तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
आपलं मुक्तपीठ आज एक वर्षाचं झालं. आजचा दिवस पत्रकार दिनाचा. त्याच दिवशी मुक्तपीठच्या वेबसाइटचा शुभारंभ झाला. तेव्हापासून आजवर मुक्तपीठची टीम आपल्या ठरवलेल्या मार्गावर पुढे जात राहिली. हा मार्ग आहे, कोणतंही वैचारिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा. मुक्तपीठचं हे एक वर्ष आहे ‘कणा आणि बाणा’ असणाऱ्या पत्रकारितेचं.
गल्ली ते दिल्ली सत्ताधाऱ्यांना आवडेल तसं वागायची एक नवी पत्रकारिता सध्या सोकावली आहे. दिल्लीचे अंधभक्तही नको आणि गल्लीतील अंधभाटही बनणं नको. असा एक वेगळा मार्ग मुक्तपीठनं निवडला आहे. त्यामुळे ताठ कणा आणि स्वाभिमानी बाणा टिकवत वाटचाल सुरु आहे.
विचार कोणतेही असो. कोणतेही त्याज्य किंवा पूज्य मानून डावलायचे किंवा गोंजारायचे नाहीत. जे चांगलं ते चांगलं, जे वाईट ते वाईट, एवढी सरळस्पष्ट भूमिका असलेली पत्रकारिता ती मुक्त माध्यम पत्रकारिता. तीच मुक्तपीठची पत्रकारिता.
मुक्तपीठ या मार्गावर पुढे जाताना सोबत आर्थिक बळ नसल्याने अडचणी कमी नाहीत. त्यात पुन्हा जे सामान्य महागाईनं पोळलेले, परिस्थितीने गांजलेले त्यांच्याकडे मदत मागायची नाही, हाही निर्धार. त्यामुळे इतर काही माध्यम सेवा पुरवून मुक्तपीठचं काम चालतं. चालत आहे. आणि चालत राहिलंही. त्यामुळे वाढीला मर्यादा आहेत. माध्यमानं असं टिकून राहणं हे अवघडच असतं. पण अशक्य नसतं, हे मुक्तपीठ टीमनं गेल्या वर्षभरात दाखवून दिलं आहे. माझ्यासाठी तेच लक्ष्य आहे. माध्यम असंही असंत. माध्यम असंही चालवता येतं.
गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्राला एक वर्ष झालं तेव्हा सांगितलं तसं समविचारी व्यावसायिक सोबत घेऊन मुक्तपीठचं जे खरं स्वरुप अभिप्रेत आहे तसं मोठं करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, उगाच खोटी स्वप्नं दाखवून कुणाला फसवायचं नसल्यानं योग्य व्यक्ती, योग्य संस्था सोबत येण्यास वेळ लागेल. खात्री आहे, वर्षभरात मुक्तपीठची वाटचाल काहींना तशा व्यावसायिक सोबतीसाठी प्रेरीत करू शकेल. तसं झालं तर मुक्तपीठची टीम मोठ्या आकाशात एका मुक्त माध्यमाची झेप घेईल. अर्थात आत्मा तोच असेल!
वर्षपूर्तीनिमित्त आता पुढच्या टप्प्याकडे वळलं पाहिजे. टीममधील अपेक्षा सकपाळ, रोहिणी ठोंबरे, सुश्रुषा जाधव आणि गौरव भंडारे हा नवा सहकारी सध्या कोरोनामुळे घरुन काम करत आहेत. वृषाली कोतवालचं नुकतंच अलिबागला लग्न झाल्यामुळे ती नाही. त्यांच्यासह बाहेरून सहकार्य करणारे सर्व मस्त काम करु लागले आहेत. त्यामुळे मी आता व्हिडीओंकडे वळेन. त्याचबरोबर टीमही काही बातम्या व्हिडीओ स्वरुपातही मांडेन.
मुक्तपीठची भूमिका मांडताना स्पष्ट केलं तसं आजही तेच सांगेन. मुक्तपीठ सर्व बातम्या देवू शकणार नाही. आताही तेवढं बळ नाही. पण सर्वांना आपल्या वाटतील अशा सर्वांच्या बातम्या देण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करत राहू.
इथंच थांबतो. आज मुक्तपीठ टीममधील चार सहकाऱ्यांनी थेट त्यांच्या घरातून भावना मांडल्यात त्या ऐकूया….
मुक्तपीठचं ध्येयवाक्य…तुमच्या साथीनंच सार्थ होऊ शकतं…साथ असू द्या…मुक्तपीठ – बजावा हक्क, व्हा अभिव्यक्त!
तुळशीदास भोईटे हे ‘मुक्तपीठ’ या मुक्तमाध्यमाचे संपादक आहेत.
संपर्क – ट्वीटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961 ई-मेल tulsidasv@gmail.com
वर्षभराचा आढावा घेणारा खास कार्यक्रम नक्की पाहा: