तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
दिल्लीच्या सिंघू सीमेवर पंजाबमधून आलेल्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याची जबाबदारी एका अतिआक्रमक अशा धार्मिक समूहानं घेतल्याची बातमी आहे. सकाळपासून काही या अमानुष हत्येचे व्हिडीओही वायरल होत आहेत. ते पाहून अमानुषता हा शब्दही सौम्य वाटतो. त्या तरुणाने धार्मिक ग्रंथांचा अपमान केल्यामुळे त्या धार्मिक समूहाने हत्या केल्याचा दावा केला जात आहे. कारण काहीही असो. भारतासारख्या घटनेनं चालणाऱ्या देशात अशा तालिबानी क्रुरतेला खपवून घेतले जाऊच नये. जेथे घटना घडली ते ठिकाण दिल्ली पोलिसांच्या किंवा हरियाणा पोलिसांच्या अख्यतारीत येत असावं. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली न येता आतापर्यंत व्हिडीओत दिसलेल्यांना ताब्यात घेऊन हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना जेरबंद केले गेले असावे अशी अपेक्षा आहे. ते झालं नसेल तर होईलही! नव्हे झालंच पाहिजे!!
नेमकं काय घडलं?
- संयुक्त किसान मोर्चाच्या मंचाजवळच्या भागात एक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.
- ठार झालेल्या तरुणाचा एक हातही कापला गेला आहे.
- मीडिया रिपोर्टनुसार, त्या तरुणावर धर्मग्रंथाची नासधूस केल्याचा आरोप आहे.
मात्र, हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचेही सांगितले जात आहे. - सिंगू सीमेवरील हत्येनंतर संयुक्त किसान मोर्चाने आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
- या क्रूर हत्या प्रकरणाची जबाबदारी एका धार्मिक गटाने घेतली आहे.
लखवीर सिंग असे त्याचे नाव असून तो पंजाबमधील तरन तारनचा रहिवासी असून मजूर म्हणून काम करतो.
पोलीस तपास सुरु
- सोनीपतचे डीएसपी हंसराज यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पोलीस स्टेशन कुंडलीमध्ये माहिती मिळाली होती की, शेतकरी आंदोलनाच्या स्टेजजवळ एका व्यक्तीचे हात आणि पाय लटकले आहेत.
- पोलिसांनी घटनास्थळी पोहचून लोकांची चौकशी केली पण अद्याप काहीही उघड झालेले नाही.
- अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. तपास सुरू आहे.
- मीडिया रिपोर्टनुसार, तरुणावर आरोप आहे की, त्याला कटानुसार कोणीतरी येथे पाठवले असावे.
- यासाठी त्याला पैसेही देण्यात आले असावे. येथे पोहोचल्यानंतर त्याने पवित्र गुरु ग्रंथ साहिबचे तुकडे केले.
- याबाबत माहिती मिळताच काहींनी त्याला पकडले आणि जवळच्या ट्रॅक्टर एजन्सीकडे ओढले.
तरुणाची निर्घृण हत्या करताना व्हिडीओ
- मीडिया रिपोर्टमध्ये असेही सांगितले जात आहे की, तरुणाला ओढून चौकशी करण्यापर्यंत एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
- असेही सांगण्यात येत आहे की, तरुणाच्या मृतदेहाला शेतकऱ्यांच्या व्यासपीठावर लटकवल्यानंतर काही लोक त्याला खाली काढू देत नव्हते.
- पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली आणला आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला.
केंद्र सरकारने गंभीर दखल घ्यावी!
देशात हिंसाचार कोठेही होवो, कोणीही करो, सरकारी यंत्रणेने गंभीर दखल घेतलीच पाहिजे. त्यातही पुन्हा कुणी अमानुष वागत असेल. निर्घृण हत्या करत असेल तर अशा विकृतांना मोकळे सोडता कामा नये. सिंघू सीमेवर ज्यांनीही त्या तरुणाची हत्या केली असेल त्यांना अद्दल घडवलीच पाहिजे. वादा करता त्या तरुणाने धर्मग्रथांचा अपमान केला, असे मान्य केले तरीही त्या गुन्ह्यासाठी शिक्षा देण्यासाटी भारतात न्याययंत्रणा आहे. इतर कुणालाही कायदा हाती घेण्याचा अधिकार नाही म्हणजे नाहीच!
सिंघू सीमेवरील अमानुषतेप्रमाणेच लखीमपूरचं हत्याकांडही विसरू नका!
सिंघू सीमेवर एका तरुणाची निर्घृण हत्या होताच काहींना चेव चढला आहे. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली दहशतवादी, गुन्हेगार कारवाया करीत असल्याचे दाखवत केंद्रातील भाजपा सरकारची बाजू घेण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. पत्रकारितेत काहींची अवस्था ही लाज वाटावी इतकी वाईट झाली आहे. लखीमपूर हिंसाचाराच्यावेळी असलेले रंग या सरड्यांनी झपाट्यानं बदलले. तेथे मारेकरी असल्याचा आरोप असलेले सदगृहस्थ हे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे सुपुत्र आशिष मिश्रा असल्याने यांची दातखिळी बसली होती. मुळात ते घटनास्थळी नसतानाही त्यांना आरोपी केले गेले असा आव आणला गेला. पण पुढे व्हिडीओ पुरावे मिळताच भाजपा सरकारने कसे भाजपाच्याच मंत्र्याच्या मुलावर कारवाई केली, असे टिऱ्या बडवणे सुरु झाले. मुळात हिंसाचार हा हिंसाचारच असतो. तो कोणीही केलेला का असेना. पण सरड्यांना रंग बदलणे जमत असल्याने त्यांच्यासाठी आरोपी आणि पीडित कोण हे पाहूनच भूमिका ठरवणे सोपे असते. सिंघू सीमेवर त्या तरुणाची ज्यांनीही निर्घृण हत्या केली असेल त्यांना अद्दल घडवाच घडवा.
सिंघूतील एका तरुणाची हत्या असो वा लखीमपूरमधील आठजणांची. न्याय एकच असला पाहिजे. शेतकऱ्यांना चिरडण्याचा आरोप असलेला माजोर्डा मंत्रीपुत्राप्रमाणेच पत्रकाराची हत्या करणारे, भाजपा कार्यकर्त्यांना संपवणारे ते कुणीही असले तरी त्यांना कायद्यानं अद्दल घडवाच घडवा. आज कपिल सिबल यांनी आर्यन खानच्या प्रकऱणामुळे लखीमपूरच्या शेतकरी हत्याकांडाकडे दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा मांडला. योग्यच आहे. तसेच आता सिंघूतील एका तरुणाची शेतकरी आंदोलनस्थळी निर्घृण हत्या झाल्याने लखीमपूरमधील चार शेतकऱ्यांच्या हत्येचे गांभीर्य कमी केले जाऊ नये. काही दलालांचा प्रयत्न तोच दिसतो. तो तरुण, लखीमपूरमधील शेतकरी आणि इतर चार अशा सर्व नऊ जणांच्या मारेकऱ्यांना कायद्याने अद्दल घडवली जाणे आवश्यकच आहे. एकालाही मोकळे सोडू नका. हा भारत आणि अफगाणिस्तान नाही. इथे बाबासाहेबांचं संविधान चालतं, दहशतवाद्यांचे तालिबान नाही, हे दाखवण्याची संधी आहे. ती सर्वांनाच जरब बसवणारी असावी, एवढीच अपेक्षा!
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ या मुक्त माध्यम उपक्रमाचे संपादक आहेत.)
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite