मुक्तपीठ टीम
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला झालेल्या प्रश्नोत्तरांमधील काहींची माहिती:
विधानसभा
प्रश्नोत्तरे -१
“बेस्ट उपक्रमांच्या विकासकांकडील थकबाकी वसुलीसाठी लवादामार्फत प्रयत्न सुरु” – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
बेस्ट उपक्रमांची विकासकांकडे असलेली थकबाकी वसुल करण्यासाठी करारातील अटी व शर्तीनुसार लवादामार्फत प्रकरण निकाली काढण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रकरणी कुणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले, “बेस्ट उपक्रमाच्या डेपोच्या जागा विकसित करण्याकरिता सहा विकासक होते. त्यांच्याकडून ५३३ कोटी रुपये येणे अपेक्षित होते. परंतु त्यांच्याकडून ५२९ कोटी रुपये जमा करण्यात आले. या विकासकांकडे १६० कोटी रुपये थकबाकी असल्याचे बेस्ट प्रशासनाने कळविले आहे. व्याजदराच्या अनुषंगाने असणाऱ्या रकमांबाबत व मुख्यत: दंडाच्या रकमांबाबत विकासकांचे बेस्ट उपक्रमाशी मतभेद आहेत. तथापि, ही वसुली करण्याकरिता करारातील अटी व शर्तीनुसार लवादामार्फत प्रकरण निकाली काढण्याकरिता प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री आशिष शेलार, अतुल भातखळकर, योगेश सागर, सुनील प्रभू यांनी सहभाग घेतला.
प्रश्नोत्तरे -२
“महागांव ते फुलसांगवी रस्त्याचे काम महिन्याअखेर पूर्ण करणार” – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
“यवतमाळ जिल्ह्यातील महागांव ते फुलसांगवी रस्त्याचे काम या महिन्याअखेर पूर्ण करण्यात येणार असून रस्त्याचे काम गुणवत्तेनुसार होण्याकरिता संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत”, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिली.
सदस्य मदन येरावार यांनी महागांव ते फुलसांगवी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री चव्हाण म्हणाले, “हे काम केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत करण्यात येत आहे. अमरावती येथील अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ यांनी रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तपासणी केली आहे. राज्याला केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत ६ हजार २१६ कोटी रुपये प्राप्त झाले असून राज्यात ६ हजार ६२५ रुपयांची कामे झाली आहे. केंद्र शासनाकडून ४०९ कोटी रुपये अप्राप्त असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रश्नोत्तरे -३
आर्णी नगरपरिषद : “मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी आठ दिवसाच्या आत पूर्ण करणार” – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
“आर्णी (यवतमाळ) नगरपरिषदेमध्ये मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी आठ दिवसाच्या आत पूर्ण करुन चौकशीत आढळणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करु”, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य डॉ.संदीप धुर्वे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले, “या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदार यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आर्णीचे तहसिलदार यांनी तांत्रिक सल्लागाराची मदत घेऊन चौकशी पूर्ण करण्याचे व अहवाल सादर करण्याचे पत्र दिले आहे. या प्रकरणाची आठ दिवसात चौकशी केली जाईल”.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, भास्कर जाधव, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाग घेतला.
विधानपरिषद
प्रश्नोत्तरे -१
राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – कृषी मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 2 :- राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत 217 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत शेडनेट, मल्चिंग, कांदा चाळ उभारणी अशी कामे करण्यात येत आहेत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाकरिता 111 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 42 कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत. विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन या योजनेसाठी 2 कोटी 17 लाख रुपये वितरित करण्यात आले असून 5 कोटी 41 लाख रुपये खर्चाची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली.
कोकणातील चक्रीवादळामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने 609 कोटी रुपयांचे पॅकेज दिले. कोरोना संकटाच्या काळातही शासनाने फळबाग लागवडीचे काम सुरूच ठेवले असून येत्या वर्षभरात 50 हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहितीही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
0000
प्रश्नोत्तरे -२
ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाई करणार
– गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई, दि. 2 :- राज्यात ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य रवींद्र फाटक व महादेव जानकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्यात ज्या-ज्या ठिकाणी अमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असेल त्या ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असे सांगून गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने 11 ठिकाणी छापे टाकले असून 42 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
वरळी येथील पबमध्ये झालेली गर्दी व कोरोनाच्या नियमांचे झालेले उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत लावलेली उपस्थिती व तेथे कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन यासंदर्भात चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, विधानपरिषद सदस्य रामदास कदम, भाई जगताप, भाई गिरकर, निरंजन डावखरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
0000
प्रश्नोत्तरे -३
आरोग्य विभागाच्या पदभरतीतील गैरप्रकारांबाबत सोमवारी अंतिम निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 2 :- सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रिक्त पदे भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भात काही आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यासंदर्भात सोमवारी योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली.
काही काळया यादीतील कंपन्यांना परीक्षेची जबाबदारी देण्यात आली असल्यास अशा बाबी तपासून बघितल्या जातील व त्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.