कमाल संशय तयार होईल. असा एक दूरगामी प्रयत्न राजकीय नेत्यांच्या विशेषणांच्या माऱ्यामागे असला, तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. त्यातूनच मग पत्रकारितेच्या विश्वासार्हतेलाच संपवायचं, असाच डाव असावा.

वेळीच सावध होणं गरजेचं!

त्यामुळे आपण पत्रकारांनी आणि समाजातील इतर जाणत्यांनी या विशेषणबाजीचा गंभीरतेनं विचार करण्याची गरज आहे. थांबवून कुणी थांबणार नाही. पण किमान लोकांच्या मनात टीकेमागचे हेतू आले तरी त्यातून विशेषणांमुळे निर्माण होणारा संशयकल्लोळ आणि त्यातून साध्य होणारी राजकीय इप्सितसिद्धी रोखली तर नाही जाणार, पण किमान एका मर्यादेत राहू शकेल. आपण पत्रकारांनी त्यासाठी वेळीच सावध होणं गरजेचं आहे.

पत्रकारितेची विश्वासार्हता संपवणे राजकीय नेत्यांसाठीही घातक!

राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी किंवा खरोखरच जाणीवपूर्वक लक्ष्य करणाऱ्या काही पत्रकारांवर थेट आरोप करत सर्वच पत्रकारांवर जरब बसवण्यासाठी किंवा अंकित करण्यासाठी…कारण काहीही असो. राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष तर नाही तर अप्रत्यक्षही पत्रकारांना भलती विशेषणं वापरत पत्रकारितेची विश्वासार्हता संपवण्याचा प्रयत्न करणे, हे त्यांच्यासाठीही घातक आहे. सत्ता येते जाते. सत्य हे कायम साथ देतं. पत्रकारितेला संशयाच्या भोवऱ्यात आणून विश्वासार्हता संपवली, तर उद्या तुम्ही केलेले आरोप, दावे त्याच पत्रकारांकडून ऐकताना कोण विश्वास ठेवेल? तसेच सत्ता नसताना दुसऱ्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला तुम्ही आता करता त्याच पद्धतीनं त्रास देण्यास सुरुवात केली तर कोण साथीला असणार आहे? विश्वासार्हता संकटात आणलेल्या पत्रकारितेनं साथही दिली तर लोक कसा विश्वास ठेवतील?

फडणवीसांसारख्या ‘लंबी रेसचा घोडा’ असणाऱ्या नेत्यांनी असं करूच नये!

दुसरं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मोठी क्षमता असलेल्या नेत्यानं तर असे करूच नये. ज्यांना भविष्यात देशाच्या नेतृत्वाची क्षमता आहे, तशी महत्वाकांक्षा आहे, त्यांनी जोडत जावं, तोडू नये. महाराष्ट्र भाजपातूनच नाही तर दक्षिण पश्चिम भारतातून त्यांचंच नाव राष्ट्रीय नेतृत्वासाठी चर्चेत असतं.

सध्या नेत्यांच्या भाषणातून हेडलाईन्स, ब्रेकिंग निघावी, यासाठी अनेक स्क्रिप्टरायटर असतात. ते चटपटीत लिहितात. देतात. काहीवेळा नेतेही ब्रेकिंग होईल असंच बोलतात. पण ते लिहिताना किंवा बोलताना प्रत्येकानं त्यामुळे भविष्यासाठी काही प्रतिकुल ब्रेकिंगची बीजं पेरली जावू नयेत, याची काळजी घ्यावी, असं वाटतं. आपल्याच मार्गात भविष्यात काट्यांचं काम करतील असं काही आपण वर्तमानात न करणंच चांगलं. त्यातही डिजिटल युगात जेव्हा कोणी बोललेलं, लिहिलेलं काहीच पुसलं जात नसतं, विसरवता येत नसतं, तेव्हा तर नक्कीच!

जाता जाता आम्हा पत्रकारांसाठीही…

आम्ही पत्रकारांनीही काही पथ्य पाळलं पाहिजेच. आमच्यातील बहुतेक पत्रकार सडेतोड भूमिका मांडतात. पण आज आम्ही ज्यांच्याबाजूने ती भूमिका जाते, उद्या ते चुकले तरी त्यांच्याबाजूनेच मांडायचं, असं न करण्याचं पथ्य पाळलंच पाहिजे. अशा पत्रकारांना त्यामुळे नेते जवळ करत नसतील, कुणाचे खास आहेत, असा दर्जा लाभत नाही. पण किमान उगाच कुणी पत्रकारांना हिणवू लागलं, चुकलं तरी तर काळजी न करता स्पष्ट बोलण्याचा आपला हक्कही अबाधित राहतो.

आज देवेंद्र फडणवीस काही पत्रकारांना HMV बोलले, काहींनी चहा-बिस्कीट पत्रकार असा मुंबईकर पत्रकारांचा उद्धार केला, तेव्हा ज्यांना हर्षोल्हास झाला, त्या आपल्याच पत्रकार मित्रांनी शांतपणे विचार करावा, असं वाटतं. आज त्यांच्या भूमिकांमुळे जर तुम्ही खूश होत असाल, समर्थन करत असाल तर तुम्हालाही DOD म्हणजे Dalal of Delhi असं म्हटलं तर कसं वाटेल? ते मालकांचे ऐकणारे कुत्रे तर तुम्ही दिल्लीचे ऐकणारे दलाल…विशेषणं खूप असतात. तेच गोदी मीडिया म्हणून वाट्टेल त्याला हिणवणाऱ्यांनाही!

पत्रकारांनी काळजी जास्त घ्यावी!

आपण पत्रकार तर शब्दांचे सौदागरच! वाट्टेल तेवढे, वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तसे आणि वाट्टेल ते शब्द वापरू शकतो. पण मुळात आपण पत्रकार आहोत हे विसरूया नको. पत्रकारितेमुळेच आपण जे काही आहोत ते आहोत. विश्वासार्हता हाच पत्रकारितेचा प्राण आहे. तीच जर संपली तर पत्रकारिताही संपेल. जी उरलेली असेल ती निष्प्राण कलेवरासारखीच असेल. वेळीच सावध होवूया. राजकारण्यांशी मैत्री जरूर ठेवूया. माझीही आहेच. पण पत्रकारिता करताना पत्रकार म्हणूनच वावरुया. पत्रकारितेशीच इमान राखूया. तर आणि तरच आपलं आणि लोकशाहीचंही अस्तित्व बळकट राहिल! उगाच काही तरी अतिरंजित नाही. एकाही स्तंभाचं अस्तित्व संकटात तर लोकशाहीचं अस्तित्व संकटात.

लहान तोंडी मोठा घास घेतलाही असेल. पण तो आवश्यक होता!

Tulsidas Bhoite

(तुळशीदास भोईटे हे प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तीन माध्यमांचा तीन दशकांचा अनुभव असलेले पत्रकार आहेत. टीव्ही चॅनल्समधील महत्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच ते मुक्तपीठ या मुक्तमाध्यमाचेही संस्थापक संपादक होते. सध्या एका नव्या माध्यम उपक्रमाची जबाबदारी ते सांभाळत आहेत.)

संपर्क 9833794961, email tulsidasv@gmail.com / twitter – @TulsidasBhoite

सौजन्य – कोलाज www.kolaj.in


Tags: DODGodi MediaHMVjournalistProstitutesaralspashtatulsidas bhoiteपत्रकारसरळस्पष्ट
Previous Post

तुम्हालाही जास्त डास चावतात? असं का? शास्त्रज्ञांनी शोधले कारण, जाणून घ्या….

Next Post

डॉक्टरांसाठीची बाँड पॉलिसी रद्द होणार! नॅशनल मेडिकल कमिशनची शिफारस

Next Post
Doctor Bond Policy

डॉक्टरांसाठीची बाँड पॉलिसी रद्द होणार! नॅशनल मेडिकल कमिशनची शिफारस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra
featured

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

by Tulsidas Bhoite
May 24, 2025
0

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

April 8, 2025
जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!