मुक्तपीठ टीम
भारतात टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट म्हणजेच टीआरपी संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लवकरच लागू होतील. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तसे जाहीर केले आहे. “भारतातील टीआरपीसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी गठित समितीने आपला अहवाल सादर केला आहे. प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शशि एस वेम्पती यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालातील शिफारशींचे मूल्यांकन केले जाईल. त्याआधारे टीआरपी एजन्सी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलला म्हणजेच बार्कला नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात येतील.”
भारतात टीआरपी घोटाळ्याचा आरोप झाला. मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही आणि इतर काही चॅनल्सविरोधात गुन्हाही दाखल केला. त्यानंतर मंत्रालयाने टीआरपीसाठी प्रसार भारतीच्या सीईओच्या अध्यक्षतेखाली ४ नोव्हेंबर २०२० रोजी एक समिती स्थापन केली होती आणि अहवाल सादर केला होता. मंत्रालय आता या अहवालाचा अभ्यास करेल आणि त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेईल. टीआरपी प्रणालीत जास्तीत जास्त पारदर्शकता आणणे हा मुख्य मुद्दा आहे. आज जी पारदर्शकता आहे ते ५५,००० मीटर (टीआरपी) बेस करून निश्चित केली जाते. पारदर्शकता वाढविणे आवश्यक आहे जेणेकरून या पुढे असे होऊ नये. हा अहवाल आम्हाला मिळाला आहे आणि चर्चेनंतर आम्ही तो बीएआरसीला देणार आहोत आणि समितीच्या शिफारशींच्या आधारे मार्गदर्शक सूचना जारी करु.” असे प्रकाश जावडेकर यांनी सांगीतले.
पाहा व्हिडीओ :
मंत्रालयाचे अधिकारी आणि संबंधित अधिकारी त्याकडे लक्ष देणार असल्याने अद्याप समितीचा अहवाल जाहीर झाला नाही. टीआरपींबाबत वारंवार होणारे वाद लक्षात घेऊन केंद्र सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटने (टीआरपी) हेराफेरी केल्याचे प्रकरण उघडकीस आणल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला असून याप्रकरणी बार्क, रिपब्लिकसह काही चॅनल्सच्या अधिकारी, कर्मचार्यांना अटक केली होती. वाद वाढल्यानंतर टीआरपी डेटा उपलब्ध करून देणार्या बार्कने वादाच्या पार्श्वभूमीवर न्यूज चॅनेलवर काही दिवस बंदी जाहीर केली होती. आता १५ जानेवारीनंतर पुन्हा टीआरपी सुरु होण्याची शक्यता आहे.