रोहिणी ठोंबरे
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज २ वर्षे झाली. पाकिस्तान पुरस्कृत भेकडांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना मुक्तपीठची भावपूर्ण श्रध्दांजली. त्यांच्या हौतात्म्याला त्रिवार सलाम! जय हिंद!!
१४ फेब्रुवारी २०१९…दुपारी ३ वाजता. केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफचा ताफा श्रीनगर-जम्मू महामार्गावरून जात होता. संपूर्ण ताफ्यात सीआरपीएफच्या २,५४७ जवानांसह ७८ वाहने होती. त्यातील बहुतेक जवान सुट्टीवरुन परतलेले तरुण होते. डोळ्यात आठवणी तरळत होत्या. मनात त्याच आठवणींनी कल्लोळ माजवला होता. निर्धार नेहमीसारखाच होता भारतमातेसाठी सर्वस्व अर्पण करण्याचा. त्यांच्या बस पुलवामा येथे पोहचल्या. त्याचवेळी जैश-ए-मोहम्मद अतिरेक्यांच्या एसयूव्हीने बसला धडक दिली. ती धडक साधीसुधी नव्हती. ती एसयूव्ही ३०५ किलो स्फोटकांनी गच्च भरलेली होती. धडक होताच भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन बसंपैकी एका बसच्या चिंधड्या उडाल्या. या हल्ल्यात ४० सैनिक ठार झाले.
पुलवामा हल्ला हा सीआरपीएफवर मागील ९ वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. यापूर्वी एप्रिल २०१० मध्ये छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात ७६ सैनिक शहीद झाले होते. पुलवामा हल्ला कुख्यात जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद डारने केला होता. डारला पाकच्या शिबिरात प्रशिक्षक असलेले अब्दुल रशीद गाझी यांनी आयईडी स्फोटाचे प्रशिक्षण दिले होते. पाकिस्तान नेहमी असेच भ्याड घातपात घडवतो. त्याला ठाऊक आहे. रणभूमीवरील समोरासमोरील युद्धात आपला निभाव लागणारच नाही. त्यामुळे पाकिस्तान अशा कुरापती काढतो. निराशेनं पछाडलेला हा जर्जर देश भारताला त्रास देण्यासाठी वाट्टेल ते करतो.
पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेनं पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या संस्थेचा म्होरक्या मसूद अझर आहे. मसूद अझर हा भारताचा तो शत्रू आहे जो शेजाऱ्यांच्या बिळात लपून कळ काढत असतो. काही स्थानिक गद्दार हाताशी धरून जैशचा मसूद अझर भेकड हल्ले घडवतो. पुलवामा हल्ल्याच्या १० दिवस आधी ५ फेब्रुवारी रोजी कराची येथे जैशची रॅली निघाली होती. ज्यामध्ये मसूद अझरचा धाकटा भाऊ मौलाना अब्दुल रऊफ असगर यांनी भारतात दहशत माजवण्याची धमकी दिली होती. नेमके तसेच घडले. घातपात झाला. जवानांचे भ्याड हल्ल्यात बळी गेले. पण जराही न भांबावता भारतीय सेना दलं प्रतिकारासाठी, अद्दल घडवण्यासाठी सज्ज झाली.
पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या १३ दिवसांनी भारताने प्रत्युत्तर दिले. २६ आणि २७ फेब्रुवारी २०१९ च्या रात्री भारतीय वायुसेनेची लढाऊ विमानं नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसीपासून ८० किमी अंतरावर पाकिस्तानमध्ये घुसली. तिथं जैशचा सर्वात मोठा दहशतवादी तळ होता. बालाकोटमध्ये. आपल्या बहाद्दर हवाईवीरांनी तो तळ बेचिराख केला. बालाकोटमध्ये बॉम्बहल्ला केला. त्या स्फोटात ३५० दहशतवादी ठार झाले.
अर्थात आजही धोका संपलेला नाही. केवळ पाकिस्तानात हल्ला केला म्हणून सर्व झाले असेही नाही, भारताला असे समर्थ, सबळ बनावे लागेल की शत्रूला कुरापत काढतानाही त्रिवार नाही सहस्त्रवार विचार करावा लागेल.