तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
“मावळे असतात म्हणून राजे असतात,” असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती यांना अपक्ष लढण्यासाठी पाठिंबा नाकारली तेव्हा म्हटलं. शिवसेनेचा कडवट मावळा असलेल्या कोल्हापूरच्याच संजय पवारांना उमेदवारी उमेदवारी जाहीर झाली. चांगलंच झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात जन्माला आलेल्यांनी कुणाकडूनही काही मागायचं नसतं, तर स्वत:च्या मनगटातील आणि डोक्यातील ताकदीच्या बळावर मिळवायचं असतं. नाही तर उगाच मिरवण्यासाठी वारसा असं वाटतं. तसं नसावंच. संभाजी राजे छत्रपतींनाही तसं नकोच असणार. त्यामुळेच त्यांनी पक्षीय उमेदवारी नाकारली असावी. आता ते छत्रपतींचा वारसा चालवत दिल्लीवर स्वारी करण्यासाठी आपल्या कोल्हापूरातील संजय पवार या मावळ्यामागे बळ उभे करतील, अशी अपेक्षा आहे.
आज निमित्त संजय पवारांचं..
आज या विषयावर लिहितोय, त्याचं कारण संभाजी छत्रपती नाही. तर संजय पवार आहे. या माणसाला बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. सामान्य शिवसैनिक. नगरसेवकही झाले. पण कधी ऊतमात, डोक्यात सत्ता गेली. असं दिसलं नाही. शिवसेनेने कोल्हापुरात अगदी धनंजय महाडिकांपासून अनेक प्रस्थापितांना दत्तक घेतलं पण सत्ताबंधनासाठी आलेले सत्ता नाही म्हणताच शिवसेनेचं बंधन न जुमानता दुसऱ्यांच्या तंबूत गेले. संजय पवार मात्र निष्ठेनं शिवसेना आणि जनतेसोबतच राहिले. फार काही न मिळताही, हे विशेष!
सामान्य शिवसैनिक उमेदवार असल्याने पाठिंब्यात कुचराई…
त्यातच बातमी आली. भाजपा म्हणते आमचं मॅनेजमेंट झालेलं आहे. ते अमरावतीचे बिनबुडाचे रवी राणा बोलतात अपक्षांशी आमचं बोलणं झालेलं आहे. मध्येच वसई-विरार-नालासोपाऱ्याच्या ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला वाटलं की आता पाठिंबा भाजपालाच. खरंतर संघर्ष दोन मातब्बर राजकारण्यांमधील असता, तर असं एका बाजूने लिहावं असं डोक्यातही आलं नसतं. पण एक सामान्य कार्यकर्ता आणि एक मातब्बर नेता असा संघर्ष जेव्हा उभा राहतोय तेव्हा त्या कार्यकर्त्याच्या हितासाठी भूमिका मांडणं आवश्यक वाटतं.
शिवसेनेनं काय करावं हा शिवसेनेचा प्रश्न आहे. त्यांचे नेते शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यासाठी समर्थ आहेत. पण तरीही संजय पवारांविषयीच्या आपुलकीतून काही सुचवावंसं वाटतं.
सामान्य शिवसैनिकाला सुरक्षित ठेवा!
शिवसेनेच्या दोन उमेदवारांपैकी पहिले म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत. शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ. महाविकास आघाडीची मोट बांधणारे चाणक्य म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, ते संजय राऊत. शिवसेनेची अडचण ही सहाव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठीची आहे. तिथंच नेमका अर्थबळ नसणारा संजय पवार हा सामान्य कार्यकर्ता शिवसेनेचा दुसरा उमेदवार आहे. शिवसेनेने क्रम बदलावा. सुरक्षित मतांचा कोटा संजय पवारांना देत संजय राऊतांना दुसऱ्या म्हणजे सहाव्या उमेदवारीवर आणावं.
संजय राऊतांना धोका नाही!
