मुक्तपीठ टीम
मध्य रेल्वेवरील व्हिस्टा डोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. मुंबई – गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची श्वास रोखून धरणारी दृश्ये असोत किंवा मुंबई – पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची विलोभनीय दृश्ये असोत, वरून काचेचे छप्पर आणि रुंद खिडक्यांसह हे डबे लोकप्रिय सिद्ध झाले आहेत. नऊ महिन्यात तब्बल ५० हजार प्रवाशांनी या मार्गावर निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटला.
ऑक्टोबर- २०२१ ते २३ मे २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेने ४९,८९६ प्रवाशांची नोंदणी करून रु.६.४४ कोटी महसूल मिळवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस १००% पेक्षा जास्त म्हणजेच १८,६९३ प्रवासी वाहतूकीतून रु. ३.७० कोटी उत्पन्नाची नोंद करून आघाडीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीनने अप दिशेने म्हणजे पुणे ते मुंबई प्रवासात रु. १.६३ कोटींच्या उत्पन्नासह ९९% वहिवाट (ऑक्युपंसी) नोंदवली आहे आणि १००% वहिवाट (ऑक्युपंसी) असलेल्या डेक्कन एक्सप्रेसमधून १६,४५३ प्रवासी वाहतूकीतून रु. १.११ कोटी महसूल प्राप्त झाला आहे.
मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये २०१८ मध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा जोडण्यात आला होता. या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे दि. २६.६.२०२१ पासून मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये सादर करण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मुंबई – पुणे मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच दि. १५.८.२०२१ पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला.
विस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, मल्टिपल टेलिव्हिजन स्क्रीन, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स यांसारखी अनेक असामान्य वैशिष्ट्ये आहेत. दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट याशिवाय व्ह्यूइंग गॅलरी सुद्धा यात आहे.