मुक्तपीठ टीम
कोरोनाची दुसरी लााट शिथील झालेली असताना, सरकारने तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पावसाळाही सुरू झाला आहे. या हंगामात अनेक नवनवीन आजार येतात. अशा परिस्थितीत, काळजी वाटणं स्वाभाविक आहे. कारण, आपण सर्वजण अशा उपायांच्या शोधात आहोत जे आपल्याला रोगांपासून संपूर्ण संरक्षण देऊ शकतील, तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय. या समस्यांवर एक उपाय आहे तो उपाय म्हणजे तुळशीच्या पानांचं सेवन करणं. पचनापासून ते त्वचारोगांपर्यंत तुळशीची पानं अनेक समस्या दूर करू शकते.
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार, तुळशीमध्ये जीवनसत्त्व ए, सी, कॅल्शियम, झिंक, लोह, क्लोरोफिल आणि इतर पोषक तत्त्वे असतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते कर्करोगापर्यंत बचाव करतात. तसंच, अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात.
तुळशीच्या पानांच्या सेवनाचा फायदा
१. रोगप्रतिकारशक्ती वाढवते
तुळशीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि सूक्ष्म पोषक घटक असतात, जे सर्दी, खोकला, ताप इत्यादी सामान्य पावसाच्या आजारांपासून तुमचे संरक्षण करतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळशी प्रभावी आहे. त्याची पाने रोज चघळल्याने घसा खवखवण्यासारख्या समस्या दूर होतात.
२. त्वचा जळजळण्यातून मुक्तता
पावसाळ्यात डास, किडे चावतात. ज्यामुळे संसर्ग किंवा त्वचा रोग होऊ शकतो. या जखमा भरण्यासाठी तुम्ही तुळस वापरू शकता. फक्त त्याभागावर तुळशीचा अर्क लावा. जळजळणं किंवा सूज येणं या समस्यांवर लगेच आराम मिळतो.
३. संक्रमणापासून मुक्तता
आयुर्वेदात तुळशीचा वापर शतकानुशतके गंभीर संक्रमण आणि जखमांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे. तुळशीमध्ये अँटीफंगल, अँटीव्हायरल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत जे बहुतेक रोगांना दूर ठेवण्यासाठी प्रभावी आहेत.
४. रक्त स्वच्छ ठेवते
त्वचेशी संबंधित समस्या पावसाळ्यात अत्यंत सामान्य असतात. अशा परिस्थितीत तुळस तुमचे रक्त शुद्ध करते, ज्यामुळे तुमची त्वचाही चांगली राहते. यासोबतच त्वचेशी संबंधित समस्याही दूर राहतात. तुळशीच्या पानांचं सेवन करणं हे शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. फक्त रोज सकाळी ५ तुळशीची पाने पाण्यात उकळून प्यावीत.
५. श्वसन प्रणाली स्वच्छ करते
कोरोनाच्या या युगात तुळशी फायदेशीर ठरू शकते. पावसाळ्यात सर्दी होणे सामान्य आहे, परंतु कोरोनामुळे ही चिंतेची बाब बनू शकते. म्हणून, तुळशीची पाने पाण्यात वाफवणे तुमच्या फुफ्फुसांसाठी चांगले आहे आणि श्वसन प्रणाली देखील स्वच्छ करेल.
आहारात तुळशीचा समावेश कसा करावा?
१. तुळशीचा चहा बनवून त्याचे सेवन करता येते.
२. तुळशीची पानं रिकाम्या पोटी चघळता येतात.
३. तुळशीची पाने पाण्यात उकळून पेय तयार करू शकता.
४. रोजच्या सूपमध्ये तुळस घातल्याने ते पिणे अधिक स्वादिष्ट ठरेल.
५. आपण चटणीमध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये तुळशीच्या पानांचा समावेश करु शकता.