तुळशीदास भोईटे सरळस्पष्ट
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची आज सकाळी पत्रकार परिषद झाली. तशी रोजच होत असते. दैनिक सामनासारखं वृत्तपत्र पक्षाचं मुखपत्र असतानाही सतत चर्चेत राहतं ते राऊतांचं लिखाण आणि आकर्षक मथळ्यांमुळे. राजकारणात महत्वाचं स्थान मिळवूनही संजय राऊतांना दैनिक सामनाचं कार्यकारी संपादक मोठं वाटतं आणि केवळ तो त्यांचा शिवसेनेच्या राजकारणातील मुरब्बीपणा नसून ते त्या पदाचं महत्वही ओळखतात. ते मनापासून त्या कामात लक्षही घालतात. त्यातूनच सामनाच्या आवृत्त्या कमी झाल्या तरी चर्चा मात्र वाढतीच राहिली. भाजपाच्या विचारांशी बांधिलकी राखणारा मुंबईतील तरुण भारत प्रिंट स्वरुपात हळूहळू मंदावत गेला असताना दैनिक सामनाचं चर्चेत राहणं हे उल्लेखनीयच!
संजय राऊतांच्या पत्रकारितेची महती सांगण्याचं कारण त्यांना बातमी आणि मथळ्याचं महत्व चांगलंच कळतं, हे सांगण्याचा आहे. त्यामुळेच रोज सकाळी ते कॅमेऱ्यांना सामोरे जातात, तेव्हा जे बोलतात त्यातून मिळालेली बातमी न्यूज चॅनल्सवर हेडलाईन्समध्ये झळकतेच झळकते. आजवर तरी त्यांच्या तोंडी क्वचितच अपशब्द आला असावा. एकदा हरामखोर शब्द वापरल्यानंतर त्यांनी त्याचा त्यांना अभिप्रेत असणारा अर्थ नॉटी असल्याचे सांगून वेळ मारून नेली. आज मात्र बोलता बोलता ते संतापाने त्यांच्यावर शरद पवार यांना खुर्ची दिली म्हणून टीका करणाऱ्या अतुल भातखळकरांसारख्या भाजपा नेत्यांना ‘चुतिया’ म्हणालेत. ते संतापाशिवाय तसं बोलणं शक्यच नव्हते. (हे शब्द वापरणे योग्य नाही, पण वाचकांना ते शब्द कळावेत म्हणून जसे म्हटले तसे देत आहोत. संजय राऊत यांनी त्याचं समर्थनाची भूमिका घेतलेली आहे. ते ट्वीटही सोबत जोडले आहे.)
नेमकं काय घडलं, काय बिघडलं?
- संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भाजपाविरोधातील पक्षांच्या १२ खासदारांचं निलंबन करण्यात आले आहे.
- सत्ताधारी भाजपाच्या कारवाईविरोधात विरोधकांकडून संसदेच्या आवारात धरणे आंदोलन केले जात आहे.
- या खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भेट दिली.
- त्यावेळी पवार यांना बसवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खुर्ची आणून दिली.
- राऊत पवारांसाठी खुर्ची आणून देतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- या फोटोवरून भाजपा आमदार अतुल भातखळकर, नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
- त्यांचे खरे गुरु आता ठाकरे नसून पवार आहेत, अशी बोचरी टीका केली आहे.
संजय राऊतांचा शिवीसह संताप!
संजय राऊत हे शिवसेनेचे नेते, खासदार आहे. पण पत्रकार आहेत. संपादकही. त्यामुळे ते आकर्षक हेडिंग मिळवून देणारं बोलतात पण मर्यादा ओलांडणारं नसतं. आज मात्र त्यांनी चुतिया, चुतियागिरी हे शब्द वापरले. यातून त्यांचा संताप दिसतो. संताप स्वाभाविकही आहे. पण हे शब्द वापरणे योग्य नाहीच. तरीही ‘हरामखोर’ हा शब्द वापरून केलेल्या चुकीनंतर त्यांनी पुन्हा तीच चूक केली.
संजय राऊत यांना सर्व चालेल, परंतु त्यांच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेविषयी कुणी संशयही घेतलेला त्यांना खपणार नाही. साप्ताहिक लोकप्रभामधील एका पत्रकाराला बाळासाहेबांच्या प्रेमामुळेच आधी सामनासारख्या दैनिकाचे कार्यकारी संपादक पद, सातत्यानं खासदारकी, शिवसेनेचे नेतेपद हे सारं मिळत राहिलं ते फक्त ठाकरे आणि शिवसेनेमुळेच याची त्यांना जाण आहे. त्यांच्या बोलण्यातून ते सातत्यानं जाणवतं. स्वाभाविकच गेले काही दिवस सातत्यानं शरद पवारांशी असलेल्या जवळीकीचा उल्लेख करत त्यांच्या शिवसेनेवरील, ठाकरेंवरील निष्ठेविषयी संशय निर्माण करण्याचे काम केले जात असल्याने ते अस्वस्थ झाले असावेत. त्यातूनच त्यांच्या तोंडून नको ते शिवी म्हणावी असे शब्द वापरले गेले असतील.
राऊतांच्या शिवी देण्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे समर्थन पवार-फडणवीसही करणार नाहीत!
अर्थात कारण काहीही असलं तरी शिवी देण्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन कुणीही करणार नाही, एवढं नक्की ! तसेही ते सामनाचे संपादक आहेत लोकसत्ताचे नाहीत! नाही तर पद आणि पत यामुळे शरद पवारांनीच नाही तर देवेंद्र फडणवीसांनीही त्यांना महापुरुषांच्या चारित्र्य हत्येचंही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य केलं असतं!
संजय राऊतांनी पवारांना खुर्ची देणं योग्य की अयोग्य?
अर्थात संजय राऊतांचा संताप योग्य की अयोग्य, याबद्दल विश्लेषण करतानाच त्यांची मुळातील शरद पवारांना खुर्ची आणून देण्याची कृती योग्य की अयोग्य त्यावरही चर्चा आवश्यक आहेच.
शरद पवार हे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील एक मोठे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान आणि कर्तृत्व लक्षात घेता कोणीही त्यांचा मान राखणं गैर वाटत नाही. आपली संस्कृती हेच सांगते. त्यातही संजय राऊत म्हणतात, तशी शरद पवार यांची आरोग्य समस्याही लक्षात घेतली तर त्यांना उभे राहू देण्याऐवजी खुर्ची देणं गरजेचंच होतं. त्यांना खुर्ची दिलीच पाहिजे होती. इतर कुणी जर ती व्यवस्था केली नसेल तर राऊतांना समस्या माहित असल्याने त्यांनी खुर्ची आणून दिली तर त्यात काही गैर आहे, असे वाटत नाही. संसद भवनाच्या आवारातील निदर्शने असल्याने तशी ती कुणाला वैयक्तिक जबाबदारी वाटली नसावी, त्यामुळे कुणीतरी तशी व्यवस्था करणे गरजेचेच होते. ती राऊतांनी आपुलकीनं केली. ते म्हणाले तसे पवारांऐवजी अडवाणी, मुलायम सिंह वगैरे इतर कुणीही असते तर केलीच पाहिजे होती.
भाजपाला संशय निर्माण करण्याची संधी का मिळते?
अर्थात एका ज्येष्ठ नेत्याला खुर्ची आणून देणे गैर नसले तरी भाजपाला संजय राऊतांविषयी संशय निर्माण करण्याची संधी का मिळते, त्यावर स्वत: संजय राऊत यांनीही गंभीरतेने विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यावर कधीतरी नंतर सविस्तर विश्लेषण करु. आता थोडक्यात एवढंच की कोणत्याही राजकीय नेत्याचं प्राधान्य हे त्यांच्या स्वत:च्या पक्षालाच असलं पाहिजे, इतर पक्षाशी संबंध राखणं, आवडी जपणं गैर नसतं. पण ते एका प्रमाणातच असावं लागतं. तो समतोल बिघडू लागला की विरोधकांना मग ते पक्षाबाहेरील असो की पक्षांतर्गत संधी मिळते. संजय राऊत यांच्या शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसविषयीच्या त्यांनी न लपवलेल्या प्रेमाला आता अतिप्रेमाचे रुप आले आहे का, यावर त्यांनी आत्मनिरीक्षण करणे गरजेचे आहे.
भाजपाचे नेते जे बोलतात तसाच सूर शिवसेनेतील काही नेतेही आळवतात. त्यात काही तर खूप जास्त स्पष्टपणे बोलत असतात. पुण्यातील खेडमध्ये आधी खासदार अमोल कोल्हे, नंतर आमदार दिलीप मोहिते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी काढलेल्या उद्गारानंतर स्थानिक शिवसैनिक संतापले. डिवचले गेले. शिवसेनेकडून संजय राऊत यांनी सुरुवातीला जोश दाखवला त्यानंतर ते गप्पच झाले. त्यामुळे स्वत: राऊत यांनीही अशा मुद्द्यांवर विरोधकांना संधी मिळेल, असे वागू नये, अशी अपेक्षा त्यांना मानणारा, त्यांच्या आक्रमकतेचा चाहता असणारा वर्गही करतो.
शेवटी तोंडून निघून गेलेले गैरशब्द जसे मागे घेता येत नाहीत, तसेच एकदा हातून निघून गेलेली पकडही राजकारणात पुन्हा मिळवता येत नाही. उक्ती आणि कृती दोन्हीच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचेच असते. शिवी ही शिवीच असते. त्यातही तेव्हा जेव्हा राजकारण हे अविश्वासाच्या धुक्यानं भरलेलं असतं. अशा वातावरणात नेमकं कधी काय घडेल, हे कळत नसतं. खापर मात्र मग ज्याच्याविषयी संशय त्याच्यावरच फुटत असतं.
तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्तमाध्यम उपक्रमाचे संपादक आहेत.
संपर्क 9833794961 ट्वीटर @TulsidasBhoite ईमेल tulsidasv@gmail.com