मुक्तपीठ टीम
चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला! आपण अनेकदा सहजच असं बोलतो आणि ऐकतोही. व्हीआयपी नंबरसाठी जो खर्च केला जातो तो ऐकून असंच म्हणाल. आता चंदीगडचे व्यापारी ब्रिजमोहन यांचं पाहा. त्यांनी एक्टिव्हा स्कुटी घेतली ती ८० हजारात. पण त्यांच्या ८० हजाराच्या स्कूटीसाठी व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी त्यांनी चक्क १५ लाख ४४ हजार खर्च केले.
चंदिगडमधील परिवहन विभागाने आयोजित केलेल्या लिलावात व्हीआयपी नंबर CJ-0001 खरेदी केला. या नंबरची किमान किंमत ५० हजार रुपये ठरवण्यात आली होती. व्हीआयपी नवीन मालिकेसाठी चंदीगडमध्ये बोली लावण्यात आली होती. ब्रिजमोहन म्हणाले की, जेव्हा मी पहिल्यांदा नंबरसाठी अर्ज केला तेव्हा मला वाटले की व्हीआयपी नंबर असावा. मला चंदीगडचा 0001 नंबर पाहिजे होता. ब्रिजमोहन म्हणाले की, छंदाची कधी किंमत नसते.
ब्रिजमोहन यांनी स्कूटी नुकतीच ८० हजाराला विकत घेतली होती. आता त्यांनी ठरवलं आहे की, कार घेतली की हा महागडा व्हीआयपी नंबर ते त्यांच्या कारमध्ये ट्रान्सफर करेल. मोहन यंदाच्या दिवाळीत फोर व्हिलर खरेदी करण्याचा विचार करत आहेत. CH01-CH मालिकेतील ‘0001’ क्रमांकाला गेल्या लिलावात २४ लाख ४० हजारांची बोली लागली होती. जी लिलावाच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च बोली होती.
CH01-AP मालिकेतील 0001 क्रमांकासाठी सर्वाधिक बोली २०१२ मध्ये २६ लाख ५ हजार रुपये होती. त्याच वेळी, CH01-CJ मालिका ०००२ ला ५ लाख ४६ हजारांची बोली लागली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, CH01-CJ या नवीन मालिकेच्या लिलावादरम्यान एकूण ३७८ नोंदणी क्रमांक आणि मागील मालिकेतील उर्वरित क्रमांकांचा लिलाव करण्यात आला.