संजय राऊतांसारखा खमका नेता, वक्ता, प्रवक्ता राज्यसभेत म्हणजे राष्ट्रीय राजकारणात म्हणजे संसदेत पाहिजेच पाहिजे. त्यामुळे त्यांना धोका होईल, असं मी कदापि सुचवणार नाही. पुन्हा आजवर शिवसेना किंवा अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी दिली, त्या कोणाही पत्रकारापेक्षा सरसच नाही तर खासदार म्हणून खरीखुरी कामगिरी ही महाराष्ट्रातून तरी फक्त आणि फक्त संजय राऊतांनीच बजावली आहे. एक पत्रकार ते खासदारच नाही तर सक्षम नेता अशी झेप घेणारे ते एकमेव पत्रकार आहेत. तसे सांगण्यापुरते खूप पत्रकार आहेत. पण त्यांच्यासारखे तेच! त्यामुळे ते संसदेत पाहिजेच पाहिजे. त्यामुळेच ते असले तर धोका होणारच नाही असं सुचवत आहे.
संजय राऊत असले तर सहावी जागा शिवसेनेचीच, आघाडीचीच!
लक्षात घ्या मी का सांगतो ते. संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. पण त्यांची मैत्री ही सर्व पक्षीयांशी आहे. भाजपा सोडून. शिवसेनेबाहेर असलेल्या त्यांच्या मैत्रीमुळे सर्वात मोठा एक अपप्रचार जो कोल्हापूरातून सुरु आहे तो थांबेल. तो काय आहे. असं पसरवलं जातं की मागे शरद पवार यांनी धनंजय महाडिकांना लोकसभेची उमेदवारी दिली. पण राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी वेगळंच ठरवत त्यांचं गाठोडं बांधलं. पराभवानंतर घायाळ महाडिकांनी पवारांनी सांगूनही वेगळा मार्ग स्वीकारला. पण आता म्हणे त्याचं परिमार्जन केलं जाईल. धनंजय महाडिकांना पाडण्यासाठी खास पॉवर गेम न करता जिंकण्याची संधी दिली जाईल.
संजय राऊत सहावे उमेदवार तर ‘पॉवरफुल’ ठरणार!
या साऱ्या टिपिकल अफवा असतील. पण राजकारणात अशा अफवाही घातक ठरतात. त्यामुळे संजय राऊत जर सहावे उमेदवार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसची अतिरिक्त मते १०० टक्के आपुलकीनं संजय राऊतांनाच मिळतील. संजय राऊत बाळासाहेबांनंतर ज्यांना मानतात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार काहीही करून त्यांच्या मागे बळ उभे करतील. त्यांना निवडून आणतीलच आणतील.
संजय राऊतांसाठी ठाकुरांच्या बविआची ३ मतेही फिरणार!
तेवढंच नाही. वसई-विरार-नालासोपारा भागातील ठाकूर कंपनी आणि संजय राऊत यांचं समीकरण खूप चांगलं आहे, असं म्हटलं जातं. संजय राऊत जर सहावे उमेदवार असतील तर बहुजन विकास आघाडीची तीनही मते ही फक्त आणि फक्त संजय राऊत आणि संजय राऊतांनाच मिळतील. शिवसेनेची तीन मते हमखास वाढतील.
संजय राऊतांना धोक्यात भासवण्यात शिवसेनेचा फायदा!
त्यामुळेच खरंतर स्वत: संजय राऊत यांनी त्यांची खासदारकी धोक्यात आहे, असे भासवणारी आणि प्रत्यक्षात शिवसेनेची दुसरी खासदारकी पक्की करणारी चाणक्य नीती वापरावी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिकाला खासदार करण्यासाठी एवढा छोटासा बदल करावाच करावा. प्राधान्यक्रम ठरवताना संजय पवार हे शिवसेनेच्या कोट्यातील पहिल्या ४२ मतांचे उमेदवार आणि शिवसेनेची, मित्र पक्षांची अतिरिक्त मतांसह संजय राऊत हे दुसरे उमेदवार असा बदल करावा. ही रणनीती शिवसेनेला १०० टक्के विजय मिळवून देणारी ठरेल. यात आघाडीचाही फायदा, शिवसेनेचाही फायदा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका शिवसैनिकासाठी स्वत:ला धोक्यात आणत लढणारे नेते म्हणून शिवसैनिकांच्याच नाही तर राज्यातील सर्वच सामान्य कार्यकर्त्यांच्या काळजात संजय राऊतांचे नाव कोरलं जाईल.
प्रश्न एवढाच आहे…
जे सामान्य पत्रकाराला कळतं, ते मोठ्या नेत्यांना कळतच नाही का? की लढण्याचा आव आणताना कोल्हापूरातून पसरतंय तसे मनात भलतेच भाव आहेत?
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
संपर्क ट्विटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961