मुक्तपीठ टीम
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होत असलेल्या आयकॉनिक वीक अंतर्गत, मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय इथे, ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत, ‘पर्यटन पर्व – २०२२’ चे आयोजन केले आहे.
पर्यटन पर्वचे उद्घाटन, प्रमुख पाहुणे असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर विकास विभागाचे मंत्री जी किशन रेड्डी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. महाराष्ट्राचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बाल विकासमंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ‘पर्यटन पर्व’ हा देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारित उपक्रम आहे. पंतप्रधानांनी, स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना २०२२ पर्यंत सर्व भारतीयांनी भारतातील किमान १५ पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे आवाहन केले होते.
पश्चिमेतल्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्य तसेच दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील विविध संस्कृती, कला, हस्तकला आणि पाककृतींचे प्रदर्शन करण्यासाठी मुंबईत पर्यटन पर्व आयोजित केले जात आहे. यामुळे मुंबईकरांना या भागातील वारसा आणि संस्कृतीची अधिक उत्तम माहिती मिळेल. विविध पर्यटन उत्पादने, पाककृती, वारसा आणि भारताची संस्कृती याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय (केंद्रीय संचार विभाग), संरक्षण, आयुष (AYUSH), वस्त्रोद्योग (हस्तकलाकृती विकास आयुक्त इत्यादी) इतर केंद्रीय मंत्रालये देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
पर्यटन पर्व स्थानिक पर्यटकांवर, विशेषतः युवा पर्यटकांना जागृत करण्यावर लक्ष केंद्रित करेल. यंदाच्या वर्षी पर्यटन पर्वामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांच्या युवा पर्यटन क्लबच्या सदस्यांना निमंत्रित केले जाईल.
मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय येथे ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या काळात होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे:
- देशाच्या पश्चिम आणि मध्य भागातील 8 राज्य पर्यटन विभागांचे आणि इतर राज्यांच्या मुंबईमधील पर्यटन कार्यालयांचे पर्यटन मंडप/ स्टॉल
- भारताच्या स्वातंत्र्याला75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत, केंद्रीय संचार विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय द्वारे मल्टीमीडिया प्रदर्शन
- किचन स्टुडियो- मुंबईमधील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट द्वारे ‘पश्चिम-मध्य मिलाफ’ या संकल्पनेवर आधारित स्थानिक खाद्य संस्कृतीचे प्रदर्शन.
- वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विकास आयुक्तांनी निमंत्रित केलेल्या पश्चिम आणि मध्य भारतातील 5 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील कारागिरांच्या हस्तकलाकृतींचे 15 स्टॉल असलेला क्राफ्ट बझार
- मध्यवर्ती मंचावर भारतभरातील लोककलांचे सादरीकरण.
- आयुर्वेद @2047 या संकल्पनेवर आधारित आयुष मंत्रालयाचा स्टाॅल.
- अग्निपथ योजनेचा प्रचार करण्यासाठी भारतीय वायुदलाच्या मुंबईमधील भर्ती कार्यालयाचा स्टॉल
- छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय आणि आसपासच्या परिसरातील आकर्षणे याबाबत माहिती सांगण्यासाठी स्थानिक पर्यटक मार्गदर्शकांबरोबर मोफत टूर .
- शालेय विद्यार्थ्यांसाठी कला कार्यशाळा आणि स्पर्धा
- पर्यटन पर्वाला भेट देणाऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी इतर परस्पर संवाद उपक्रम.
३ दिवसांचा हा कार्यक्रम सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत सर्वसामान्य जनतेसाठी खुला राहील, तसेच प्रवेश विनामुल्य आहे.