मुक्तपीठ टीम
“देशाच्या उत्पादन क्षमतेत राहुल बजाज यांचं मोठं योगदान आहे. सामाजिक कार्याला त्यांनी नेहमीच मदत केली आहे. फक्त व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता सामाजिक जाणिवेतून त्यांनी कार्य केलं. समाजाबद्दल कणव असलेला उद्योजक काळाच्या पडद्याआड गेला. बजाज घराण्याचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान आहे. महात्मा गाधी यांच्यासोबत बजाज कुटुंबाचं निकटचं नातं होतं. महात्मा गांधी वर्ध्याला आले याचं एक कारण बजाज परिवार होता. राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतासह सर्वांचचं नुकसान झालं आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची राहुल बजाज यांना श्रद्धांजली
“राहुल बजाज हे उद्योग जगतातील अत्यंत महत्वाची व्यक्ती होती. बजाज समुहाला पुढे नेण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रातही एक पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केल्या आहेत.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची उद्योगपती राहुल बजाज यांना श्रद्धांजली
महाराष्ट्राच्या औद्योगिकरणासाठी मोलाचे योगदान देणारे उद्योगपती राहुल बजाज यांना आपण भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्र हे संपूर्ण देशातील प्रमुख क्षेत्र आहे. राज्याला हे स्थान मिळण्यामध्ये उद्योगपती राहुल बजाज यांनी त्यांच्या उद्योगसमुहामार्फत केलेले काम खूप मोलाचे आहे. बजाज ऑटोचे पन्नास वर्षे नेतृत्व करून त्यांनी त्या कंपनीला यशाच्या शिखरावर नेले. पुणे – पिंपरी चिंचवड हा परिसर औद्योगिकदृष्ट्या प्रगत झाला आणि येथे समृद्धी निर्माण झाली यामध्ये बजाज ऑटोचे ऐतिहासिक स्थान आहे. राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योगजगताची अपरिमित हानी झाली आहे.